प्रेम म्हणजे नक्की काय असतं?

    दिनांक  13-Feb-2018   
आयुष्य इतकं धकाधकीचं आणि त्यामुळे तांत्रिक झालं आहे, की मग प्रेमाचा म्हणून एक दिवस काढावा लागतो. तो दिवस तसा पाळावा लागतो. भावनांचं इतकं यांत्रिकीकरण आपण करून टाकलं आहे. म्हणजे प्लग लावला, स्वीच ऑन केला अन् झाला प्रवाह सुरू... लागला दिवा, लागला पंखा किंवा मग सुरू केले दुसरे कुठले उपकरण. प्लग काढून घेतला, झाला प्रवाह बंद... असे होते का मानवी भावनांच्या बाबत? प्रेमाचा, रागाचा, द्वेषाचा, मायेचा, ममतेचा, मोहाचा, क्रूरतेचा अन् शांततेचाही एक प्रवाह सतत सुरू असतो. तो तुमच्या हातात नसतो. त्यावर तुमचे नियंत्रण नसते. आता ‘मी’ म्हणजे काय, हा सवाल आहेच. ‘मी’ म्हणजे मन, भावना, बुद्धी की शरीर... की, मग या साऱ्यांचा समुच्चय म्हणजे ‘मी?’ खरंतर ‘मी’ असा वेगळा असा काहीच नसतो. हा ‘मी’ अनेक ठिकाणी विखुरलेला असतो. आपल्यातला हा ‘मी’ शोधायचा झाला अन् मग तो विसकळीत झालेला ‘मी’ एकत्र करायचा झाला, तर त्याचा शोध कुठे कुठे लागत जातो. आपल्याला कळतही नाही अशा ठिकाणी आपण आपल्याला सापडत जातो. ‘आईने के सौ टुकडे करके हमने देखें हैं, एकमेभी तनहा थें सौ मेभी अकेलें है...’ अशीच आमची स्थिती असते! ‘मी’च्या अस्तित्वाचे तुकडे जोडून एक आरसा तयार करायचा अन् मग त्यात आपलेच प्रतिबिंब बघायचे म्हणजे जगणे! आपणच आपल्याला असे विसकटून टाकत असतो अन् मग आवरत बसतो. ती आपणच आपल्याला विसकटून, आवरत आणि सावरत बसण्याची धडपड म्हणजेच जगणे! त्यात हाती काहीच लागत नाही, कारण आपण ‘मी’ नावाच्या प्रतिबिंबासाठीच तहानलेले असतो. ‘मी’ नावाचे सत्य आहे की आभास, ते कळतच नाही. ते सांगण्याच्या नावानं अन् ‘मी’चे दर्शन घडवून देण्याच्या मिशाने आध्यात्मिक आणि धार्मिक दुकानदारी सुरू होते आणि त्या गुंत्यात अडकलो की, मग सुटणे अवघडच होऊन बसत असते. एक नक्की की, आपला हा ‘मी’ खूप ठिकाणी सापडत असतो. मित्रा-स्नेह्यांत, आप्तांत, गोतावळ्यात... ही मानवी नाती झाली; पण ‘मी’ आपण बालपण घालविलेल्या गावातही सापडत जातो- आपल्या त्या शाळेत, बोरं चोरून तोडली त्या बागेत, आपल्या जन्माला साहाय्य करायला आलेल्या दाईच्या घराजवळ, अगदी खेळाचे मैदान, बाग, बसस्थानक... अशा कशा कशा ठिकाणी आपल्यातल्या ‘मी’चे तुकडे सांडलेले असतात. कारण ‘मी’ तिथे गुंतलेला असतो. तो गुंता सोडविण्यासाठी आणि ‘मी’ पूर्ण करण्यासाठी आपली धडपड सुरू असते. त्यामुळे आपण तळमळत असतो. रात्री कधीमधी झोप येत नाही, वय वाढत चाललं की, मग माणूस अधिकच स्मरणरंजनात अडकतो. कारण, जिवंत असण्याचा वेळ कमी होत चालल्याची भावना दाटून आलेली असते आणि मग धीर सुटतो. मग गुंतलेला हा ‘मी’ वर्तमानात अगदी ........इंटेस........ गुंतत असताना भूतकाळातून हाका देतो आणि आताचे समरस होणे थांबवीत असतो दुष्टासारखा. तुम्ही सखी किंवा सख्याशी रत असण्याच्या उत्कट क्षणांपर्यंत पोहोचत असतानाच, लहानपणी शेजारी राहणाऱ्या कुठल्यातरी आजीने फुलं दिली होती आणि म्हणाली होती, ‘‘तुझ्या आईला देऊन ये पूजेला...’’ अन् आपण खेळण्याच्या नादात फुलं तशीच मैदानाच्या कोपऱ्यात ठेवून दिली अन् विसरूनही गेल्याची खंत नेमकी त्या नाजूक क्षणी दाटून येते अन् समरस होण्याची आत्मीय तडफड, तार तुटावा सतारीचा अन् सूर विसकटून जावे तशी विसकटते.
