९२च्या पिढीने केलेली वैचारिक क्रांती...

05 Dec 2018 19:16:19
 

१९९२च्या पिढीने डोक्याला कफन बांधून अयोध्येत एक पराक्रम करून दाखविला. इतिहासाची पुनरावृत्ती करता येत नाही, करण्याची गरजही नाही. काळ बदलतो, नवीन परिस्थिती निर्माण होते, नवीन आव्हाने येतात. ती समजून नव्या पिढीने आपल्या सत्व रक्षणासाठी आणि आपल्या अस्मिता जागवण्यासाठी विषय हाती घ्यावे लागतात. ६ डिसेंबर ही त्याची आठवण करून देणारा दिवस आहे.

 

काळ आपल्या गतीने पुढे धावत असतो, बघता बघता बाबरी ढाचा जमीनदोस्त झालेल्या घटनेला ६ डिसेंबर २०१८ रोजी २६ वर्षे पूर्ण होतील. म्हणजे, १९९२ साली जे जन्मले ते आता २६ वर्षांचे असतील. १९९२च्या पिढीने हिंदू समाजाला अत्यंत गर्व वाटेल, अभिमान वाटेल आणि त्याची छाती फुलून येईल, अशी एक कृती केली. ही कृती आहे, प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानावर क्रूर, आक्रमक, इस्लामी पिसाट बाबराने रामाचे भव्य मंदिर पाडून मशिदीचे तीन घुमट उभे केले. हे तीन घुमट म्हणजे, हिंदू समाजाच्या डोक्यावर ठेवलेल्या तीन जळत्या भट्ट्या होत्या. घोर राष्ट्रीय अपमानाच्या त्या निशाण्या होत्या... काळ प्रतिकूल असताना या निशाण्या डोक्यावर घेत हिंदू समाजाला जगावे लागते. त्या जमीनदोस्त करण्याचा चारशे वर्ष त्यांनी प्रयत्न केला, अनेक लढे दिले, पण त्यात यश मिळाले नाही. सर्व सत्ता परमेश्वराची, त्याच्या इच्छेनेच जग चालतं, राम हा त्याचा अवतार अशी आपली श्रद्धा असते. रामाचीच इच्छा असेल की, आपल्या जन्मस्थानावर बाबराचे तीन घुमट राहावेत, त्याचीच इच्छा असेल की, हे घुमट हिंदू समाजाला त्याच्या अपमानाची आठवण करून देत राहावेत आणि त्याचीच इच्छा असेल की, हिंदू समाजाने विचार करावा की, मूठभर सैन्य घेऊन आलेला बाबर दिल्लीचा शहेनशहा का झाला? आमचे काय चुकले? आमची समाजरचना का बिघडली? आम्ही धर्मालाच अधर्म का मानायला लागलो? जाती-पाती-अस्पृश्यता आम्ही का निर्माण केली? लहान-सहान स्वार्थासाठी आपापसात का लढत बसलो? यातून जोपर्यंत उत्तरे सापडत नाहीत, तोपर्यंत रामानेच ठरविले असावे की, घुमट राहू द्यावे.

 

