’जनकल्याणा’चे शिल्पकार : कै. आप्पासाहेब वज्रम

16 Feb 2018 17:31:25

 

दैवयोगाने किंवा माझ्या दुर्दैवाने कै. आप्पासाहेब वज्रम यांच्या दर्शनाचा योग मला केवळ एकदाच आला. जनकल्याण रक्तपेढीमध्ये काम करण्यास प्रारंभ केल्यानंतर अगदी सुरुवातीच्या काही दिवसांतच आमचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी एकदा आम्हाला – मला व डॉ. आशुतोष काळे यांना – आप्पासाहेबांच्या घरी खास त्यांना भेटण्यासाठी म्हणून घेऊन गेले होते. ’जनकल्याण रक्तपेढीमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला आप्पासाहेब वज्रम समजले पाहिजेत’ हे डॉ. कुलकर्णींचं त्यावेळचं वाक्य अजूनही चांगलं लक्षात आहे. आमच्या या एकमेव भेटीमध्ये आम्हाला आप्पासाहेब पहायला मिळाले ते बऱ्यापैकी विकलांग अवस्थेत. पक्षाघात आणि पार्किंसन्सच्या व्याधींनी ते यावेळी ग्रस्त होते. बोलायला त्यांना खूप त्रास होत होता. पण इतकं असतानाही त्यांनी आम्हाला पुरेसा वेळ दिला. आमच्याशी अत्यंत आत्मीयतेने परिचय करुन घेतला. रक्तपेढीच्या कामाची विचारपूस केली. ’सध्या काय चाललंय’ या डॉ. कुलकर्णी यांनी सहज विचारलेल्या प्रश्नादाखल त्यांनी चटकन एक बाड काढून ते आम्हाला दाखवलं आणि आम्ही आश्चर्यचकित झालो, कारण अशा विकल शारीरिक अवस्थेतही आप्पासाहेब व्यस्त होते ते संत तुकारामांच्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद करण्यामध्ये. बहुतांश इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आजच्या पिढीला तुकोबांचे अभंग कसे समजतील, या प्रश्नाने केवळ हळहळून न थांबता, वय आणि व्याधी बाजुला ठेवून आप्पासाहेबांनी थेट त्यावरील उपाय करण्यास प्रारंभ केला होता. आप्पासाहेब वज्रमांच्या व्यक्तित्वाचा परिचय होण्यास खरे तर हा एकच प्रसंग पुरेसा होता.

