सकलांगांना दिशा दाखवणारी दिव्यांग

    दिनांक  06-Dec-2018   दिव्यांग असूनही मुली-महिलांचे शोषण, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, जुलूम-जबरदस्तीविरोधात आवाज बुलंद करणारी उत्तर प्रदेशमधील पायलची ही प्रेरककथा...

 

ना कमतरता तुझ्यात काही,

दे स्वतःला विश्वासाची हमी

जिंकणार तू हर एक पाऊल,

दे स्वतःला विश्वासाची हमी...!

 

कवितेच्या या चार ओळी उत्तर प्रदेशातील पायल कश्यप हिच्या बाबतीत अगदी सार्थकी ठरतात. पायलने बालपणापासून ते आतापर्यंत म्हणजेच वयाच्या ३०व्या वर्षापर्यंत स्वतःच्या इच्छाशक्तीच्या आणि चिकाटीच्या बळावर मोठमोठ्या समस्यांचा सामना केला. मुली-महिलांचे शोषण, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, जुलूम-जबरदस्तीविरोधात तिने नेहमीच आवाज बुलंद केला. यातूनच तिचे नाव उत्तर प्रदेश सरकारपर्यंत पोहोचले आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात तिचा सन्मानही करण्यात आला.

 

१५ सप्टेंबर, १९८८ रोजी पायलचा जन्म झाला. मूल जन्माला आले की, सगळ्यांनाच मनापासून आनंद होतो. मुले अडीच-तीन वर्षांची झाली की, चालायला आणि नंतर दुडूदुडू धावायला लागतात. पण, पायलच्या बाबतीत मात्र नियतीने म्हणा, भाग्याने म्हणा, बेजबाबदारपणाने म्हणा किंवा वैद्यकीय क्षेत्राच्या मर्यादेमुळे म्हणा, हे चालण्याचं-धावण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं. ती अडीच वर्षांची असतानाच तिला पोलियोसारख्या असाध्य आजाराने जखडले. पोलियो झाल्याने साहजिकच तिचे पाय अधू झाले. परिणामी दिव्यांगांकडे ज्या दृष्टीने पाहिले जाते, त्या दृष्टीने तिच्याकडेही पाहिले गेले. परंतु, स्वतःचे पाय निरुपयोगी झाल्यानंतरही पायल हरली नाही, खचली नाही. आपल्या आयुष्याच्या मार्गक्रमणात स्वतःच्या दिव्यांगतेला तिने कधी आडवे येऊ दिले नाही. पायलचे स्वतःचे आयुष्य सुरुवातीपासून संघर्षातच गेले. शैक्षणिक आणि आर्थिक सोयी-सुविधांच्या अभावामुळे, अडचणींमुळे तिने माध्यमिक शिक्षण आपल्यापेक्षा वयाने कमी आणि खालच्या वर्गात शिकणाऱ्या छोट्या-छोट्या मुलांची शिकवणी घेऊन पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने उच्च शिक्षणही घेतले. स्वतःचे शिक्षण खडतरपणे पूर्ण केल्याने तिला एकूणच परिस्थितीची जाणीव होणे स्वाभाविकच होते. म्हणूनच तिने कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गरीब मुलांना विनाशुल्क शिकवायला सुरुवात केली. पुढे वडिलांच्या निधनांतर स्वतःच्या भावा-बहिणींची काळजी घेण्याचे कामही तिने स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि ते व्यवस्थित निभावलेदेखील.

 

पायल दिव्यांग आहे, पण जे सक्षम असूनही अन्याय आणि अत्याचाराचा जाच सहन करत राहतात, त्याविरोधात चकार शब्दही काढत नाहीत, अशा समाजातील सगळ्याच सकलांगांना तिने आपल्या कामातून एक अनुकरणीय असा धडादेखील घालून दिला. तो म्हणजेच परस्परांच्या मदतीचा आणि राष्ट्रप्रेमाचा. राष्ट्रप्रेम तर पायलच्या धमन्यांत अगदी बालपणापासून जणू काही नदीच्या प्रवाहासारखे सळसळत होते. अर्थात, याची प्रचिती २००८ सालच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आली. तिने या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबच्या फाशीसाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिले. आपल्या देशात येऊन हल्ला करणाऱ्यांचा, देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्यांचा पाहुणचार बंद करा, असे ती म्हणाली. सोबतच अशा दहशतवाद्याला फाशी देण्यासाठी कोणी जल्लाद उपलब्ध नसेल, तर मी स्वतः कसाबला फाशी द्यायला इच्छुक असल्याचेही तिने बेदरकारपणे सांगितले. यातूनच तिच्यातल्या राष्ट्रप्रेमाची ज्वाला किती प्रखर असेल, हे कळते. मनात एका बाजूला राष्ट्रभक्तीची ज्योत पेटलेली असतानाच देशातल्या प्रत्येकाला शिक्षण मिळावे, हीदेखील पायलची इच्छा होती. म्हणूनच पायलने त्या दिशेने पावले उचलली. गरीब मुलांना विनाशुल्क शिक्षण मिळावे, त्यांच्या आयुष्यात शब्दांकांच्या वाती तेवाव्या म्हणून तिने काम सुरू केले. पायलने ‘एकता युवा शक्ती जनजागृती संस्थान’ नावाची एक संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून तिने काही मुली आणि मुलांना घेऊन शिक्षणाबरोबरच अभिव्यक्तीच्या अधिकाराच्या साहाय्याने भ्रष्टाचाराविरोधात लढाई उघडली. यासाठी तिने पथनाट्य, नाटिका, जनजागृती फेरी असे विविध उपक्रम राबवले. यातूनच पायलने समाजातील वाईट प्रथा-परंपरांविरोधात सातत्याने आवाज उठवला.

 

समाजातील मुली-महिलांच्या सन्मानासाठी लढण्याचा, झगडण्याचा विडा उचललेल्या पायलला अभिव्यक्ती, शिक्षण आणि देशाची मूल्ये काय आहेत, हे चांगल्याप्रकारे माहिती आहे. अभिव्यक्तीच्या अधिकाराचा एखाद्या शस्त्रासारखा वापर करत पायलने पश्चिम उत्तर प्रदेशात सातत्याने मुलींवर बंधने घालणाऱ्या तुघलकी फर्मानाविरोधात, जात आणि खाप पंचायतीविरोधात एक आव्हान उभे केले. मुलींना जीन्स पॅन्ट घालण्यास बंदी असल्याचा आदेश मागे एका जातपंचायतीने दिला होता. पायलने त्याचा कसून विरोध करत मुलींना जीन्स पॅन्ट घालायला बंदी केली, तर तोच नियम मुलांनाही लागू करण्याची मागणी केली. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याचेही तिने हिरीरीने समर्थन केले. अशाप्रकारे समाजातील मुलींना आणि मुलांना सन्मानाने आयुष्य कसे जगावे, शिक्षण घेणे किती गरजेचे आहे, हे शिकवण्याचे काम पायल चोखपणे करत आहे. कितीही संकटे आली तरी मागे न फिरता पराभूत न होणाऱ्या पायलला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/