तीनवेळा अपयशी ठरलेला तिशीतला करोडपती उद्योजक

    दिनांक  16-Feb-2018   श्रीकांत कोठावळे यांनी एकट्याने सुरू केलेल्या ‘किसान मंडी’ मध्ये आज ३३ हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. मित्रांकडून पैसे जमा करून गुंतवलेल्या ७० हजार रुपयांची उलाढाल आज २२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. एवढ्यावरच श्रीकांत कोठावळे थांबले नाहीत, तर त्यांनी इतर तरुणांना उद्योजक म्हणून सुद्धा घडवलेलं आहे.
 
आपला देश कृषिप्रधान देश आहे. जवळपास ६० टक्के लोक शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर आपली गुजराण करतात. मात्र, असं असूनही गेल्या काही वर्षांत भारतातील असंख्य शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कर्जाचे ओझे, निसर्गाची अवकृपा, मालाला नसणारा उठाव अशी अनेक कारणे यामागे दडली आहेत. खरंतर आपण फक्त उत्पादन करतो, मात्र त्याचं व्यवस्थित विपणन अर्थात मार्केटिंग करता न आल्याने आपल्या शेतकर्‍यांना पिकवता आलं, मात्र ते विकता आलं नाही. त्यात मध्ये मध्यस्थांचं मोठ्ठ जाळं असल्याने बिचार्‍या शेतकर्‍याला बाजारभाव मिळत नाही, तर सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचेपर्यंत आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांचं महाग झालेल्या भाज्या-फळांनी कंबरडं मोडलेलं असतं. हे चक्र भेदलंय एका सामान्य घरातील तरुणाने... त्याने ही साखळीच मोडीत काढली आणि स्वत:ची कंपनी सुरू करून शेतकर्‍यांच्या शेतमालाला थेट बाजारपेठ मिळवून दिली. अवघ्या ७० हजार रुपयांनी सुरू झालेली त्याची कंपनी आज २२ कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. श्रीकांत कोठावळे असं या तरुणाचं नाव. विशाल टाके या सहकार्‍यासोबत सुरू केलेल्या ’टेक ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’च्या माध्यमातून त्याने ही अनोखी किमया घडवली.
 
महाराष्ट्र राज्य परिवहन खात्यात म्हणजेच एसटीमध्ये वाहनचालक म्हणून कार्यरत असणारे चंद्रकांत कोठावळे यांना दोन मुले आणि दोन मुली. त्यातील श्रीकांत हा मोठा मुलगा. लहानपणापासूनच शाळेमध्ये प्रचंड हुशार असणार्‍या श्रीकांतने दहावीमध्ये टॉप केलं होतं. कोठावळे मूळचे तुळजापूरचे. लहानपणापासून श्रीकांत आपल्या मामा-काकांना शेतात राबताना पाहायचा. लहानग्या श्रीकांतला म्हणूनच शेतीत रस वाटू लागला. मुलं मोठ्ठं होऊन डॉक्टर, इंजिनिअर, पायलट, पोलीस होण्याचं स्वप्न पाहतात. मात्र, श्रीकांतला शेतकरी व्हायचं होतं. त्यासाठी त्याने सोलापूरच्या लोकमंगल महाविद्यालयात कृषी आणि जैवतंत्रज्ञानाचे धडे गिरवले. ’आंत्रप्रिन्युअर’ हा विषय घेऊन त्याने बी.एस्सी. पूर्ण केले. कॉलेज संपल्यानंतर कोणाच्या हाताखाली नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय करायचा, असं त्याने ठरवलं. व्यवसाय कसा करावा, हे अभ्यासण्यासाठी त्याने नेरुळच्या एका महाविद्यालयातून एमबीएची पदवी संपादन केली. कॉलेजमध्येच शिकत असताना त्याने वाशीच्या एपीएमसी बाजारपेठेत आपल्या ओळखी वाढवल्या. २०११ साली त्याने ऑनलाईन भाज्या विकायला सुरुवात केली. पहाटे चार वाजता उठून भाज्या आणण्यापासून ते घरोघरी भाज्या पोहोचविण्यापर्यंत श्रीकांत सारी कामे करू लागला. झोपायला ११ वाजायचे. अंग पूर्ण शिणून जायचं. मात्र, तरीही दुसर्‍या दिवशी पहाटे श्रीकांत त्याच उमेदीने नव्या दिवसाचं स्वागत करायचा.
 
धंद्यात जम बसत नव्हता म्हणून श्रीकांतने तीन महिन्यांसाठी धंदा बंद केला. काय चुका केल्या या अभ्यासल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आपण थेट ग्राहकांना माल देण्यापेक्षा मॉल्स, विक्रेते, पादचारी विक्रेते, हॉटेल्स यांना माल पुरवठा करूया. त्याप्रमाणे तो काम करू लागला. दोन वर्षे काम केल्यानंतर श्रीकांतला व्यवसायात एक मोठा फटका बसला. मोठ्ठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं. पोटापाण्याचा प्रश्न असल्याने कंपनी बंद करून नोकरी करण्याचा त्याने निर्णय घेतला. मात्र, मन नोकरीत रमत नव्हतं. दरम्यान त्याने ‘कार्स फॉर टुर्स डॉट कॉम’ नावाने कंपनी सुरू करून पर्यटनासाठी गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र, गाड्यांसाठी चालक मिळण्यास येणार्‍या अडचणी, फक्त आठ आण्यांसाठी करावी लागणारी ओढाताण श्रीकांतने अनुभवली. यापेक्षा आपला नाशवंत मालाचा व्यवसाय परवडला, असं त्याला मनोमन वाटू लागलं.
 
