आता दुचाकींचा विमा होणार स्वस्त

08 Dec 2018 19:45:24



नवी दिल्ली : दुचाकींच्या विमा हप्त्यावर हप्त्यावर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीच्या दरामध्ये कपात होण्याची शक्यता असल्याने दुचाकीस्वारांना आताच्या तुलनेत कमी विमा भरता येईल. केंद्र सरकारने या प्रकरणी पुढाकार घेतला आहे. दुचाकी खरेदी केल्यानंतर थर्ड पार्टी विमा खरेदी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

 

दुचाकी मालकाला गाडीच्या थर्ड पार्टी विम्यापोटी जी रक्कम द्यावी लागते, त्यावर सध्या १८ टक्के जीएसटी आकारला जातो. मात्र या दरात कपात करावी, अशी सूचना केंद्र सरकारकडून जीएसटी परिषदेला करण्यात येणार आहे. दुचाकींवरील या वाढत्या जीएसटी दराचा मुद्दा पंतप्रधान कार्यालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर याच कार्यालयात झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

दुचाकींवरील थर्ड पार्टी विम्यावर आकारण्यात येणारा कर कमी करण्याच्या दृष्टीने सुधारित दर सुचवावा, अशी सूचना आर्थिक सेवा विभागाला करण्यात आली आहे. या विभागाने सुधारित दर सुचविल्यानंतर जीएसटी परिषदेला तो प्रस्ताव सादर करण्यात येईल. दुचाकीचा विमा हा अनिवार्य असल्याने हा विमा घेण्यावाचून गत्यंतर नसते हे लक्षात घेऊन ही कपात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0