टिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरीकांचा रेल रोको

09 Dec 2018 18:03:11



टिटवाळा : टिटवाळाजवळील उभर्णी येथील वनखात्याच्या जागेवर अतिक्रमण करीत अनाधिकृतपणे कल्याण वनक्षेत्र हद्दीतील झालेल्या बांधकामांवर दोन दिवसांपूर्वी वनखात्याने धडक कारवाई करत सुमारे ३५०हुन अधिक बांधकामे भुई सपाट केली. या कारवाईच्या निषेधार्त उंभर्णी येथील बेघर झालेल्या नागरिकांनी रविवारी उंभर्णी फाट्याजवळ असलेल्या रेल्वे लाईनवर येऊन रेलरोको केले. यामुळे सुमारे २ तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

 

वनखात्याच्या उभर्णी संरक्षित वन सर्व्हे क्रं. २८अ या क्षेत्रात मध्ये वनखात्यांचे १५ हेक्टर क्षेत्र असुन या क्षेत्रातील अतिक्रमण करीत अनधिकृत बांधकाम असलेल्या घरधारक ३५० लोकांना वनखात्याने निष्कासनाच्या नोटीस दिल्या होत्या. पुरावे सादर करण्यासाठी अवधी दिला होता. नोटीसच्या मुद्दत संपल्याने शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास वन खात्याने फौज फाट्यासह उभर्णी वनखात्यांच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली बांधकामे हटवली. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही झाला. यामुळे भुमाफियाकडुन रूम विकत घेऊन फसवुणक झालेल्या रूम धारकांना आपल्या कुटुंबासह रस्त्यावर यावे लागले. ऐन थंडीच्या वातावरणात आपला संसार उघड्यावर आल्याने थंडीत कुडकुडत रात्र काढणाऱ्या या गरीब कुटुंबाचा संताप अनावर झाला. यातूनच रविवारी उद्रेक होत या बेघर कुटुंबातील नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे रोको केले. रेल्वे पोलिस आणि टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले यात रेल रोको करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या रेल रोकोमुळे सुमारे २ तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

 

वन खात्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून झालेली बांधकामे निष्कसीतकरून उभर्णी ,बल्याणी परीसरात असलेल्या वन खात्याची सुमारे ३० हेक्टर जमीन असुन त्या जागेवर झाडे लावणार आहेत असे समजते. असे असले तरी ही बांधकामे कोणाच्या कृपाआशीर्वादाने उभी राहिली याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्या बांधकामांवर वेळीच ज्यांनी अंकुश ठेवायला हवा होता. त्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल प्रशासकीय बाजूने आणि हजारो नागरिकांना बेघर केल्याबद्दल मानवतेचा दृष्टीकोण लक्षात घेता अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे का नोंद होऊ नये हा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0