साठ्ये महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सरकारी योजनांचे धडे

06 Dec 2018 14:29:36



शासनाच्या वरिष्ठ सहायक निदेशक वर्षा फडके यांनी केले मार्गदर्शन

 

मुंबई : साठ्ये कॉलेजमध्ये बीएमएम विभागाने आयोजित केलेला शिष्यवृत्तीवर आधारित योजनांची माहिती देणारा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून शासनाच्या वरिष्ठ सहायक निदेशक वर्षा फडके लाभल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या हितार्थ शासन कोणकोणत्या योजना राबवते, त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे, त्यांना त्याचा उपयोग कसा होऊ शकतो. याविषयी फडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

यावेळी फडके यांनी शासनाने विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना यांसारख्या अनेक योजनांची माहिती मुलांना दिली. तसेच या योजनांचा उपयोग कोणत्या निकषांवर घेता येऊ शकतो, याबद्दलही सखोल माहिती दिली. तर या सर्व योजनांसाठी ऑनलाईन फॉर्म कसे भरले जातात, त्याच्या सूचना कॉलेजमध्ये कशा जाहीर केल्या जातात, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी कॉलेजमधील या सर्व प्रक्रियेचे काम पाहणाऱ्या रवींद्र दांडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी साठ्ये कॉलेजचा बीएमएम विभाग नेहमीच अग्रेसर असतो. यासाठी विभागाद्वारे निरनिराळे उपक्रम आयोजित केले जातात. कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा म्हणजे सर्व कागदपत्रे, प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने यावेळेस हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे आणि उपप्राचार्य डॉ. मिलिंद जोशी व उपप्राचार्य प्रमोदिनी सावंत यांसमवेत बीएमएम विभागाचे समन्वयक गजेंद्र देवडा उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0