शेतकऱ्यांची क्षमताधणी करणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उपयुक्त

    दिनांक  21-Feb-2018

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

 

 
 
औरंगाबाद : शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उपयुक्त असून गावांचा कायापालट या योजनेमुळे होईल, असे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे व्यक्त केले.
 
कृषी विभागाच्या वतीने एमआयटी महाविद्यालय येथे आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी हरिभाऊ बागडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हवामान अनुकूल कृषी प्रकल्प (पोकरा) चे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सहाय्यक प्रकल्प संचालक (पोकरा) शरद गिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ उपस्थित होते.
 
हरिभाऊ बागडे यावेळी म्हणाले की, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र शासन राबवत असलेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन देणारी उपयुक्त योजना आहे. निसर्गाच्या अनियमतेमुळे शेतीवर होणारे दुष्परिणाम त्यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरु केली आहे. तीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी या योजनेत ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होणे आवश्यक आहे. शेती, शेतकरी पर्यायाने गावाचा कायापालट करु शकणारी ही योजना शेतात पाणी आणि शेतकऱ्याच्या हाताला काम देणारी उपयुक्त योजना आहे, असे सांगून बागडे पूढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आहे त्या शेतीत अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पॉली हाऊस, शेडनेट सारख्या नाविन्यपूर्ण पद्धतीने शेती केल्यास एकरी पाच ते सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविणे शक्य आहे. यासाठी पावसाचे पाणी आपल्या शेतात, गावात अडवण्याचे, मुरवण्याचे प्रमाण वाढविण्याची गरज असून कृतीशील मानसिकता गावकऱ्यांनी जोपासावी, असे आवाहन बागडे यांनी केले.
 
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेंतर्गत हवामान अनुकूल कृषी प्रकल्प (प्रोजेक्ट ऑन क्लायमॅट रिसायलेंट ॲग्रीक्लचर, पोकरा) सुक्ष्म नियोजन आराखडा कार्यशाळेमध्ये विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह ऋतूगंधा देशमुख, विठ्ठल चाबूकस्वार यांनी निवड झालेल्या विविध गावांमध्ये या योजनेंतर्गत करावयाच्या कामांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
 
औरंगाबाद जिल्हयातील औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील एकूण ८३ गावांची निवड या योजनेंतर्गत करण्यात आली असून या कार्यशाळेत गावांचे सरपंच, स्वयंसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडल कृषी अधिकारी रोहीदास राठोड यांनी तर आभार प्रदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी धमेंद्र कुलथे यांनी केले.