शेती, माती, गावगाडा बदलताना...

    दिनांक  05-Dec-2018   

 
 
तटस्थपणे जगाकडे आणि जगण्याकडे पाहण्याची थीअरी काय असली पाहिजे? तटस्थ आणि स्थितप्रज्ञ यात फरक आहे. ‘नसे दु:खात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा, भय-क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी...’ असे विनोबांनी गीताईत सांगितले आहे.
दु:खाचा उद्वेग नको आणि सुखाची लालसा नको... तरीही मग दु:ख आणि सुख या अवस्था आहेत, हे मान्य केलेले आहेच. ‘राशोमान’ या अकिरा कुरोसोवा या महान चित्रपट दिग्दर्शकाच्या चित्रपटाबद्दल मागेही एका लेखात विवेचन केले होते. एखादी घटना, प्रसंग आणि मग आयुष्यही केवळ असते. त्याची सुख-दु:ख, चांगले-वाईट, पाप-पुण्य अशी वर्गवारी आपण करत जातो. ती आपल्या गरजा आणि आयुष्याकडे आपण कसे पाहतो, त्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा दृष्टिकोन तयारच होतो मुळात आपल्यावर झालेल्या संस्कारांनी. मुळात आयुष्याची अन् घटनांची अशी वर्गवारी करणेच चूक आहे. ते नुसते असते. पांढरे-काळे असे काहीच नसते. घटना घटनाच असते. ती चूक, बरोबर, सत्य, असत्य, चांगली-वाईट असे काहीच नसते. त्यांच्याकडे आपण आपल्या मितीतून पाहतो म्हणून आपण त्यांवर आपले शेडस् थापत असतो. दृष्टिकोन लादत असतो. साप सापच असतो. तो घातक आहे, उपयोगाचा आहे, हे आपण ठरवितो. मुळात तो केवळ साप असतो. त्याच्या योनीतल्या प्राण्यांसाठी तो केवळ एक त्यांच्यासारखाच प्राणी असतो... ‘राशोमान’ची थीअरी हीच आहे. अर्थात ती कथालेखक रीनोसुके अकुटागवा यांची आहे.
 
 
जपानी लघुकथेचा पितामह मानतात त्याला! अफलातूनच आहे हे. आयुष्याकडे पाहण्याचा नितळ, पारदर्शक असा दृष्टिकोन देणारीच थीअरी आहे ही. स्थितप्रज्ञतेच्याही पलीकडे नेणारी ही दृष्टी आहे. स्थितप्रज्ञ होण्यासाठी आधी सुख आणि दु:ख या अवस्था आहेत, हे मान्य केलेले आहे. मग त्याच्या लालसेतून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला आहे. सुख, दु:ख असे काहीच नसते. आयुष्य हे केवळ आयुष्य असते. घटना ही केवळ घटनाच असते, इतकेच काय ते. अशा दृष्टिकोनातून पाहिले की मग उद्वेग आणि लालसा निर्माण होण्याचे काही कारणच उरत नाही...
 
 
 
मागच्या आठवड्यात नागपुरात अॅग्रो व्हिजन झाले. गेली दहा वर्षे ते होते आहे. आता त्याला मध्य भारतातील शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. शेती, माती आणि मग गावगाडा यात झालेल्या बदलांचा यथार्थ स्वीकार या ठिकाणी दिसतो. या वर्षी शेतीच्या पद्धतीत आणि संस्कृतीत झालेले बदल मोठ्या प्रामाणात दिसले. मग शेतीसमस्यांमुळे होणार्या आत्महत्यांची आठवण हकनाक आलीच. कर्जामुळे, आर्थिक ओढाताणीमुळे आत्महत्या होतात, असा पहिला निष्कर्ष आहे. मुळात शेतकर्यांच्या आत्महत्यांच्या कारणांचा शोध गेली चार-पाच दशके घेतला जात आहे आणि त्यावर उपायही केले जाण्याचा प्रयत्न होतो आहे. शेतकर्यांना मदतही करण्याची भावना विकसित होते आहे. कधीकाळी अव्वल शेती असलेली, आता मात्र शेतकरी बिच्चारा झालेला आहे. मग कधी कर्जमाफी केली जाते, त्यांना भाव वाढवून देण्याची, उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याची मागणी होते आणि कधी मग वैतागून शेतकर्यांचीच कशी चूक आहे, हेही म्हटले जाते. सोदाहरण पटवून देण्याचा प्रयत्नही केला जातो, तरीही आत्महत्या काही थांबत नाहीत.
 
