पतधोरण आढावा बैठकीत व्याजदर स्थिर

05 Dec 2018 17:16:28


नवी दिल्ली : महागाई सावरत असली तरीही रिझर्व्ह बॅंकेंने व्याजदर स्थिर ठेवत पतधोरणात फेरबदल करण्यास नकार दिला आहे. बुधवारी दुपारी झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत लागू असलेले गृह, वाहन आणि अन्य किरकोळ कर्जांचे दर कायम राहणार आहेत.

 

रिझर्व्ह बॅंकेने विकासदर ७.४ टक्क्यांवर राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र एलएलआरमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे बॅंकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. सद्यस्थितीत एसएलआरचे दर १९.५ टक्के आहेत. यामध्ये कपात केल्यानंतर चलन तरलता वाढून कर्जांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी झालेल्या पतधोरण समितीत सहा सदस्यांनी व्याजदर स्थिर ठेवण्यासाठी मतदान केले. रेपो रेट दर स्थिर असल्याने गृहकर्ज व अन्य कर्जांचे दरही कायम राहणार आहेत. या वर्षात महागाई दर २.७ ते ३.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे तर पुढील वर्षासाठी तो ३.८ ते ४.२ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

 

रेपो रेटमध्ये कपात न झाल्याने ओद्योगिक क्षेत्रामध्ये निराशा दिसून आली. पतधोरण समितीची या वर्षातील पाचवी बैठक असून ३ डिसेंबरपासून सुरू आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीतही रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता. केंद्र सरकारसह झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतरची ही पतधोरण आढावा बैठक महत्वपूर्ण मानली जात होती.

 

डिजिटल कर्जांवर नियंत्रण येणार

 

डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभुमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नियामक मंडळ आणण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0