काळ सरकत गेला आणि नंतर हिंदू समाजात कठोर असे आत्मचिंतन सुरू झाले. आम्ही वारंवार परक्यांकडून का मार खात राहातो? आमचे राजकीय स्वातंत्र्य का जाते? आमच्या धर्मावर आणि संस्कृतीवर परधर्मीय आघात का करतात? या दोषांचे चिंतन सुरू झाले, आणि हिंदू समाज हळूहळू जागा होत गेला. आधुनिक काळात त्याला जागे करण्याचे काम महर्षी दयानंद, स्वामी रामतीर्थ, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय, महात्मा गांधी, नारायण गुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हेडगेवार या सर्वांनी केले. हिंदू समाज हळूहळू आपल्या कुंभकर्णी निद्रेतून जागा होत गेला. इंग्रज आपले नाहीत, तसेच परदेशातून आलेले बाबर, मुघल, तुर्क, अरब आणि त्यांचा इस्लाम आपला नाही, याची त्याला जाणीव होत गेली. तो आपले सत्व शोधू लागला. आपली मुळे कुठे आहेत, आपण कोण आहोत, आपले तत्त्वज्ञान कोणते, आपला वारसा कोणता याचा शोध तो घेत राहिला आणि हळूहळू एक हजार वर्षाच्या झोपेतून तो जागा होऊ लागला. हा जागृतीचा प्रवाह निरंतर वाहत राहिलेला आहे. कालौघात हे काम विश्व हिंदू परिषदेकडे आले. विश्व हिंदू परिषदेने, हिंदू समाजाचा विचार करता अनेक चमत्कार केलेले आहेत. त्यातील पहिला मोठा चमत्कार म्हणजे, हिंदू धर्मातील वेगवेगळ्या संत-महंत-आचार्य यांना एका व्यासपीठावर आणण्याचा. आपली आध्यात्मिक मते वेगवेगळी असली तरी, आपण सर्व हिंदूधर्मीय आहोत आणि हिंदू धर्मीयांसाठी जगात एकच देश आहे, त्याचे नाव भारत. तो जर राहिला, तर आपली धर्ममते राहातील, आध्यात्मिक मते राहातील. म्हणून आपल्याला एकजूट केली पाहिजे. राष्ट्रीय प्रश्नांवर सहमती केली पाहिजे आणि सर्वांनी मिळून हिंदू समाजाच्या हिताची कामे केली पाहिजेत.

 

या सर्व धर्माचार्यांच्या मुखातून ‘न हिंदू पतितो भवेत, हिंदवा सोदरा सर्वे। मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता’ हे चार मंत्र वदवून घेतले. ‘हिंदू’ असण्याची ही या काळाची परिभाषा झाली. श्रीगुरुजी आणि अशोकजी सिंघल यांचे या संदर्भातील काम युगप्रवर्तक आहे. त्यांच्या कामाचा परिणाम म्हणून १९८६ सालापासून विश्व हिंदू परिषदेने सर्व धर्माचार्यांना बरोबर घेऊन रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन उभे केले. ते चढत्या श्रेणीने तापत गेले. हिंदू जागृतीची लाट देशात उभी राहिली. १९९२ची पिढी ‘मी हिंदू आहे आणि कोणताही राष्ट्रीय अपमान मी सहन करणार नाही,’ या भावनेने पेटून उभी राहिली. प्रथम १९९० साली कारसेवा झाली. या कारसेवेला देशभरातून १९९०ची पिढी गेली. अयोध्येत आपले काय होईल, त्यांना माहीत नव्हते. सरकार मुलायमचे आणि मुलायमचे दुसरे नाव, ‘मुल्ला मुलायम’ असे होते. हिंदूंपेक्षा मुसलमानांच्या हिताची चिंता त्यांना अधिक होती. प्रश्न होता मुस्लीम मतांचा. मुसलमानांची मते मिळविण्यासाठी हिंदूंना ठोकणे आवश्यक आहे, असे तेव्हा मुल्ला मुलायम यांना वाटले आणि १९९०च्या कारसेवेत कोलकात्याचे तरुण वयाचे कोठारी बंधू मुलायमच्या गोळीबारात ठार झाले! अयोध्येत रामभक्तांचे रक्त सांडले. मुलायमच्या पोलिसांनी अशोक सिंघल यांच्या डोक्यावर काड्या मारल्या. ते रक्तबंबाळ झाले. सत्पुरुषांचे रक्त सांडू नये, असा आपला प्राचीन संकेत आहे. त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. या सांडलेल्या रक्तातून जी चेतना निर्माण झाली, जी वावटळ निर्माण झाली आणि नंतर जी त्सुनामी आली, त्यात मुल्ला मुलायम आडवे झाले. त्यांचे सरकार गेले. राम मंदिराचा विरोध करणार्‍या काँग्रेसचा उत्तर प्रदेशात सुपडा साफ झाला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे एकेक दिग्गज धाराशायी झाले. त्यावेळी केंद्रीय मंत्री होते, बुटासिंग. ते हरियाणातून उभे होते, तेही आपटले. तेव्हा ते म्हणाले, ”ही लढाई रामाविरुद्ध होती, त्यात मी कसा जिंकणार? मी तर अगदी लहान माणूस आहे.”

