सामाजिक तीर्थ

    दिनांक  19-Feb-2018   
 
 
संस्थेकडे शून्य पैसे असताना प्रकल्प सुरू झाला. नंतर शब्दशः कोट्यवधी रूपये आले. पुढच्या प्रकल्पासाठी सुद्धा समाज पैसा देईल. पण असे प्रश्न केवळ पैसे देऊन सुटत नसतात. सर्व समाजात एक आत्मिय भावना निर्माण होणे फार आवश्यक आहे. आपल्या दारावर येणारा गोसावी, बहिरूपी, नंदी बैलवाला, मरीआईवाला हे आपलेच बांधव आहेत आणि त्यांना शिक्षण देणे, त्यांना एका गावात वसविणे, त्यांनाही विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना सामाजिक सन्मान देणे, हे आपल्या सर्वांचे काम आहे. कधी तुळजापूरला आलात तर यमगरवाडीला जरूर जा. ते ही एक सामाजिक तीर्थ आहे, हे लक्षात ठेवा.
 
हिंदू समाजाच्या रचनेचा विचार जसा चार वर्णांच्या आधारे करता येतो, तसा तो वेगवेगळ्या जातीसमूहांच्या स्तरांप्रमाणे होऊ शकतो. त्याचप्रमाणे नगरवासी, ग्रामवासी, गावकूसाबाहेर राहणारा, वनवासी, अशा प्रकारेदेखील करता येतो. गावात ज्याचे शिवार नाही, गावगाड्यात ज्याला स्थान नाही, ज्याचे स्वतःचे गाव नाही, गावाबाहेर पाल ठोकून जो राहतो, उदरनिर्वाहासाठी सतत भटकंती करतो, त्याला ‘भटका समाज’ म्हणतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत या समाजाची संख्या खूप मोठी आहे. या समाजाकडे रेशनकार्ड नसते, त्यामुळे आधारकार्ड नाही, जन्माचा दाखला नाही, त्यामुळे जातीचा दाखला नाही, असा हा सरकार दरबारी कसलीही नोंद नसलेला शब्दशः कोट्यवधींचा समाज आहे. त्याचे वर्णन करायचे तर ‘अनिकेत’, ‘अकिंचन’, ‘असाहय्य’ या शब्दांत करावे लागते.
 
संघाच्या प्रेरणेने आणि ‘भटके-विमुक्त विकास परिषद’ या नावाने महाराष्ट्रात १९९० साली या समाजासाठी काम करण्याचे ठरविण्यात आले. तुळजापूरपासून १८ किलोमीटर अंतरावर यमगरवाडी नावाचे गाव आहे. या गावाच्या माळरानाची अठरा एकर जमीन रमेश चाटुफळे यांनी दान दिली. जेव्हा आम्ही कार्यकर्ते ही जमीन पाहण्यासाठी गेलो, तेव्हा तेथे अर्धवट खोदलेली एक विहीर आणि एक उंबराचे आणि बोराचे झाड होते. त्याच्या सावलीत बसून भटके आणि विमुक्त मुलांसाठी वसतिगृह सुरू करावे, असे आम्ही ठरविले. यमगरवाडीच्या शाळेत मुले शाळेसाठी जातील असे ठरले. राहण्याची व्यवस्था काय, पिण्याच्या पाण्याचे काय, मुलांच्या जेवणाचे काय करायचे, त्याच्यासाठी पैसा लागेल, तो कुठून आणायचा, याबद्दल पहिल्याच दिवशी सखोल चिंतन झाले असे नाही. गिरीश प्रभुणे यांनी सर्व प्रकल्प उभा करण्याची जबाबदारी कुणी न सांगताच आपल्या खांद्यावर घेतली.
 
एक कार्यकर्ता पायाला सतत भिंगरी बांधून भटक्या-विमुक्तांच्या पालावर सतत जाऊन, त्यांचा विश्र्वास संपादन करून काय चमत्कार करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे गिरीश प्रभुणे. प्रकल्प उभा राहिला. कामचलाऊ दोन-तीन खोल्या बांधण्यात आल्या. दिवसा शाळा आणि रात्री निवास असे त्या खोल्यांचे रूप होते. सोलापूर, धाराशिव, मुंबई, पुणे, लातूर येथील कार्यकर्त्यांनी अन्नधान्य, मुलांसाठी लागणारे कपडे, अन्न शिजविण्यासाठी भांडीकुंडी जमविण्यास सुरूवात केली. संघाचे कामएका माणसाचे कामनसते, ते संघाचे म्हणजे समुदयाचे कामअसते. मी ‘सा. विवेक’चा तेव्हा संपादक होतो. ‘सा. विवेक’मध्ये सतत लेखन करून प्रकल्पाची माहिती वाचकांना करून देणे आणि मदतीचे आवाहन करण्याचे काम‘सा. विवेक’ने सातत्याने केले. त्यामुळे साधन आणि आवश्यकतेनुसार मदत मिळत गेली.
 