त्यानंतरही वेगवेगळ्या कारणांनी अनेकांच्या अनुभवांतून आप्पासाहेब वज्रमांचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर वृद्धिंगत होत गेला. ’रक्तपेढीमध्ये काम करताना आप्पासाहेब वज्रम समजले पाहिजेत’ असं डॉ. कुलकर्णी यांनी म्हटलं असलं तरी जनकल्याण रक्तपेढीच्या कामातील आप्पासाहेबांचे योगदान हे त्यांच्या अनेक कर्तृत्वांपैकी एक होते हे विशेष. मूळचे कर्नाटकातील असलेले आप्पासाहेब तसे सर्वत्र परिचित होते ते कुशल स्थापत्य अभियंता म्हणून. प्रथम मुंबईमध्ये काही काळ नोकरी करुन त्यानंतर प्रदीर्घ काळ त्यांनी पुण्यात स्वतंत्र बांधकाम व्यवसाय केला. या कालावधीत स्थापत्य क्षेत्रात त्यांनी केलेली कामेही मानदंड ठरली. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील अजोड योगदानाबद्दल ’बिल्डर्स असोसिएशन ऑफ़ इंडिया’ चा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळालेला होता. याव्यतिरिक्त त्यांची असाधारण विद्वत्ता, आश्चर्यवत असं बहुभाषिकत्व, साहित्याची जाण आणि रसिकता आणि या सर्व गुणवत्तांबरोबर असलेला कमालीचा साधेपणा अन व्यवहारातील सहजता ही त्यांच्या सहवासात येणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असे. हा साधेपणा आला होता तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांतून. तरुण वयात संघाशी संबंध आलेल्या आणि पुढे काही काळ प्रचारक राहिलेल्या आप्पासाहेबांनी आपलं स्वयंसेवकत्व अखेरपर्यंत निष्ठेने पाळलं.
१९८३ साली जनकल्याण रक्तपेढीची स्थापना करतेवेळी या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये आप्पासाहेबांनी लक्ष घालावं असं संघाच्याच रचनेतून ठरलं होतं. त्यानुसार आप्पासाहेबांनी रक्तपेढीच्या पायाभरणीत केवळ लक्षच घातलं असं नव्हे तर स्वत:च्या घरचं काम असावं इतका मुबलक वेळ आणि आपली बुद्धिसंपदा त्यांनी या कामी खर्ची घातली. कै. वैद्य प. य. तथा दादा खडीवाले, डॉ. शरदभाऊ जोशी, डॉ. दिलीप वाणी, डॉ. अविनाश वाचासुंदर आणि आप्पासाहेब या सर्वांचेच जनकल्याण रक्तपेढीच्या उभारणीत मोलाचे योगदान होते. यातील आप्पासाहेब वगळता बाकी सर्वजण वैद्यक क्षेत्राशी संबंधित होते. आप्पासाहेबांचे वैशिष्ट्य असे की, रक्तपेढीच्या कामात आपली अंगभूत गुणवत्ता - म्हणजेच स्थापत्यविद्या, बहुभाषिकत्व, लेखनकौशल्य - ही तर त्यांनी वापरलीच पण याखेरीज कुठलीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना रक्तपेढीविज्ञानातील क्लिष्ट संज्ञाही त्यांनी कष्टपूर्वक आत्मसात करुन घेतल्या. याकरिता रक्तपेढीचे तत्कालीन संचालक आणि पॅथॉलॉजिस्ट डॉ. दिलीप वाणींसह त्यांनी रक्तपेढीविज्ञानासंदर्भातील अनेक परिषदांमधून स्वत: सहभाग घेतला. त्यांची ज्ञानलालसा जबरदस्त होती. डॉ. वाणींच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास अशा कार्यक्रमांत संपूर्ण दिवस खुर्चीला डिंक लावल्यासारखे ते बसून रहात, त्यांच्या हातातील नोटपॅड्स पूर्ण भरलेले असत. याशिवाय परिषदेचा ’दिवस’ संपला तरी त्यांचे काम मात्र संपत नसे. सर्व सत्रे संपल्यानंतर आपल्या शंकांची त्यांनी स्वतंत्र नोंद करुन ठेवलेली असे, ज्याकरिता ते पुन्हा एकदा डॉ. वाणींसमोर एखाद्या शिष्याने बसावे त्याप्रमाणे बसत आणि आपल्या शंकांचे पूर्ण समाधान झाल्याखेरीज उठत नसत. यामुळे लवकरच रक्तपेढीविज्ञानामध्येही एखाद्या डॉक्टरप्रमाणे त्यांचा अधिकार स्थापित झाला. आप्पासाहेब वज्रम हे नाव या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरही सुपरिचित झाले.


’इंडियन सोसायटी ऑफ़ ब्लड ट्रान्सफ़्यूजन ॲड इम्युनोहिमॅटोलॉजी’ (ISBTI) ही रक्तसंक्रमण क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणारी एक संस्था आहे. प्रदीर्घ काळ या संस्थेचे मुख्य कार्यालय चंदीगडला होते. ते एकाच ठिकाणी असु नये, त्याची अनेक केंद्रे असावीत हा विचार राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा मांडला तो आप्पासाहेबांनीच. नुसता विचार मांडुन ते थांबले नाहीत तर त्याचा सातत्याने पाठपुरावा करुन त्यांनी हे विकेंद्रीकरण घडवून आणले. प. बंगालमध्ये स्वेच्छा रक्तदान चळवळीचे विशेष काम आहे. या राज्यात कार्यरत असलेली सुप्रसिद्ध संस्था AVBD (Association of Voluntary Blood Donors, West Bengal) च्या वतीने दर पाच वर्षांनी एका राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन कोलकाता इथे करण्यात येत असते. स्वेच्छा रक्तदान चळवळीत मोलाचे योगदान देत असलेले भारतातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते या परिषदेसाठी आवर्जून हजेरी लावत असतात. एकूणच स्वेच्छा रक्तदान चळवळीत हे व्यासपीठ प्रतिष्ठेचे मानले जाते. या परिषदेतही आप्पासाहेबांना विषय मांडणी करण्यासाठी वक्ता म्हणून निमंत्रित केले जाई. इतका अधिकार आप्पासाहेबांनी आपल्या कामातून मिळवला होता.