 

१९९० साली लालकृष्ण अडवाणी यांनी देशव्यापी रथयात्रा काढली. या यात्रेचे काय वर्णन करावे! अडवाणींच्या स्वागतासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हिंदू समाजाने इतिहासकाळात कधी केली नसेल, एवढी गर्दी केली. अडवाणींची अयोध्या रथयात्रा सर्व देशाचा राजकीय नकाशा बदलून टाकणारी ठरली. महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडीयात्रा काढली होती. या दांडीयात्रेने हिंदू समाजात चैतन्य निर्माण केले. तो निर्भय बनून रस्त्यावर येण्यास शिकला. हाच निर्भयतेचा वारसा अडवाणीजींनी पुढे नेला आणि वर उल्लेखलेला अयोध्येचा कारसेवेचा प्रसंग हा त्यानंतरचा प्रसंग आहे. पुन्हा ६ डिसेंबरला अयोध्येत कारसेवक एकत्र झाले. तेव्हा त्यात भाजपदेखील सामील झाली. उत्तर प्रदेशात सत्तांतरण घडले होते. कल्याणसिंग यांचे सरकार आले होते. मुल्ला मुलायमचे शासन गेले आणि रामभक्तांचे शासन आले. गोळीबाराची शक्यता शून्य झाली. तरीसुद्धा केंद्रात असलेले नरसिंहराव यांचे सरकार अयोध्येत कारसेवकांवर सैन्य घालू शकत होते. याची जाणीव असल्यामुळे ६ डिसेंबर, १९९२ रोजी अयोध्येत जे कारसेवेला गेले, त्यांनी आपल्या घरी सर्व निरवानिरव केली होती. आपण एका अशा कामासाठी आणि अशा ठिकाणी चाललो आहोत, जेथे काहीही घडू शकते. प्राणदेखील जाऊ शकतो आणि काय आश्चर्य, घरातील माता-भगिनी-पत्नी यांनी आपल्या पतीला, भावाला, मुलाला धैर्याने आणि शौर्याने निरोप दिला. त्यांच्याकडून अपेक्षा केल्या की, यश घेऊन या! डिसेंबर ६ ला खरं म्हणजे मंदिर उभारण्याची कारसेवा करायची होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याला परवानगी दिली नाही आणि कारसेवा कशी करावी, याचा आदेश दिला. तेथे जमलेल्या सर्व कारसेवकांनी कारसेवा कशी करायची, याचा निर्णय केला. ते बाबराच्या तिन्ही घुमटावर चढले आणि हिंदू समाजाच्या डोक्यावरील तीन जळत्या भट्ट्या हाताने बुक्के मारून, पायाने नाचून, दगडाने ठेचून आणि मिळेल त्या साधनाने जमीनदोस्त केल्या. हे घुमट जमीनदोस्त करावे, ही विश्व हिंदू परिषदेची योजना नव्हती, भाजपचीदेखील योजना नव्हती. क्रांती योजना करून होत नसते. फ्रेंच जनतेने १७८९ रोजी पॅरिसमधील बॅस्टाईल तुरुंग फोडला, ही फे्रंच राज्यक्रांंतीची सुरुवात समजण्यात येते. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध १६ डिसेंबर १७७३ रोजी बोस्टन बंदरातील टी पार्टीने झाली. या दोन्ही घटना पूर्वनियोजन करून झालेल्या नाहीत. जनतेने त्या उत्स्फूर्तपणे केलेल्या आहेत.

