पाळता भुई थोडी!

    दिनांक  21-Feb-2018   
 

गुरुचे चंद्र - L to R: Io, Europa, Ganymede, and Callisto. PC – NASA.

“आबा, आज चंद्राची पळणारी सावली पहायची ना?”, सुमितने विचारले.
“पाहू! पाहू! आज रात्री आपण दुर्बिणीतून चंद्राची पळणारी सावली पाहू!”, आबा म्हणाले.


“आबा, रात्री कशी सावली दिसणार? आणि सूर्यग्रहणात तर चंद्राची सावली आपल्या अंगावरून भुरकन निघून पण जाते! ती पाहायला दुर्बिणीची काय गरज?”, सुमित अचंब्याने म्हणला.


“आपल्याला थोडीच आपल्या चंद्राची सावली पहायची आहे? आपण पाहणार आहोत गुरुवर पडणारी गुरूच्या चंद्राची सावली! म्हणजे गुरु ग्रहावर घडणारे सूर्यग्रहण आपण पृथ्वी वरून पाहणार आहोत.”, आबा म्हणाले.


“पण आबा, मला पृथ्वीवरचे सूर्यग्रहण सूर्यावरून कसे दिसेल ते पाहायचे होते!”, सुमितचे मागणी.


“नाही रे सुमित, नाही! सूर्यावरून पृथ्वीवर पळणारी चंद्राची सावली दिसत नाही! तसच चंद्रग्रहणात चंद्रावर पडणारी पृथ्वीची सावली पण दिसत नाही. कारण सूर्यावरून सावली दिसूच शकत नाही! ना पृथ्वीची, ना चंद्राची. अरे जिथे सूर्याची दृष्टी जाते तिथे अंधार कसा असेल सांग? सूर्याचा किरण अंधार शोधत जिथे म्हणून पोचेल तिथे प्रकाशाच पडणार! हातात कंदील घेऊन अंधार कसा पाहणार आपण?”, आबा म्हणाले. सुमितच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून, पुढे म्हणाले, “सुमित, काय होते, की चंद्राची सावली चंद्राच्या मागे लपते, आणि म्हणून ती सूर्यावरून दिसत नाही.”


“ओह! म्हणून चंद्राची पळणारी सावली आपण सूर्यावरून न पाहता, पृथ्वीवरून पाहणार आहोत! आता कळले!”, सुमित म्हणाला.


“तर सुमित, गुरु ग्रहाला अनेक चंद्र आहेत. गुरूच्या आकाशातील अनेक चंद्रांपैकी चार चंद्र अगदी ठळक दिसतात.”, आबा म्हणाले.


“गुरूच्या आकाशात देवाने ‘चार चांद लगा दिये’ म्हणायचे!”, दुर्गाबाई म्हणाल्या.


“पहा! नुसते चंद्र म्हणले तर दुर्गाबाई सुद्धा काव्यात्मक बोलायला लागल्या! तेही हिंदीतून! समजा, एका चंद्रावर, एका शतकात, एका भाषेत, सदतीस हजार दोनशे अडतीस कविता लिहिल्या जात असतील, तर गुरूच्या एकोणसत्तर लहान मोठ्या चंद्रांवर किती किविता लिहिल्या जातील? कर बरे गणित!”, आबा हसत हसत म्हणाले.


“अबब! एकोणसत्तर चंद्र! प्रत्येक चंद्रावर कैक हजार कविता केल्या तर, कवितांचा पाऊसच पडेल गुरुवर! आणि मग दुसऱ्या काही कवींना पावसाच्या कविता सुचतील! मग पावसाच्या कवितांचा पाऊस! आबा, कोडी नकोत! तुम्ही आपलं ग्रहणाच काय ते सांगा!”, सुमित म्हणाला.


“बर सांगतो! ऐक! गुरुच्या ६० – ७० वगैरे चंद्रांपैकी, काही चंद्र गुरुच्या भोवती एका दिशेने फिरतात, काही विरुद्ध दिशेने. काही खूप जवळून फिरतात. तर काही चिक्कार अंतर ठेवून फिरतात. काही चंद्र एकमेकांच्या सोबतीने घोळक्याने गुरु भोवती फिरतात. काही ‘एकला चलो रे’ गात फिरतात. काही चंद्र अगदी गोल आहेत. काही नुसतेच ओबडधोबड खडक आहेत. आपण जे चार चंद्र पाहणार आहोत, ते आहेत – आयो, युरोपा, गनिमिड आणि कलीस्टो. ही चारही नावे आहेत रोमन देव ज्यूपीटर किंवा ग्रीक देव झ्यूसच्या प्रेमिकांची.