वृत्तीने ज्ञानयोगी असलेल्या आप्पासाहेबांचा नित्याचा व्यवहार मात्र अत्यंत साधेपणाचा असे. साध्यातल्या साध्या व्यक्तींनाही त्यांच्याशी संवाद करण्यास कधी दडपण येत नसे. आपल्या व्यावसायिक कामाच्या गरजेमुळे त्या काळातही सहजपणे विमानाने प्रवास करणारे आप्पासाहेब कोलकात्याच्या परिषदेला जाताना मात्र रक्तपेढीच्या कार्यकर्ता मंडळींसोबत आवर्जून रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाने तीसेक तासांचा प्रवास करुन जात. रक्तपेढीने पहिली बस खरेदी केली तेव्हा ती शोरूममधून रक्तपेढीत आणायला चालकदेखील उपलब्ध नव्हता, तेव्हा स्वत: आप्पासाहेबच ही बस चालवत रक्तपेढीत घेऊन आले होते. रक्तपेढीची प्रकाशने, माहितीपत्रके इ. मधील लेखन, भाषा, मजकूर या छोट्या बाबींकडेही आप्पासाहेबांचे बारिक लक्ष असे. जनकल्याण रक्तपेढी जुन्या शनिवार पेठेतील जागेतून स्वारगेटजवळच्या प्रशस्त जागेत आल्यानंतरही नवीन जागेच्या बांधकामावर त्यांची सातत्याने देखरेख असे. स्थापत्यशास्त्रातील आपले कौशल्य त्यांनी यावेळी पणाला लावले होते. त्यामुळेच रक्तपेढीची आज दिसणारी शानदार वास्तू उभी राहिली आहे. रक्तपेढीशी त्यांची गुंतवणूक ही अशी मनापासून होती. स्वभावत:च सामाजिक असल्याने रक्तपेढीचे जे जे काम म्हणून त्यांनी केले त्यात कुठल्याही प्रकारची कृत्रिमता कधीच आली नाही. समर्पण होते तेही अगदी सहजपणे, कर्तव्यभावनेतून आलेले. जनकल्याण रक्तपेढीचे आज समाजातील जे स्थान आहे त्यात आप्पासाहेबांचे निश्चितच असाधारण असे योगदान आहे. या योगदानाबद्दल जनकल्याण रक्तपेढीनेही ’जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करुन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली होती.

एक समृद्ध आणि तरीही समर्पित असे आयुष्य आप्पासाहेब जगले. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन अपार कष्ट घेत ती गोष्ट तडीस नेणे हा त्यांचा स्वभावच होता. म्हणूनच अखेरच्या दिवसांत व्याधीग्रस्त असतानाही ते कार्यमग्नच राहिले. दि. ७ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देह नश्वर आहे, तो कधीतरी थांबणारच. पण थांबण्यापूर्वी जी जीवने ’या देहाचे नक्की काय प्रयोजन असायला हवे’ हे आपल्या आचरणातून दाखवून देतात तीच जीवने खऱ्या अर्थाने सार्थक असतात. कै. आप्पासाहेबांचे जीवन हे अशाच सार्थक जीवनांपैकी होते. आप्पासाहेब हे सुविख्यात कवी कै. बा. भ. बोरकर यांचे जावई होते. कवी बोरकरांनीच म्हटलंय –
देखणा देहांत तो, जो सागरी सूर्यास्तसा

अग्निचा पेरून जातो, रात्रगर्भी वारसा


एका श्रेष्ठ कवीची देखण्या जीवनाबद्दलची आणि देखण्या देहांताबद्दलची ही काव्यात्म अनुभूति स्वत:च्या जावयाच्याच जीवनातून वास्तवात प्रकटावी, हा केवढा विलक्षण योगायोग. प्रांजळाचा आरसा असलेले व्यक्तिमत्व, नवनिर्मितीचे ’डोहळे’ असलेले हात, ’ध्यासपंथी’ चालणारी पाऊले, ’तृप्तीचे तीर्थोदक’ असलेले कृतार्थ जीवन आणि ’सागरी सूर्यास्तसा’ असलेला देहांत अशा सर्व काव्यानुभूति आप्पासाहेबांच्या रुपाने वास्तव जीवनात यथार्थपणे प्रकट झाल्या. त्यामुळे देहरुपाने आता आप्पासाहेब नसले तरी पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल असे आयुष्य जगुन ते गेले आहेत. त्यांनी पेरलेला अग्निचा वारसा आपल्या कार्यातून पुढे चालविण्याचे दायित्व आता आपले आहे. हा वारसा पेलण्याचे बळ त्यांच्या स्मृतींतून आपणाला मिळो !

- महेंद्र वाघ
Powered By Sangraha 9.0