खंडित घर, उभे राहणार की पडणार?

    दिनांक  10-Feb-2018   

खंडित झालेले घर टिकू शकत नाही, जोरदार वादळ आल्यास किंवा अनपेक्षित पाऊस पडल्यास ते भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट झाली राहत्या घराविषयी. प्रादेशिक घर भुईसपाट करण्यासाठी उद्या शहरी नक्षलवादी कोणते आंदोलन हातात घेतील, कोणता हिंसाचार करतील, कशा प्रकारे जातीय भावनांना आग लावतील, हे फारच जागरूकपणे बघायला पाहिजे. असा सर्व घरफोडू लोकांना रोखण्याची एक शक्ती महाराष्ट्रात आहे.


शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती महाराष्ट्रात सर्वाधिक काळ टिकली. २०१४च्या निवडणुकीत ही युती तुटली. नंतर झालेल्या विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीतही शिवसेनेबरोबरची युती राहिली नाही. समविचारी पक्ष म्हणून भाजपला शिवसेनेने पाठिंबा दिला. शिवसेना सत्तेत सहभागी झाली. सत्तेत सहभागी राहून विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना बजावत राहिली. ‘सत्तेत राहून विरोध कसला करता? सत्ता सोडून विरोधी बाकावर या,’ असे टोले रोजच शिवसेनेला मारले जातात. राजकारण करायचं म्हटलं की, गेंड्याची कातडी पांघरावी लागते. कितीही दगड मारले तरी त्याचा साधा ओरखडादेखील उमटत नाही. जानेवारी महिन्यात शिवसेनेचे प्रतिनिधी संमेलन झाले. या प्रतिनिधी संमेलनात २०१९ची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलेला आहे. ‘‘भाजपवाले आपल्या घरात घुसले आहेत, त्यांना घरातून बाहेर हाकलले पाहिजे,’’ असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात. भाजपतदेखील शिवसेनेशी युती करू नये, असे सांगणारा प्रभावी गट आहे. शिवसेनेला तिची जागा दाखवून द्यायला पाहिजे. आपण स्वबळावर निवडणुका लढविल्या पाहिजेत. शिवसेनेची कुबडी घेण्याचे कारण नाही. भाजपतील काही लोकांना असे प्रामाणिकपणे वाटते.


शिवसेना आणि भाजप या दोघांवरही प्रेमकरणार्‍यांना काय वाटते? त्याचा विचार शिवसेनेचे नेते करत नाहीत आणि भाजपचे नेतेदेखील करताना दिसत नाहीत. शिवसेना आणि भाजप आपापसात लढल्यास काय होईल? हे पंचतंत्रकारांनी एका गोष्टीत सांगितलेले आहे. एका गावात दोन धष्ट-पुष्ट बैल राहत असतात. वनात त्यांना खायला भरपूर असते. परंतु, खाण्याच्या गवतावरून दोघांचे भांडण सुरू होते. ‘‘माझ्या वाट्याचे तू का खाल्ले? कालपर्यंत तू खात नव्हतास, आजच कसा आलास?’’ असे म्हणून त्यांचे भांडण सुरू झाले. दोघेही ताकदवर असल्यामुळे कुणीही हार मानण्यास तयार होईना. शिंग खूपसून खूपसून रक्तबंबाळ झाले. हे शब्दबाण नव्हते, ती खरोखरचीच शिंगे होती. शब्दाने मनाला जखमहोते, शिंगाने शरीराला जखमहोते. एका झुडुपामागे एक कोल्हा जिभल्या चाटीत दोन बैलांची झुंज पाहत बसला होता. त्याला माहीत होतं की, या दोघांपैकी एकतर हमखास मरणार, पण दुसराही वाचेल असे नाही, तोही प्रचंड जखमा होऊन मरणारच आहे. मला भरपूर दिवस पुरेल एवढे अन्न मिळणार आहे, म्हणून तो खूश होता. लढाई रंगायला आली की तो नाचायला लागायचा. काही वेळा ‘‘भान विसरून लढा, असेच लढा, अपमान सहन करू नका, दुय्यमजागा घेऊ नका,’’ वगैरे वगैरे तो सांगत राही.