शेतकर्यांच्या आत्महत्या या केवळ आर्थिक कारणांनीच होत आहेत, असे नाही. मुळात त्यामागे सांस्कृतिक भाव अधिक आहे. व्यवहारापेक्षाही भावना जास्त आहेत. शेती ही संस्कृती होती. आता ती नाही. गावखेडे म्हटले की आपण स्मरणरंजनात जातो. त्या काळचे टुमदार, नैसर्गिक असे गाव डोळ्यांसमोर येते. हिरवीगार डवरलेली शेते आणि दान पावलं मागत सकाळी येणारा वासुदेव डोळ्यांसमोर येतो. ‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं...’ म्हणत नवर्यासाठी शिदोरी घेऊन येणारी पार्वती येते डोळ्यांसमोर. आता ते सारं पुसलं गेलं आहे. कुडाला माती असलेली घरे आता खेड्यातही नाही. खेड्यातल्या माणसांचे भावजीवनही बदलले आहे, कारण गावजीवन बदलले आहे. बाजारीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आणि खासगीकरणाचे हे बदल आहेत. त्याचेच हे परिणाम आहेत. ते वाईट, चांगले असे नाही. ते आहेत. हे बदल पचविण्याचा प्रयत्न केला जातच नाही, असेही नाही. आमराया नष्ट झाल्या. आंबे हे वाटून दिले जात होते. ताक तर वाटलेच जात होते आणि ताकालाही किंमत आली आहे आणि आकर्षक पॅकमध्ये ताकही चांगल्या किमतीला विकले जात आहे. हे बदल व्यावसायिक आहेत. बदल केवळ एकाच क्षेत्रात होतात, असेही नाही. ते कुठल्याही क्षेत्रात होत असले, तरीही त्याचे पडसाद सार्याच क्षेत्रांत उमटत असतात. त्यांची वर्गवारी, प्रतवारी करण्यात काही अर्थ नाही. ते आहेत. चांगले, वाईट असे काहीच नाही. बदल केवळ बदल आहेत. जुने ते सगळेच चांगलेच होते आणि नवे जे काय होते आहे, ते वाईटच आहे, ही भावनाच मुळात चूक आहे.
 
 
‘आता आधीसारखं काहीच राहिलं नाही,’ असे सुस्कारे टाकले जात असतात. ते सार्याच बाबत असतात. शिक्षण, कला, गाव, संस्कृती, सण आणि ते साजरे करण्याच्या पद्धती... सार्याच बाबत बदल होत आहेत. होत राहणार आहेत. त्या बदलांशी जुळवून घेतच मानवी जीवनाचा प्रवाह वाहतो आहे. मानवीच कशाला, एकुणातच सजीवांच्या जीवनाचा प्रवाह बदल स्वीकारूनच समोर जात असतो. बदलांशी जो अडला तो मेला... शेतकरी असेच मरत आहेत. अर्थात, नव्याचा डोळसपणे स्वीकार करायला हवा. नवे तेच चांगले, असेही नाही. तरीही शेती, माती आणि गावगाडा यात बदल झाले आहेत. बालपण चांगलंच असतं, पण ते नेहमी भूतकाळ असतं. ज्याचं वर्तमान बाळ असतं त्यांना त्यातली गंमत कळत नाही. तरुणपण मग काय वाईट असतं? बालपण सरून गेल्याच्या दु:खात तरुणपण निसटून जात असतं. ‘‘शेतकर्यांनी नवे स्वीकारावे ना,’’ असे एकदा नितीन गडकरी बोलताना म्हणाले होते. गाव, शेती यांच्या जुन्या संस्कृतीशी घट्ट नाते सांगणार्या मनाला ते तेव्हा कसंसंच वाटलं होतं; पण आताचे अॅग्रो व्हिजन पाहताना हे जाणवलं की ती संस्कृती होती, पण आताचीही एक संस्कृतीच आहे ना! बदलाशी जुळवून घेतले नाही, तर मग संपावेच लागत असते.
 
 
आता पाणी कमी आहे, तर कमी पाण्याची शेती करण्याचे तंत्र आपोआपच विकसित होत जाईल. तशी पिकं घेतली जातील. परंपरागत पिकं बाजूला सारून आता फुलांच्या झाडापासून फर्निचरसाठी अत्यंत आवश्यक असणार्या कुठल्याशा त्या लाकडाचीही शेती आता दक्षिण भारतात केली जात आहे. ती आता आपल्या इकडेही केली जाऊ लागली आहे. समस्या ज्या क्षेत्राची आहे, तेच क्षेत्र त्यावर नकळत उपायदेखील शोधून काढील. हाच निसर्ग आहे. आपल्या आयुष्यात असणारी माणसंही बदलत असतात. ते बदल आपल्याला खुपणारे असले की मग वाईट वाटतात. असे बदलणे हे त्यांचे पर्यावरण असू शकते. तुम्हाला हवी तशीच ती माणसे कशी काय असणार? सापांसारखी उद्या माणसंही विषारी होऊ शकतात. ती केवळ विषारीच असतील. म्हणजे वाईट असतील किंवा चांगली असतील, असे नाही. या अवस्था स्वीकारल्या की आणि राशोमान थीअरीने जगाकडे, आसपासच्या माणसांकडे अन् बदलांकडे पाहिले की, मग त्रास होत नाही. राशोमान थीअरी कळली आणि अशाच काही माणसांच्या बदलांच्या त्रासातून मुक्ती झाली. अब्बास दाना बडौदी म्हणतो तेच खरे-
‘मौसमके साथ साथ बदल जाना चाहिये
खुशियॉं न हो तो फिर गमसे बहल जाना चाहिये
जिस रोशनी मे ठीकसे आँखे न खुल सके
उस रोशनीसे दूर निकल जाना चाहिये...’