आपल्यातला ‘मी’ असा आपल्याही नकळत कुठे कुठे गुंतलेला असतो, त्यालाच प्रेम म्हणतात! नेणिवेच्या पातळीवर ही गुंतवणूक झालेली असते. काटसावरीचा कापूस झाडावरून सुटतो आणि ते झाड उंच असल्याने वाऱ्यावर वाहात तो कापसाचा पुंजका, बोरी-बाभळीच्या काट्यांपासून शेतातल्या तुरीच्या तुराट्यांपर्यंत अनेक ठिकाणी अडकत जातो. आता तो कापूस या साऱ्यांतून वेचून एकत्र करण्यासारखे आपले हे ‘मी’चे कण अन् कण गोळा करणे आहे. आपले प्रेम हे असे अडकलेल्या ‘मी’ला सोडविणे आहे. जिथे आपल्याही नकळत आपली गुंतवणूक झालेली असते ते म्हणजे आपले प्रिय पात्र. तो आपला प्रियकर. मग लहानपण गेले ते गाव, ती शाळा, ते मास्तर, त्या वयातले मित्र... नंतर कधीही नाही भेटले, तरीही मासळीने पाण्याबाहेर अचानक उडी मारावी तशा त्यांच्या आठवणी उसळी मारतात अन् मग व्याकुळ करून टाकतात. प्रेम म्हणजे आणखी काय असते?
प्रेम म्हटले की, मग स्त्री- पुरुषातील संबंध असेच वाटते. आपण त्याचा शरीरसंबंधाशी बंध बांधून मोकळे झालो आहोत. पार्थिवाच्या पलीकडे प्रेम असते आणि अलीकडेही असते. म्हणजे जन्माच्या आधीही असते आणि मरणाच्या नंतरही असते. गोकुळातही असते, मथुरेतही असते... वसुदेवाच्या काळजीत ते असते तसेच ते कंसाच्या क्रौर्यातही असते. त्याला आठवा पुत्र मारायचा असतो आणि मग गिणती इकडून करायची की तिकडून, असा विचार आल्यावर तो सगळेच पुत्र मारत सुटतो... हा क्रूरपणा त्याच्या स्वत:च्या प्रगाढ प्रेमामुळेच असतो. माणूस दुसऱ्यावर प्रेम करतच नाही, तो स्वत:वरच करतो. ‘मी’वरच प्रेम करतो आपण. मग ‘मी’ कुठे कुठे अडकला, त्याचा शोध घेऊन त्याला सोडविणे. प्रेम म्हणजे अडकणे नाहीच, अडकलेल्या गुंत्यातून सुटण्याची धडपड म्हणजे प्रेम...!