पण, काय आश्र्चर्य! कोल्ह्याचा तो आशाळभूतपणा पाहून लढणारे दोन्ही बैल सावध झाले. आकाशातही त्यांची नजर गेली. डोक्यावर गिधाडे घिरट्या घालू लागली होती. लढून आपण मेल्यानंतर गिधाडे आणि कोल्ह्याचे भक्ष्य होणार, हे त्यांच्या लक्षात आले. बैल असल्यामुळे कदाचित लवकर लक्षात आले असेल. माणूस असता तर वेळ लागला असता. त्यांनी युद्ध थांबविले आणि एकमेकांची माफी मागून आपापल्या घरी गेले. जाण्यापूर्वी त्यांनी चरण्याचे आपले क्षेत्र निश्र्चित करून टाकले. दोघांनी ठरविले की, आपापसात जरूर भांडू, पण असे भांडण करणार नाही की, ज्यामुळे आपण कोल्हा आणि गिधाडांच्या भक्ष्यस्थानी पडू. शिवसेना आणि भाजप यांचे भांडण रोजच चालू असते. सभोवती काय घडते आहे, याचा ते अंदाज घेतात का? भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर ३ जानेवारीला महाराष्ट्रात काय घडले? आजवर आंबेडकरी जनता कधी अशा प्रकारे हिंसक झाली नव्हती. योजनाबद्ध रितीने लोकांना रस्त्यावर कोणी आणले? मुलांच्याही हातात दगड कोणी दिले? आघाडीवर महिलांना ठेवण्याची रणनीती कोणी केली? हा सर्व शहरी नक्षलवादाचा प्रकार आहे. आंबेडकरी जनता नक्षलवादी झाली असा त्याचा अर्थ नाही, परंतु ती नकळत नक्षली मंडळीच्या जाळ्यात अडकत चालली आहे. मार्क्सचे तत्त्वज्ञान सांगितले तर आंबेडकरी जनता ते स्वीकारणार नाही. परंतु, संविधानाचा विषय पुढे आणला तर तो लोकांना चटकन भावेल. म्हणून संविधान बचाव रॅलीचा धडाका चालू आहे. नाव बाबासाहेबांचे, अंगरखा नक्षलवाद्यांचा आणि डोके मार्क्सचे अशी ही रणनीती आहे. ही रणनीती न समजता, ‘तू मोठा की मी मोठा, तुमच्या जागा जास्त की माझ्या जागा जास्त, मला लाल दिव्याची गाडी... मग मला का नको,’ याच विषयात जर आपण अडकून पडणार असू तर आपण राज्य करण्यास अपात्र आहोत, असाच त्याचा अर्थ होईल.


महाराष्ट्राच्या राजकारणात उदंड पक्ष आहेत. परंतु, शिवसेना आणि भाजपच जातीधर्माचे राजकारण करीत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘आरक्षण बचाव’, ‘आरक्षण समर्थन’, ‘आरक्षण वृद्धी’, असल्या कोणत्याही भूमिका घेतल्या नाहीत. सर्व प्रकारच्या कल्याणाची भूमिका घेतली. जात-धर्म विसरण्यास लावणारी त्यांनी शिवछत्रपतींची मोठी रेषा काढली. त्यामुळे जातीधर्माच्या रेषा लहान झाल्या. या मोठ्या रेषेत हिंदुत्त्वाचा रंग भरला. विघातक राजकारण करणार्‍यांनी महाराजांना ‘मराठा राजा’ करून टाकले. ‘ब्राह्मणांचे शत्रू’ करून टाकले. मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळणारे सेक्युलर करून टाकले. ‘कोण होता शिवाजी’ अशा एकेरी नावाने उल्लेख करण्यापर्यंत काहींची मजल गेली. बाळासाहेबांची शिवसेना या सगळ्यांना पुरून उरली. एका बाजूला बाळासाहेब ठाकरे काय की भाजप काय, व्यापक राष्ट्रीय अस्मिता जागविण्याच्या कामी गुंतले असताना अन्य सर्व राजकीय पक्ष जातींच्या अस्मिता जागृत करण्यामध्ये एकमेकांचे स्पर्धक झालेले दिसतात. आंबेडकरी अस्मिता म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, मातंग अस्मिता म्हणजे अण्णाभाऊ साठे, चर्मकार अस्मिता म्हणजे रोहिदास आणि बाबू जगजीवन राम, ब्राह्मणी अस्मिता म्हणजे परशुराम, ओबीसीमध्ये असंख्य जाती आहेत, ही प्रत्येक जात त्यांच्या त्यांच्या कुलदैवतांच्या किंवा त्या जातीत जन्मलेल्या थोर पुरूषांच्या आधारे आपली अस्मिता प्रकट करताना दिसते. समाज जेव्हा आदर्शाच्या रूपाने छोट्या छोट्या गटात विभागला जातो, तेव्हा तो राष्ट्रीय ध्येयाचा विचार करीत नाही. राष्ट्रापेक्षा त्याला आपली जातीगत किंवा प्रादेशिक अस्मिता महत्त्वाची वाटते. प्रादेशिक अस्मितेचेदेखील विषय आहेत. त्यात भाषा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मराठी भाषा धोक्यात आहे, मराठी माणूस धोक्यात आहे, महाराष्ट्रात मराठी माणूस दुय्यमनागरिक होणार का? असली बांगबाजी केली की, ती ऐकायला देखील उदंड माणसे गोळा होतात. त्यांना ते खरे वाटू लागते. महाराष्ट्र आज अशा प्रकारे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अनेक तुकड्यात खंडित झालेला आहे. खंडित झालेले घर टिकू शकत नाही, जोरदार वादळ आल्यास किंवा अनपेक्षित पाऊस पडल्यास ते भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट झाली राहत्या घराविषयी. प्रादेशिक घर भुईसपाट करण्यासाठी उद्या शहरी नक्षलवादी कोणते आंदोलन हातात घेतील, कोणता हिंसाचार करतील, कशा प्रकारे जातीय भावनांना आग लावतील, हे फारच जागरूकपणे बघायला पाहिजे. असा सर्व घरफोडू लोकांना रोखण्याची एक शक्ती महाराष्ट्रात आहे. शिवसेना-भाजपची ही शक्ती आहे. दोन हायड्रोजनचे कण आणि एक ऑक्सिजनचा कण यांचे मिलन झाल्यास पाणी तयार होते. वातावरणात हायड्रोजनदेखील असतो आणि प्राणवायूदेखील असतो, परंतु त्याचे मिलन होत नसते. त्यामुळे रोज आपल्याला वातावरणात पाणी पडताना दिसत नाही.


