‘मेड इन इंडिया’ जगात भारी

    दिनांक  09-Dec-2018   
भारतासारख्या देशात जिथे सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान होते, ते टाळण्यासाठी सुसज्ज असलेल्या नेक्सोनचे नाव आता जागतिक पातळीवरील वाहन उत्पादक क्षेत्रात गौरवाने घेतले जाईल.


ग्राहकांना संतुष्ट ठेवून व्यवसाय करणारा आणि नफ्यातील मोठा हिस्सा लोकहितासाठी दान करणारा टाटा समूह आता जागतिक पातळीवर विश्वासाच्या कसोटीवर उतरला आहे. टाटा मोटर्सची नेक्सोन कार अपघात चाचणीत (क्रॅश टेस्ट) पाच मानांकन मिळवणारी पहिली भारतीय बनावटीची कार ठरली आहे. ‘ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम’ (ग्लोबल एनसीएपी) या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चाचणी करणाऱ्या संस्थेने ‘एसयुव्ही टाटा नेक्सोन’ला पाच पैकी पाच गुण दिले आहेत. भारतीय बनावटीच्या ‘महिंद्रा माराझो’ला या संस्थेने चार मानांकन दिले आहेत. आनंद महिंद्रा यांनी रविवारी ट्विट करत टाटा समूहाचे अभिनंदन केले. आम्हीही लवकरच या यादीत पोहोचू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय वाहन उत्पादक हे इतर देशांपेक्षा कमी नाहीत, असा दावा त्यांनी यावेळी केला. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने मिळालेली मानांकने नक्कीच ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरतील. भारतीय वाहनांच्या निंदकांनाही त्यामुळे मोठी चपराक बसणार आहे. ऑगस्ट २०१८मध्ये झालेल्या वाहन चाचणीत याच कारला चार मानांकने मिळाली होती. त्यानंतर कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बदल करण्यात आले. गाडीच्या चारही चाकांमध्ये अॅन्टी लॉक ब्रेकिंग प्रणाली बसविण्यात आली. प्रत्येक सीट बेल्टमध्ये रिमायंडर देण्यात आले. गाडीत दोन एअरबॅग्ज देण्यात आल्या. या नव्याने दिलेल्या चाचणीत टाटा नेक्सोनला १७ पैकी १६.६ गुण मिळाले. भारतीय वाहन कंपन्यांसाठी हा मैलाचा दगड ठरला आहे. टाटा मोटर्सने याआधीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगला जम बसवला आहे. त्यात ही बातमी म्हणजे कंपनीच्या विस्ताराला अधिक वाव असल्याचे म्हटले जात आहे.

 

‘ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम’ (ग्लोबल एनसीएपी) ही २०१४ पासून जगभरातील वाहनांच्या विविध चाचण्या करते. टाटा नेक्सोनच्या समोर जगभरातील वाहनांचे आव्हान होते. त्या आव्हानास पात्र ठरत टाटा नेक्सोनने हा किताब मिळवला. ग्लोबल एनसीएपीच्या वेबसाईटवर या चाचणीचा व्हिडिओही उपलब्ध आहे. अपघात झाल्यानंतर गाडीच्या पुढचा भाग दबला गेला मात्र, चालकाच्या जागी ठेवण्यात आलेल्या पुतळ्याची एअरबॅगमुळे कोणतीही मोडतोड झालेली नाही. त्यानंतर टाटा मोटर्स आता नव्या दमासह बाजारात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याची घोषणा संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. टाटा मोटर्सचे लॅण्डरोव्हर निर्मित नवे उत्पादन ‘हॅरियर’ या कारवर लक्ष्य केंद्रित करून येत्या काळात पहिल्या तीन कंपन्यांच्या रांगेत जाऊन पोहोचण्याची रणनीती मुख्य कार्यकारी अधिकारी ग्वेटर बश्चेक यांनी आखली आहे. गेल्या काही काळापासून कंपनी ही योजना आखत असून आताची क्रॅश चाचणी त्याचीच एक झलक असल्याचे मानले जात आहे. टाटा मोटर्सकडे उत्पादनासाठी भरपूर क्षमता आहे. त्यानुसार २०१८ ते २०१९ या वर्षासाठी पहिल्या तीन स्थानांत येण्यासाठी टाटा मोटर्स प्रयत्नशील असणार आहे. सध्या मारुती सुझुकी मोटार उत्पादन क्षेत्रात अग्रस्थानी आहे. दुसरीकडे ऑगस्ट ते ऑक्टोबर या तिमाहीत मारुतीने १० लाख, ४४ हजार, ७४९ वाहनांची विक्री केली आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या ह्युंदाईने ३ लाख, २६ हजार, १७८ वाहनांची विक्री केली, तर १ लाख, ४५ हजार, ४६२ या आकड्यासह महिंद्रा तिसऱ्या स्थानावर आहे. टाटा मोटर्स १ लाख, ३८ हजार, ७३२ वाहनांच्या विक्रीसह चौथ्या स्थानी आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील विक्रीच्या वाढीवर भर देणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच या चाचणीत उत्तीर्ण झाल्याचा फायदाही कंपनीला होणार आहे. त्यातच टाटा समूहावर असलेला पिढ्यांपिढ्यांचा विश्वासही जोडीला आहेच. टाटा समूह अशा महत्त्वाकांक्षी प्रगतीसाठी ओळखला जातो. टाटा नॅनोही त्याचेच उदाहरण. भारतासारख्या देशात जिथे सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान होते, ते टाळण्यासाठी सुसज्ज असलेल्या नेक्सोनचे नाव आता जागतिक पातळीवरील वाहन उत्पादक क्षेत्रात गौरवाने घेतले जाईल, हे निश्चित. मात्र, हा किताब मिळवण्यासाठी इतका काळ लोटावा लागला हादेखील विचार करण्याचा भाग आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/