आता स्त्री-पुरुषातले प्रेम म्हणजे केवळ शारीरच असते का? त्याचे भावबंध आणि मुळात त्यांची जी काय गरज असेल त्यानुसार भावबंध निर्माण होत असतात. मागे, ‘किस्त्रीम’मध्ये विनोदी लेखक वि. आ. बुवा वाचकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे द्यायचे. त्यांना एकाने विचारले होते, ‘‘प्रेम म्हणजे काय असते?’’ त्यांनी छान उत्तर दिले- ‘‘निसर्गाने त्याचे प्रजोत्पादनाचे कार्य साधून घेण्यासाठी नर आणि मादीला पाडलेली ती भूल असते...’’ शरीरसंबंध आणि प्रजोत्पादन या पलीकडे प्रेम नसते का? कस्तुरीमृगाच्या पोटात असलेल्या कस्तुरीसारखेच ते असते. तो मृग त्या कस्तुरीच्या गंधाने त्याचे मूळ शोधण्यासाठी पळत असतो. तो जिथे जातो, तो सुगंधाचा दरवळ पोहोचतो आणि तो अस्वस्थ होत जातो. ही पकडण्याची लढाई आणि आपल्याच जवळ ते आहे, याबाबतचे अज्ञान म्हणजेच प्रेम! ते मिळविण्याची धडपड म्हणजे प्रेम! एकदा ते मिळाल्यावर उरते ती ताबेदारीची भावना. स्वामित्वाची भावना. ताबा सुटू द्यायचा नसतो, त्याची धडपड म्हणजे आपण प्रेम समजतो. तो प्रेमाचा छद्मावेश झाला. त्यासाठी मग निष्ठा (योनी आणि लिंगनिष्ठा) वगैरेचा बागुलबोवा निर्माण केला जातो. हरिवंशराय बच्चन म्हणतात-
‘‘उस प्याली प्यार मुझे
जो अधरमुखसे हांला
उन हालांतोमे चाव मुझे
जो दूर अथेंलीसे हांला
प्यार पाने मे नही
पा जाने के अरमानोंमे है
गर पा जाता तो
इतनी अच्छी न लगती ये मधुशाला...’’
मिळत नाही तोवर तडफडा असतो. मिळालं की केवळ ताबेदारी उरते. मग ‘विश्वसुंदरी’ही बायको झाली, की तिनेही घराचा झाडू-पोछा करावा, अशीच आपली इच्छा असते! त्यालाच आपण प्रेम म्हणतो. शारीरनिष्ठांच्या नावाखाली एकमेकांना बांधून ठेवतो. त्यावरून प्रामाणिकपणा ठरवितो. पातिव्रत्य वगैरे नक्की करतो. यात कुठे आले प्रेम? हे तर स्वत:वरचे नीट प्रेम नाही. त्यात सतत स्वत:चाही छळ आहे. फसवणूक आहे. शरीराची ताबेदारी, योनी आणि लिंगनिष्ठता म्हणजे प्रेम नक्कीच नाही. तो व्यवहार असू शकतो. त्याच्या अलीकडे आणि पलीकडे जे काय उरतं त्याला प्रेम म्हणतात. बाकी सारी प्रेमाची प्रतीकं झालीत. प्रतीकं म्हणजे प्रेम नाही. परमेश्वर म्हणजे प्रेम आणि परमेश्वर म्हणजे ‘मी’ असतो. त्याचाच शोध आपण घेत राहतो. जिथे आपला हा ‘मी’ आपल्याला दिसतो तो परत मिळविण्यासाठी आपण प्रेम नावाची भूल निर्माण करतो. हा ‘मी’ मिळविण्याचा प्रयत्न करतो. तो मिळत नाही तोवर हे प्रेमनाट्य सुरू असते. एकदा मिळाला तो की, मग काहीच नको असते. ‘मी’वरचा ताबाच काय तो कायम ठेवायचा असतो. ताबा मिळविण्याचा, अप्राप्य ते प्राप्त करण्याचा सोहळा म्हणजे प्रेम! लैला-मजनू, शिरीन-फरहाद... आणि अशाच अनेक प्रेमवीरांच्या कहाण्या इतक्या हळव्या यासाठीच आहेत की, त्यांच्यातले हे मिळविण्याचे पर्वच अस्तित्वात आले. त्यांनाही एकमेकांवर ताबा मिळविता आला असता, तर त्यांच्या कहाण्या अजरामर झाल्या नसत्या. माझा ‘मी’ ज्याच्यात गुंतला आहे त्याचाही ‘मी’ तुमच्यात गुंतला असेल, तर प्रेमाचा प्रवाह सुरू होतो... एकुणात, ‘मी’ शोधणे आणि तो मिळविणे, त्याचे तुकडे जोडून आरसा पूर्ण करणे म्हणजे प्रेम...!