निसर्गात जशी ही शक्ती आहे, तशी संघटनेतदेखील शक्ती असते. ती रोज दिसत असते. तिचे अणुबॉम्बच्या भाषेत सांगायचे तर ‘फ्यूजन’ किंवा ‘फिजन’ झाल्यास त्यातून महाप्रचंड ऊर्जा निर्माण होते. ‘फिजन’ किंवा ‘फ्यूजन’ घडवून आणण्यासाठी अनेक साहाय्यभूत घटक लागतात. महाराष्ट्राचा येणारा काळ खरोखरचं चिंता करावा असा आहे. जानेवारीपासून घडत चालेल्या घटना, रोज केली जाणारी वक्तव्ये, सुरू असलेली मोर्चेबांधणी, ही हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करणारी नाही. ही औरंगजेबी राजकारणाची पायाभरणी करणारी ठरण्याची शक्यता आहे. ही शक्यता टाळण्यासाठी खूप वर्षांपूर्वी वाचलेली एक चिनी गोष्ट सांगतो. एक शेतकरी आणि एक शिकारी शेजारी राहत होते. शिकार्‍याकडे शिकारी कुत्रे होते, शेतकर्‍याकडे बकर्‍या आणि मेंढ्या होत्या. शेजारी राहत असल्यामुळे शिकारी कुत्रे शेळ्या-मेंढ्याच्या मागे लागत, त्यांना जखमा करीत. आपल्या शेजार्‍याला शेतकरी सांगे की, ‘‘तू कुत्र्याची नीट व्यवस्था कर.’’ शिकारी ऐकून न ऐकल्यासारखे करीत. शेवटी वैतागून शेतकरी तक्रार घेऊन न्यायमूर्तीकडे गेला. न्यायमूर्ती त्याला म्हणाला, ‘‘तुझ्या तक्रारीवरून जर मी तुझ्या शेजार्‍याला शिक्षा केली, तर तो तुझा शत्रू होईल. तुला मित्र हवा की शत्रू हवा हे मला सांग.’’ शेतकरी म्हणाला,‘‘मला मित्र हवा.’’ न्यायमूर्ती म्हणाला,‘‘आता मी तुला एक युक्ती सांगतो, ती तू कर.’’ असे म्हणून न्यायमूर्ती शेतकर्‍याला कानात काहीतरी सांगतो.


दुसर्‍या दिवशी शेतकरी मेंढीची तीन लहान पिल्ले घेऊन शिकार्‍याच्या घरी जातो आणि त्याला सांगतो, ‘‘मी मुलांना खेळण्यासाठी आणलेले आहे.’’ मुलं खूश होतात. काही दिवसानंतर शिकारी कुत्र्यांना बांधून ठेवणारे पिंजरे आणतो आणि त्या पिंजर्‍यात कुत्र्यांना ठेवतो. शेतकरी आणि शिकार्‍याची मैत्री दिवसेंदिवस वाढत जाते. शिकारी शिकारीतला काही भाग शेतकर्‍याला देऊ लागतो. शेतकरीदेखील त्याच्या उत्पन्नातील काही भाग शिकार्‍याला देतो. भांडण न करता आनंदात दोघे राहतात.

भांडण न करता सुखाने कसे राहायचे हे अडाणी शेतकरी आणि अडाणी शिकारी यांना जर समजू शकते, तर लाखो कोटींचे राज्य चालविणार्‍यांना का समजू नये?


- रमेश पतंगे