समृद्धी नावाची एक अनाथ मुलगी या शाळेत आली. मग शाळा मुला-मुलींची सुरू झाली. संख्या वाढत चालली, तशी मुलं आणि मुली यांच्या वेगळ्या वसतिगृहाची गरज निर्माण झाली. जी साधने होती, त्या साधनांत जशी वसतिगृहे होती तशी बांधण्यात आली. प्रकल्पाला भेट देणार्‍यांची संख्या वाढू लागली. कुणी बोअरवेल खोदून दिल्या. नंतर आश्रमशाळेची मान्यता मिळाली. शाळेला अनुदान मिळू लागले आणि आपलीच शाळा सुरू झाली. शिक्षक-शिक्षिका आल्या. त्यांच्या निवासासाठी प्रथमअशीच कामचलाऊ घरे बांधण्यात आली. १९९० साली २०-२५ मुलांपासून सुरू झालेला प्रकल्प वाढत वाढत दहा-पंधरा वर्षांत २५०-३०० मुलांचा प्रकल्प झाला. एवढी मुले सांभाळायची म्हणजे जबाबदारी फार वाढणार. काही मुले तर सहा महिन्यांची असतानाच प्रकल्पात दाखल झाली. कारण त्या मुलांचे आई-वडील अचानक निर्वतले. त्यांना सांभाळायचे कुणी? अशी मुले प्रकल्पात आली. प्रकल्प अनाथाश्रम नसला तरी गेल्या २५ वर्षांत अशी दहा-पंधरा मुले आणि मुली वसतिगृहात आली. कार्यकर्त्यांनी त्यांना मायेचा स्पर्श दिला. एकेकाचा अनुभव ‘अद्भुत’ या शब्दातच वर्णन करावा लागेल.
 
 

 
 
महाराष्ट्रातील संघाने या प्रकल्पाला काही कमी पडू नये याची खूप काळजी घेतली. चांगले कार्यकर्ते प्रकल्पाशी जोडले. प्रचारकांचे नियमित प्रवास सुरू झाले. संघाचे कार्य शुद्ध, सात्विक म्हणजे परमेश्र्वरी असल्यामुळे प्रकल्पाला अर्थसाहय्य करणार्‍यांची संख्या ईश्र्वरी योजनेनेच वाढू लागली. श्री. बन्सल नावाचे एक उद्योजक आले. त्यांनी मुलींसाठीचे सत्तर लाखाचे एक वसतिगृह बांधून दिले. आज प्रकल्पात प्रमाण शाळा आहे आणि प्रत्येक वर्गाला एक-एक देणगीदार मिळालेला आहे. शिक्षक आणि कर्मचार्‍यांसाठी उत्तमनिवासस्थाने आहेत. खेळाचे सुंदर मैदान आहे. उत्तमदर्जाची प्रयोगशाळा आहे आणि विद्यार्थ्यांचा संगणक कक्षदेखील आहे. शेकडो वर्षे भटकंती करणार्‍यांची मुले आता शिकू लागली आहेत. शिकता शिकता आपली अस्मिता अधिक घट्ट करीत चालली आहेत. ‘मी या हिंदू समाजाचे अंग आहे. मी समाजाचा आहे आणि समाज माझा आहे. मी परका नाही, अनाथ नाही, आश्रित नाही, अनिकेत नाही,’ ही भावना त्यांच्यात निर्माण होऊ लागली आहे. दहावी होऊन आता तिसरी पिढी बाहेर पडली आहे.
 
दरवर्षी महाशिवरात्रीला यमगरवाडीला भटक्या समाजाचा मेळावा भरतो. भटकेश्र्वर या नावाने आपण शंकराचे मंदिर बांधले आहे. यमगरवाडीतील शिवरात्रीचे हे पंचवीसावे वर्ष होते. यावर्षीचा कार्यक्रम प्रकल्पाच्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अध्यात्मक्षेत्रातील लाहिरी गुरूजी आणि संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी या मेळाव्याला आले होते. त्यांच्या येण्याचे प्रयोजन थोडे वेगळे होते. प्रकल्पाच्या पुढच्या वाटचालीचा टप्पा म्हणून विश्र्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षणाचा एक प्रकल्प सुरू करायचा आहे. तुळजापूर जवळच संस्थेची जमीन आहे. या जमिनीवर भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. या चारही मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर यमगरवाडीला स्नेहमेळ्याचा कार्यक्रम सुरू झाला. प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याची भेट, केंद्रीय मंत्र्याची भेट याचे एक विशेष आहे. हे विशेष असे की, यापूर्वीच्या अनेक मुख्यमंत्र्यांना आम्ही बोलविले, परंतु ते त्यांनी टाळले. वैचारिक अस्पृश्यता अशी विदारक असते. हे काम समाजाचे आहे. समाजातील शेवटच्या पंगतीतील शेवटच्या माणसासाठी आहे. त्यात आमचा शून्य स्वार्थ असतो. परंतु, राजकीय पक्षांची दृष्टी तशी राहत नाही. सर्वसमावेशकता, उदारता, या विषयावरील भाषणे ठोकली जातात, तसे आचरण कुणी करत नाही. मंत्री आल्यामुळे शासनदरबारी भटके-विमुक्तांचे प्रश्न पोहोचले आणि त्यांच्या निराकरणासाठी शासनाने सक्रिय होण्याचे ठरविले आहे. हे कार्यक्रमाचे मोठे फलित समजले पाहिजे.
 
संस्थेकडे शून्य पैसे असताना प्रकल्प सुरू झाला. नंतर शब्दशः कोट्यवधी रूपये आले. पुढच्या प्रकल्पासाठी सुद्धा समाज पैसा देईल. पण असे प्रश्न केवळ पैसे देऊन सुटत नसतात. सर्व समाजात एक आत्मिय भावना निर्माण होणे फार आवश्यक आहे. आपल्या दारावर येणारा गोसावी, बहिरूपी, नंदी बैलवाला, मरीआईवाला हे आपलेच बांधव आहेत आणि त्यांना शिक्षण देणे, त्यांना एका गावात वसविणे, त्यांनाही विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना सामाजिक सन्मान देणे, हे आपल्या सर्वांचे कामआहे. कधी तुळजापूरला आलात तर यमगरवाडीला जरूर जा. ते ही एक सामाजिक तीर्थ आहे, हे लक्षात ठेवा. देवस्थानी दान दिले तर पुण्य लागते, सामाजिक तीर्थस्थानी दान दिले तर राष्ट्र मोठे होते.
 
 
 
 
 - रमेश पतंगे