फ्रान्सच्या मूल्यांचे काय?

    दिनांक  05-Dec-2018    
 
 
मूल्यांचे प्रतीक असलेला मरियनचा पुतळा. जो पुतळा राष्ट्रीय प्रतीक होता, त्या पुतळ्यावरही आज फ्रान्समध्ये आंदोलकांनी हल्ला चढवला. त्याची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. 
 
 
१७८९ साली फ्रान्समध्ये प्रस्थापित सत्ता उखडताना जी प्रसिद्ध क्रांती झाली, त्या क्रांतीच्या दरम्यान ‘स्टॅच्यू ऑफ मरियन’ला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुतेचे प्रतीक म्हणून पाहिले गेले. त्याआधी ही मूल्ये जगाला माहिती नव्हती, असे नाही. उलट स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीच्या कणाकणात आणि आपल्या इतिहासाच्या पानोपानी रूजलेली होती. तरीही या मूल्यांचे नाव घेतले की, अपवाद वगळता उत्तर येतेच की, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये फे्रंच राज्यक्रांतीची देण आहेत. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्समध्ये लोकांनी या मूल्यांसाठी संघर्ष केला आणि जगभराला या मूल्यांची देणगी दिली. याच आशयाचे अभ्यासक्रम शिकवलेही जातात. प्रश्न या मूल्यांवर उठला आहे. या मूल्यांच्या रूजण्यावर उठला आहे. त्याला कारणही आहे. गेली दोन-तीन शतके स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे गाणे गाणारे फ्रान्स आज अराजकतेच्या उंबरठ्यावर उभे आहे. इतके की, जी स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्ये फ्रान्सचे श्वासमंत्र होती, त्या मूल्यांचे प्रतीक असलेला मरियनचा पुतळा. जो पुतळा राष्ट्रीय प्रतीक होता, त्या पुतळ्यावरही आज फ्रान्समध्ये आंदोलकांनी हल्ला चढवला. त्याची नासधूस करण्याचा प्रयत्न केला.
 

मानवी मूल्यांचा जयघोष करणारा फ्रान्स आमचा देश आहे, असे कालपर्यंत सांगणारे फ्रान्सवासी गेल्या एक-दोन वर्षांपासून राष्ट्रीय प्रतीक तोडण्यापर्यंत देशापासून का दुरावले असतील? याचे कारण काय असावे? अतिस्वातंत्र्य? समतेचा कडेलोट. (वेगळा अर्थ मुळीच घेऊ नये. समता योग्यच आहे. पण निसर्गदत्त विषमतेला टाळून कसे चालेल?) की आर्थिक स्तरावर प्रचंड तफावत असतानाही जपावी लागलेली बंधुता यापैकी असे काय होते की, फ्रान्समध्ये सध्या हिंसक वातावरण पाहायला मिळते. फ्रान्समध्ये लोक इतके हिंसक का झाले असावेत? काही अभ्यासकांचे म्हणणे आहे की, सहा ते सात कोटींच्या आसपास फ्रान्सची लोकसंख्या आहे. या लोकसंख्येमध्ये ९० लाख लोक गरीब आहेत. गरीब म्हणजे अक्षरशः ‘नाही रे’ गटातले आहेत. छानछोकीत राहणे, मौज करणे, त्यासाठी आर्थिकता वगैरे कारणे बिलकुल न मानणे या गोष्टीत फ्रान्सचा मनमौजी युवक आणखी रंगीला झाला आहे. आज छानछोकीच्या राहण्याचा खर्च युवकांना म्हणे इथे परवडत नाही. त्यामुळे युवक रागावला आहे. फ्रान्समध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. त्याला विरोध करण्यासाठी लोक म्हणे रस्त्यावर उतरले. पण, प्रश्न हाच पडतो की, फ्रान्सच्या नागरिकांना इंधनवाढीचा इतका राग यावा की, त्यांनी थेट राष्ट्रीय प्रतिकाची मोडतोड करण्याचा देशद्रोह करावा? या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर वाटते की, हे प्रकरण वरवर दिसते तितके साधे नाही. कारण, आर्थिक परिस्थिती, आर्थिक विषमता त्यातही इंधनाचा दर वगैरे गोष्टी या स्प्रिंगसारख्याच असतात. उर्ध्वगती, अधोगती होतच असते. फ्रान्सच्या जनतेला हे समजत नसेल असे नाही. पण, तरीही केवळ इंधनवाढीचे कारण पुढे करुन युवकांनी देशाचे नुकसान केले.

 

यामागची कारणमीमांसा केली तर जाणवते की, फ्रान्सची प्रत्यक्ष स्वतःच्या देशाचे नुकसान करू इच्छिणारी पिढी कोणती मूल्यं जगत आहेत? ते स्वतंत्र आहेत, पण ते समानता नक्कीच मानत नसावेत. मग बंधुतेची तर बातच सोडास्वतःच्या भौतिक सुखापलीकडे या पिढीला देशाचे हित दिसत नाही. देश, त्या देशाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडण याविषयी ही पिढी अनभिज्ञ आहे का? की दंगे घडवणारे त्या मातीचे नाहीत? त्या संस्कृतीचे नाहीत? या दंग्याची चित्रफित पाहताना जाणवते की, दंगेखोरांनी तोंड झाकून घेतले होते. प्रचंड उन्मादात ते रस्तोरस्ती दहशत माजवत होते. हे कोण होते? या देशाचे युवक होते? प्रश्नचिन्ह! फ्रान्सचा इतिहास समजून घेताना निःसंशय जाणवत राहते की, इथे व्यक्ती सर्वप्रथम आहे. पण, या दंग्यामध्ये व्यक्तींनी व्यक्तीच्या कोणत्याही मूल्यांसाठी नाही, तर इंधनवाढ आणि महागाईसाठी देशाला वेठीस धरले. बरं, आंदोलनकर्त्यांची मागणी काय आहे तर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांना हटवा. देशाच्या राष्ट्रपतींना हटविण्यासाठी देशाला अराजकतेत ढकलणार्‍या नागरिकांचे काय करावे, हा प्रश्न फ्रान्स सरकारला पडला आहे. आणीबाणी लागू करावी की काय, असे त्यांनाही वाटते. इतकेच काय इंधनदर वाढीमुळे हिंसा झाली, हे कारण हिंसा समर्थक देतात. त्यामुळे फ्रान्सने इंधन दरवाढ मागेही घेतली. तसे पाहायला गेले तर अशाच प्रकारचे वातावरण फ्रान्समध्ये १९६८ साली झाले होते. पण, या आंदोनामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुतेचे नेमके काय झाले, हे अभ्यासनीय आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/