वणव्यांचा पालघर जिल्हा : दरवर्षीप्रमाणे वणव्यांना सुरुवात

    दिनांक  27-Feb-2018
 
 
 
खानिवडे (विश्‍वनाथ कुडू) : किनार्‍यासह नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या पालघर जिल्ह्यातील रानांना दरवर्षी पावसाळ्यानंतर वणवे लागतात. यात डिसेंबरच्या अखेरीपासून छोटे मोठे वणवे लागण्यास सुरुवात होते. उन्हाळा सुरू व्हायला अजून वेळ असताना सध्या असे वणवे वसई पूर्व भागातील जंगलात लागण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अशा वणव्यांना आटोक्यात आणण्याची कुठलीही यंत्रणा वनविभागाकडे नाही.
 
जाळ रेषा खणण्यापलीकडे असे वणवे लागूच नयेत म्हणून उपाययोजना करताना वनविभागात तत्परता दिसत नाही. याबाबत वनविभागाच्या अधिकार्‍यांना वणवे लागण्याची कारणे विचारली असता पूर्वी घनदाट जंगल असल्याने झाडांच्या घर्षणाने ठिणग्या उत्पन्न होऊन वणवे लागायचे. मात्र आता लागणारे वणवे हे जास्त प्रमाणात मानवनिर्मित असल्याचे सांगत आहेत. आता लागणार्‍या वणव्यांना धूम्रपान करणार्‍यांचा हलगर्जीपणा जास्त कारणीभूत आहे. तसेच नागरिक रानात थंडीपासून बचाव करण्यासाठी उजकरा (शेकोटी) पेटवतात व आपले काम झाल्यानंतर ते पूर्ण विझल्याची खात्री न करता निघून जातात. यामुळे सुद्धा असे वणवे लागतात. मात्र येथील स्थानिक नागरिकांच्या मते येथील रानात आढळून येणारे ससे, रानडुक्कर व इतर जंगली श्वापदे पावसात वाढलेल्या उंच तणामुळे दिसत नाहीत. ती सहज दिसावीत व जाळ्यात येऊन शिकार व्हावीत म्हणून येथील काही शिकारी अशा आगी लावतात. अशा आगी आटोक्यात न आल्याने वणवे भडकतात. तसेच लाकूडफाट्यासाठी जंगलात जाणार्‍यांच्या अंगाला खाज आणणारी सुकत आलेल्या गवताची कुसे लागतात. ती लागू नयेत तसेच दाट जाळ्यामधील मिळणार्‍या लाकूडफाट्यासाठी सहज पोहोचता यावे म्हणून, फाट्या गोळा करणारे आगी लावतात. तसेच वनजमिनी कसणारे नागरिक गवतामधील जमीन प्लॉट मोकळा व्हावा, म्हणूनही अशा प्रकारच्या आगी लावतात.
 
या वणव्यात रानशेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या शेत झोपड्या व पिके जळून जात आहेत. सध्या असे वणवे वसई पूर्वच्या जंगलात लागलेले दिसत आहेत व पुढेही लागलेले दिसतील. अशा प्रकारच्या मानवनिर्मित वणव्यांमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत असून वणवे भडकावणार्‍यांना व वनाची जबाबदारी असणार्‍यांना कोणतेही सोयरसुतक नाही, हे आपले दुर्दैव आहे. वणव्यांच्या या परिस्थितीबाबत आणि धोक्यांबबत वनविभागामार्फत लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. मात्र नागरिक वणव्यांच्या बाबतीत उदासीन असल्याचे येथील वन अधिकारी सांगत आहेत. असे असले तरीही वनाधिकारी व कर्मचारी यांना आपली जबाबदारी विसरता येणार नाही. पर्यावरणप्रेमी नागरिक व संघटना यांना जागरूकता दाखवून अकार्यक्षम वनकर्मचार्‍यांना जाग आणावी लागणार आहे. नाहीतर पालघर जिल्हा म्हणजे नेमेची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दरसाल लागणार्‍या वणव्यांचा जिल्हा असे संबोधावे लागेल.