तुरुंगात डांबल्याने पत्नीचा आजार व मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले...

09 Dec 2018 11:08:09

घरातील चिंतेचे वातावरण : जळगावचे निष्ठावंत संघ कार्यकर्ते प्रभाकर कुळकर्णी यांचा अनुभव


जळगाव : 
 
आणीबाणीच्या काळात अनेक कर्त्या पुरुषांना अनेक महिने कारागृहात डांबण्यात आले, त्या घरांची कशी परवड झाली, याचा संतापजनक अनुभव जळगाव येथील रा.स्व.संघ परिवारातील कार्यकर्ते, रेल्वेत सेवेत असलेले प्रभाकर त्र्यंबक कुळकर्णी (पी.टी. कुळकर्णी) यांनी आणि त्यांच्या आप्तजनांंनी घेतला आहे.
 
जूून 1975 मध्ये इंदिरा गांधींनी स्वत:चे पंतप्रधानपद वाचविण्यासाठी राज्यघटना, त्यातील सप्तस्वातंत्र्य, लोकशाहीतील मानवी जीवनमुल्यं पायदळी तुडवली,सेवाभावी कार्यकर्त्यांच्या बलाढ्य संघटनेवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली.
 
संघस्वयंसेवक व तत्कालीन जनसंघासह सर्वच विरोधी पक्षनेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांना अनिश्चित काळासाठी डांबले.... या अमानवी आणि क्रूर धोरणांमुळे कुुुलकर्णी अटकेत असल्याने साहजिकच पत्नी शैलजा यांच्या प्रकृतीकडे व मुलींच्या शिक्षणाकडे खूपच दुुर्ल़क्ष झाले. याची त्यांना अजूनही खंत आणि संताप आहे.
 
 
त्यांचा जन्म नेरी ता.जामनेर येथील. 10 ऑगस्ट 1934 चा. ते भगिरथ शाळेचे विद्यार्थी. वक्तृत्त्व स्पर्धेत सहभागी होण्याची गोडी लागली. या छंदामुळे ते शाळेत ओळखले जाऊ लागले.
 
खूप बक्षिसेही मिळवली. एस.एस.सी.झाल्यावर 1956 मध्ये ते रेल्वेत क्लर्क म्हणून रुजू झाले. प्रासंगिक उपक्रम आणि हिंदी दिनासह अनेक कार्यक्रमात ते सहभागी वक्ते असत.
 
 
1992 मध्ये ते ओ.एस./कार्यालय अधीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. सध्या ते जनाईनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहासमोर, इंद्रप्रस्थनगर, दूध संघ रोड येथे राहातात.
 
 
त्यांच्या समवेत उच्च विद्याविभूषित, कनिष्ठ कन्या योगिनी राजेंद्र जोशी, जावाई राजेंद्र (लघुलेखक, अमळनेर जिल्हा न्यायालय) , आणि नाती उगवती गायिका श्रुती आणि शर्वा या आहेत.
 
मोठ्या कन्या सौ. प्रज्ञा पुरुषोत्तम लाडसांगवीकर (बदलापूर) या दूरसंचारमध्ये सेवेत आहेत. मधल्या सौ.माधुरी कालिदास जोशी (अमळनेर)या सध्या पारोळा न्यायालयात सहायक अधीक्षक आहेत.
 
 
ते बालपणापासून संघ स्वयंसेवक, शिवाजीनगरातील फाटक चाळीत रहात असत. परिसरातील चंद्रगुप्त सायंशाखा, जुन्या जळगावातील शालिवाहन सायंशाखा, वाल्मिकनगरातील टागोर सायंशाखा येथेही त्यांची भेट वा उपस्थिती असायची.
 
 
आणीबाणी जारी होण्यापूर्वी मुख्य शिक्षक, शाखा कार्यवाह, शहर शारिरिक शिक्षण प्रमुख अशा जबाबदार्‍या त्यांच्याकडे आल्या होत्या. त्यांचे कनिष्ट बंधू देविदास हेही शिवाजीनगर शाखेचे स्वयंसेवक, पुढे लष्करात रुजू झाले...निवृत्तीनंतर तरुण वयात त्यांचा 1985 मध्ये मृत्यू झाला.
 
नाशिकला कारावासात असतांना घरच्यांना महिन्यातून एकदा भेट मिळे, पण अटकेमुळे निलंबन, पगार अर्धाच...साहजिकच पत्नी वा मुलींना नाशिकला भेटण्यास येणे सोबत व परिस्थितीअभावी शक्य नसे. त्यांची अवस्था मोठी दयनीय होती.
 
 
या काळात पत्नीला रेल्वेच्या दवाखान्यात उपचार घ्यावे लागले. डॉ.उल्हास कडूसकर, डॉ.शामला दातार आदींसह काही स्वयंसेवकांनी खूप मदत केली. सुधाकर मांढरे (रा.मायादेवीनगर, वीज मंडळातून निवृत्त) हे तर त्याकाळात वेश बदलून टक्कल करुन घरच्यांना भेटून धीर देत असे.
 