मात्र, परत व्यवसायात उतरलो आणि जर अपयशी ठरलो, तर मग आयुष्यात कोणताच व्यवसाय करू शकणार नाही, याची त्याला भीती वाटू लागली. दरम्यान श्रीकांतला विशाल टाके नावाचा मित्र भेटला. दोघांनी मिळून ‘टेक ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या अंतर्गत ’किसान मंडी’ नावाचा स्वत:चा ब्रॅण्ड प्रस्थापित केला. एका आठवड्यात ४० हजार रुपये एवढी पगाराची असणारी रक्कम कमावली. सोबतच्या सहकार्‍याचा २० हजार रुपये पगार सुद्धा कमावला आणि २० दिवसांच्या अवधीत एक लाख रुपये कमावून त्यातून गोदाम भाड्याने घेतले. हळूहळू सोलापूरमधील सांगोला, पुण्यातील सासवड, अहमदनगरमधलं श्रीगोंदा आणि सांगलीतील तासगाव येथे कलेक्शन सेंटर्स सुरू केली. आज ’किसान मंडी’ भारतासह मलेशिया, थायलंड, ओमान, कतार, दुबई, इंडोनेशिया अशा देशांत फळे निर्यात करतात, तर अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधून सफरचंद आयात करतात. दोन दिवसांपूर्वी जगभरातील तरुणाईने ’व्हॅलेन्टाईन डे’ साजरा केला. मात्र, एमबीए झालेल्या श्रीकांतला लग्नासाठी कोणी मुलगी द्यायला तयार नव्हतं. आपल्या मराठी समाजात भले दहा हजाराची नोकरी करणारा मुलगा चालेल, पण लाख रुपये कमावणारा उद्योजक जावई नकोसा असतो. ’‘एवढं शिकून ह्यो पोरगा माळवं का म्हणून ईकतोय?’’ असा प्रश्न प्रत्येक गावच्या माणसाला पडे. ग्रामीण भागात ‘माळवं’ म्हणजे ‘फळं.’ श्रीकांत कोठावळे यांनी एकट्याने सुरू केलेल्या ’किसान मंडी’ मध्ये आज ३३ हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. मित्रांकडून पैसे जमा करून गुंतवलेल्या ७० हजार रुपयांची उलाढाल आज २२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. एवढ्यावरच श्रीकांत कोठावळे थांबले नाहीत, तर त्यांनी इतर तरुणांना उद्योजक म्हणून सुद्धा घडवलेलं आहे. श्रीकांत यांनी स्वत:चा वर्गमित्र असणारा सचिन जुगदर याला सांगोल्याचं कलेक्शन सेंटर सुरू करून दिलं, तर सासवडला संतोष नावाच्या शेतकर्‍याला स्वत: सोबत घेऊन कलेक्शन सेंटर चालविण्यासाठी मार्गदर्शन केलं. संतोष आज महिन्याला दीड लाख रुपये कमावतो. किसान मंडी शेतकर्‍यांना खतं, कीटकनाशके पुरवते. त्यांना शेतीविषयी मार्गदर्शन केले जाते. फळशेतीविषयी माहिती दिली जाते. परिणामी, शेतकरी उत्तमफळशेती करून उत्पन्न मिळवतात. भारतातील आणि परदेशातील सुपर मार्केट्‌स, फळप्रक्रिया करणारे कारखानदार, घाऊक आणि किरकोळ विक्रेते, फेरीवाले, हॉटेल्स यांना ’किसान मंडी’च्या माध्यमातून उत्तमदर्जाची फळे पुरवितात. स्टार बझार, रिलायन्स फ्रेश, गोदरेज, बिग बास्केट, डि-मार्ट ही यातील काही मोठ्ठी नावे. श्रीकांत कोठावळेंसोबत विशाल टाके, सचिन जुगदर, नागेश कोठावळे हे सारे अवघ्या तिशीतले तरुण किसान मंडीला एका उंचीवर घेऊन जात आहेत. यातील श्रीकांत कोठावळे हे निर्यात, तर विशाल टाके आयात पाहतात.
 
तीन वेळा अपयशी होऊनसुद्धा आज श्रीकांत कोठावळे कोट्यवधींची उलाढाल करणारा ’किसान मंडी’सारखा ब्रॅण्ड प्रस्थापित करतात. तेदेखील अवघ्या सहा वर्षांत, हे वाखाणण्यासारखं आहे. देशातल्या शेतकर्‍यांना ‘किसान मंडी’सारख्या ब्रॅण्डची आणि श्रीकांत कोठावळेसारख्या कल्पक सहकार्‍याची गरज आहे.
 
 
- प्रमोद सावंत