ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे लक्ष्य गाठण्यासाठी शासन कटिबद्ध

20 Feb 2018 12:12:22
 
 
 
मुंबई : राज्य शासनाने सन २०२५ पर्यंत ट्रिलियन डॉलर इकॉनामी क्लबमध्ये जाण्याचे लक्ष निर्धारित केले असून त्यासाठी शासनासह प्रशासनाचीही तयारी असून लक्ष्यपूर्तीसाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्हर्जन्स २०१८' या जागतिक गुंतवणूक परिषदेत आयोजित एका चर्चासत्रात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. या चर्चासत्राला उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी यांच्यासह दीपक पारेख, अजित रानडे, अरुण सिन्हा आणि अध्यात्मिक गुरु सद्‍गुरू यांच्यासह अनेक तज्ज्ञ उपस्थित होते.
 
राज्यात पायाभूत सुविधांसह राज्यातील मुंबईतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. एकाच तिकीटावर शहरातील सर्व वाहतूक साधनांचा वापर करता यावा यासाठीची यंत्रणा उभी राहत असल्याची त्यांनी माहिती दिली. राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने भविष्यात लागणाऱ्या जमिनीसाठी लॅण्ड बँक तयार करण्याच्या सूचनेचाही गांभीर्याने विचार होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
राज्य शासनाने निर्धारित केलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण तयारी केलेली असून या परिषदेत सुमारे १२ लक्ष कोटी गुंतवणूक होण्याची शक्यता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. राज्यात उपलब्ध असलेल्या इंजिनिअरिंग महाविद्यालयांमुळे तांत्रिक कौशल्य उपलब्ध आहे. याशिवाय राज्यात ८६ हजार कौशल्य विकास संस्था उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे जगाला लागणारे कुशल मनुष्यबळ राज्यात तयार होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0