 
मुलींना पेढे खाववेनात
 
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सफाया झाला, अन् संंघावरची बंदी रद्द झाली. गिरीष बापट यांनी तर नस कापून घेत रक्ताचा टिळा लावत आनंद व्यक्त केला.
 
23 मार्चला सुटका झाल्यावर रेल्वेने जळगावला परतल्यावर स्थानकावर माता-भगिनींनी औक्षणासाठी एवढी प्रचंड गर्दी केली की त्यांना पदर पेटू नये, याची काळजी घेणे भाग पडले...पेढे एवढे वाटले गेले की, मुलींना पेढे खाववेनात.
 
प्रचंड मिरवणूक निघाली...रात्री साने गुरुजी रुग्णालयासमोर प्रचंड सभा होत सत्कार झाला. दुसर्‍या दिवशी रेल्वे कार्यालयात रुजू होतांनाही दणक्यात स्वागत झाले, अजूनही तो का़ळ स्मरणात आहे.
(प्रभाकर त्र्यंबक कुळकर्णी) 7588720924)
अटक होताच परिवाराला धक्का, घरात रडारड
 
आणीबाणीतील शिस्तीच्या नावाखालची हुकुमशाही पोलिसांनाही जाचक ठरली. कुळकर्णी यांना अटक करण्यासाठी वारंट काढलेले होते, पण त्यावर पत्ता नव्हता... कुळकर्णी म्हणजे हमखास बळीराम पेेठ पोलीस या अंदाजाने शोध घेत होते...पण ते सापडेनात...अखेर भुसावळला मध्य रेल्वे कार्यालयात त्यांना 28 जानेवारी 76 रोजी अटक झाली.
 
पोलिसांनी त्यांना फाटक चाळीतील घरी आणले...पत्नी शैलजा या फुफ्फुसाच्या विकाराने आजारी होत्या, त्यांना आणि अन्य आप्त व शेजार्‍यांना अनपेक्षित धक्काच बसला. घरात कर्ता अन्य कुणी नाही...चिंतीत होत पत्नी आणि लहानग्या तिन्ही मुली रडू लागल्या. शहर पोलीस ठाण्यात नेत नंतर रेल्वेने त्यांना नाशिकला नेण्यात आले.
यथाशक्ती कर्तव्य पार पाडा...
 
प्रतिकूल परिस्थितीत संघाप्रती वैचारिक निष्ठा आणि समाज व देशभक्तीची भावना कायम ठेवल्याने कुळकर्णी व त्यांच्या परिवाराला खूप सोसावे लागले.
 
या वयातही ते फिरायला जातात, ते रोज संघ शाखेत जातात. सध्या सत्तेत असलेल्यांनी या सत्वपरिक्षेचा आणि त्यागाचा अवमान करु नये, उपेक्षा करु नये. सर्वांनीच समाज व देशासाठी यथाशक्ती कर्तव्य पार पाडावे.
 
पत्नी शैलजा यांना दीड वर्ष पांचगणीला ठेवलेले होते. फुफ्फुसावर शस्त्रक्रिया झालेली होती. गतवर्षी 16 ऑक्टोबर 2017 ला त्यांचे निधन झाले आहे.
ज्योतिष, हस्तरेषा आणि भाषांचा अभ्यास
 
सकाळी संघशाखा, व्यायाम, वाचन, दुपारी मान्यवरांची बौद्धिके, सायंकाळी संघशाखा असा दिनक्रम असे. जिज्ञासा व मन रमण्यासाठी कुळकर्णी यांनी हस्तरेषा,ज्योतिष विज्ञान, योगासन यांचा अभ्यास केला. उर्दू, तामीळ, बंगाली, गुजराथी भाषाही ते बर्‍यापैकी शिकले. यशवंतराव केळकर यांनी उर्दू शिकत ती अनेकांना शिकवली.
अनेक दिग्गज नेते, कार्यकर्ते यांचा आनंददायी सहवास..
 
नाशिक कारागृहात 28 जानेवारी 1976 ते 23 मार्च 77 या 14 महिन्याचा कारावास त्यांनी भोगला. सुमारे 1200 स्थानबद्धांमध्ये तत्कालीन जनसंघाचे आश्वासक तरणेबांड नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, रा.स्व.संघाचे बाबाराव भिडे, प्रल्हादजी अभ्यंकर तसेच बाळासाहेब आपटे, मालेगावचे नानासाहेब पुणतांबेकर, अभाविपचे यशवंतराव केळकर, ठाण्याचे सतीश मराठे, जळगावचे प्रा.म.मो.केळकर, गजानन घाणेकर, नारायण तथा दादा मराठे, धरणगावचे रमेश महाजन, साकळीचे धोंडूअण्णा माळी, वरणगावचे डॉ.नागराज, शेंदुर्णीचे दिगंबर बारी, उत्तम थोरात, कुर्‍हा-काकोड्याचे अशोकराव फडके, कमलकिशोर गोयंका आदी कितीतरी मान्यवर होते.
Powered By Sangraha 9.0