झोमॅटो ड्रोनद्वारे करणार फुड डिलिव्हरी

06 Dec 2018 14:48:19

 


 
 
 
नवी दिल्ली : झोमॅटो ही फूड ऑनलाईन डिलिव्हरी कंपनी भारतात लवकरच ड्रोनद्वारे फूड डिलिव्हरी करण्यास सुरुवात करणार आहे. या दिशेने झोमॅटोने तयारीला सुरुवात केली आहे. त्यासाठी झोमॅटोने लखनऊची एक स्टार्टअप कंपनी विकत घेतली आहे. ‘टेक इगल इनोवेशंस’ असे या स्टार्टअप कंपनीचे नाव आहे. ही स्टार्टअप कंपनी गेल्या काही वर्षांपासून ड्रोनच्या निर्मितीचे काम करत आहे. या टेक इगल कंपनीची खरेदी किती रुपयात करण्यात आली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
 
टेक इगल या कंपनीमुळे झोमॅटो हा हब टू हब डिलिव्हरी नेटवर्क बनेल, असा विश्वास झोमॅटोने दर्शविला आहे. आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी विक्रम सिंह मीणा यांनी टेक इगल या स्टार्टअप कंपनीची २०१५ साली स्थापना केली होती. २०१५ पासून ही कंपनी ड्रोननिर्मितीवर काम करत आहे. “५ किलोग्रॅम वजन असलेली एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पोहचवता येईल. अशी क्षमता असलेले मल्टी रोटर ड्रोन्सची निर्मिती करणे. हे आमचा सर्वात पहिला हेतू आहे. सध्या ड्रोननिर्मितीचे हे काम प्राथमिक टप्प्यात आहे. भविष्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचलणे आवश्यक होते. त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर करून ग्राहक आपली ऑर्डर ड्रोनद्वारे मिळण्याची अपेक्षा आमच्याकडून करू शकतात.” अशी माहिती झोमॅटोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी दिली. ७५ हजाकांहून अधिक रेस्टॉरंट्सशी झोमॅटो पार्टनर आहे. देशभरातील १०० हून अधिक शहरांमध्ये झोमॅटो फुड डिलिव्हरी करते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झोमॅटोने २ कोटींपेक्षा अधिक ऑर्डर्स घेतल्या होत्या. यावर्षी जानेवारीमध्ये झोमॅटोने फक्त ३५ लाख ऑर्डर घेतल्या होत्या.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0