“सांगायचे काय, तर गुरु म्हणजे भारी, ग्रेट! सहजच त्याचे चंद्र पण ग्रेट आहेत! या चार चंद्रांपैकी गनिमिड व कलीस्टो बुध ग्रहा इतके मोठे आहेत. तर आयो आणि युरोपा आपल्या चंद्राइतके आहेत. थोडे कमी अधिक.


“गुरु सूर्यापासून पृथ्वीपेक्षा साधारण पाचपट दूर आहे. त्यामुळे गुरुवरून दिसणारे सूर्यबिंब आपल्याला दिसते त्यापेक्षा पाचपट लहान असते. हे लहान सूर्यबिंब या चारही चंद्रांमुळे पूर्ण झाकले जाउन प्रत्येक वेळी खग्रास सूर्यग्रहण घडते.


“आपल्या चंद्राची सावली बऱ्याच वेळा पृथ्वी वरून किंवा खालून निघून जाते. पण गुरु पृथ्वी पेक्षा जवळ जवळ १२ पट मोठा असल्याने त्याच्या बाबतीत असे सहसा होत नाही. प्रत्येक अमावास्येला चंद्राची सावली गुरुवर पडतेच पडते.“, आबा म्हणाले.


“म्हणजे गुरु ग्रहावर सूर्यग्रहण frequently दिसत असणार!”, सुमितचा तर्क.


“अगदी बरोबर. एकतर चंद्रांची संख्या जास्त, गुरूचा आकार मोठा आणि या मोठ्या चंद्रांची गती जास्त! त्यामुळे गुरुवर वारंवार ग्रहणे घडतात. पण खग्रास ग्रहण मात्र केवळ या चार चंद्रांमुळेच घडू शकते. इतर काही चंद्रामुळे कंकणाकृती सूर्य ग्रहणे घडतात. या चार चंद्राचा गुरु भोवती फिरायचा वेग अफाट आहे. आयो साधारण १.७ दिवसात, युरोपा ३.५ दिवसात, गनिमिड ७ दिवसात तर कलिस्टो १६ दिवसात गुरूभोवती फिरतो. आयो चंद्रामुळे दिवसा आड सूर्यग्रहण, युरोपामुळे आठवड्यातून दोनदा सूर्यग्रहण, गनिमिड चंद्राचे आठवड्याला एक सूर्यग्रहण आणि कलिस्टो मुळे महिन्याला दोन सूर्यग्रहणे घडू शकतात!


“ग्रहणे इतकी frequent असल्याने, बऱ्याचदा एकाच वेळी अनेक चंद्रांची सावली गुरुवर धावत असते! या मोठ्या चंद्रांपैकी, दहा वर्षातून एकदा, एकाच वेळी तीन चंद्रांची सावली गुरुवर धावतांना आपल्याला दिसू शकते.”, आबा म्हणाले.


“आबा, आपल्याला ही सगळी ग्रहणे पाहायला मिळू शकतात का?”, सुमितने विचारले.


“ही ग्रहणे आपल्या रात्री लागणार असतील, आणि गुरु जर त्यावेळी आपल्या रात्रीच्या आकाशात असेल, तर आपल्याला घर बसल्या गुरूच्या बिंबावरून धावणाऱ्या सावल्या पाहता येतात! कधी कधी त्याचे चंद्र आणि त्यांची सावली असे दोन्हीचे दर्शन घडते. येत्या दोन – तीन दिवसातील गुरु वरील सूर्यग्रहणे पहा –
Friday, February 23, 2018

20:18 UT, Europa's shadow begins to cross Jupiter.

22:46 UT, Europa's shadow leaves Jupiter's disk.
Saturday, February 24, 2018

05:26 UT, Ganymede's shadow begins to cross Jupiter.

07:20 UT, Ganymede's shadow leaves Jupiter's disk.

13:30 UT, Io's shadow begins to cross Jupiter.

15:42 UT, Io's shadow leaves Jupiter's disk.

 

“शंकरराव, ही ग्रहणे तर अगदी दोन तास, अडीच तासांची आहेत.”, दुर्गाबाई म्हणाल्या.


“काय आहे दुर्गे, या सावल्या आपापल्या मालकाच्या गतीने गुरूवरून पाळतात. त्यामुळे काही जणी जोरात पाळतात काही थोड हळू. पण या सगळ्याच सावल्या जे पळत सुटतात ते पळत पळत गुरुच्या बिंबावरून खाली पडून गेल्यासारख्या दिसतात! त्यांना खरोखरच पळता भुई थोडी होते की काय असे वाटते!”, आबा म्हणाले.

संदर्भ -

१. Jupiter Moons Perform Cosmic Shadow Dance - By Geoff Gaherty

२. The Sun and Transits as Seen From the Planets - Larry McNish

३. Eclipse schedule from - Sky and Telescope


- दिपाली पाटवदकर