 

बाबरी ढाचा जमीनदोस्त करणे, यात म्हटले तर कसला पराक्रम नाही. एका तथाकथित मशिदीचे तीन घुमट पाडणे, यात कसला आला पराक्रम? पाकिस्तानमध्ये जाऊन लाहोर जिंकणे किंवा जेथे आपली तक्षशिला होती, तो भाग जिंकणे, हा पराक्रमाचा भाग म्हणता येईल. पण, तरीही बाबरी ढाचा पाडणे हा पराक्रमाचा विषय आहे. कारण, या दिवशी हिंदू समाजाने साडेचारशे वर्षांच्या अपमानाची निशाणी जमीनदोस्त केली. ही घटना त्या दिवसापुरती मर्यादित नाही, तिचा एक भविष्यकालीन संदेश आहे. तो संदेश असा की, आता इथून पुढे हिंदू समाज कोणत्याही अपमानाच्या खुणा आपल्या देहावर बाळगू इच्छित नाही. ही एक सुरुवात आहे. हिंदू समाजाच्या अपमानाच्या निशाण्या भरपूर आहेत. जागोजागी पाडली गेलेली मंदिरे या जशा अपमानाच्या निशाण्या आहेत, तशा आपल्याच धर्मातून आपलेच बांधव परधर्मात गेले आणि त्यांच्या माथ्यावर धार्मिक गुलामी आली, या देखील अपमानाच्या निशाण्या आहेत.

 

त्यांना धार्मिक गुलामीतून मोकळे करून पुन्हा आपल्या घरी सन्मानाने आणावे लागेल. एक बाबरी अपमानाची निशाणी मिटवून काय होणार? अशा शेकडो निशाण्या भविष्यकाळात मिटवाव्या लागतील. १९९२च्या पिढीने डोक्याला कफन बांधून अयोध्येत एक पराक्रम करून दाखविला. इतिहासाची पुनरावृत्ती करता येत नाही, करण्याची गरजही नाही. काळ बदलतो, नवीन परिस्थिती निर्माण होते, नवीन आव्हाने येतात. ती समजून नव्या पिढीने आपल्या सत्व रक्षणासाठी आणि आपल्या अस्मिता जागवण्यासाठी विषय हाती घ्यावे लागतात. ६ डिसेंबर ही त्याची आठवण करून देणारा दिवस आहे. अयोध्या आंदोलनाने भारताचा राजकीय नकाशा बदलला, असे जे वर लिहिले आहे म्हणजे काय केले, हे समजून घेतले पाहिजे. बाबरी ढाचा पडल्यानंतर अनेक लोकांनी मातम सुरू केला. तेव्हा ‘नवाकाळ’ने एक संपादकीय लिहिले होते. त्याचे शीर्षक होते, ‘भाडोत्री छाती कशाला पिटवून घेता?’ अनेक दिवस अंधार्‍या कोठडीत राहिल्यानंतर जर एखादा मनुष्य बाहेर आला, तर त्याला सूर्यप्रकाश सहन होत नाही, त्यामुळे तो डोळ्यावर हात धरतो. हजारो वर्षे मार खात जगण्याची सवय लागली, ‘जी हुजूर,’ ‘येस सर’ म्हणण्याची सवय लागली. कुर्निसात करणे आणि सॅल्यूट ठोकण्याची सवय लागली, जे जे परकीय ते ते चांगले आणि जे जे स्वकीय ते ते घाणेरडे, अशी मन:स्थिती झाली, त्यांना हिंदू समाजाचे तेज कसे सहन होणार? म्हणून अशा हुजर्‍या आणि कुर्निसाती लोकांचे आलाप गाढवाच्या ओरडण्यासारखे समजले पाहिजेत आणि हिंदू समाज तेच समजला. प्राचीन काळापासून आपली परंपरा सर्व उपासना पंथांचा आदर करणारी आहे. ज्याची जिथे श्रद्धा त्याने तिथे जावे, ज्याला जी देवता आवडेल, त्याची पूजा करावी. अशा प्रकारचे पूजा स्वातंत्र्य ही आपली खास ओळख आहे. यालाच घटनाकाराने ‘सेक्युलॅरिझम’ म्हटले आहे. तो आमच्या रक्तात आहे. परंतु, त्याचा अर्थ सत्ताधार्‍यांनी असा केला की, ‘जे जे हिंदू ते ते निंदू आणि जे जे मुस्लीम, ख्रिश्चन ते ते वंदू.’ त्यांना डोक्यावर घेऊ आणि हिंदूंना पायदळी तुडवू. बंधने हिंदूंवर घालू आणि मुसलमान, ख्रिश्चनांना मोकळे रान देऊ. हिंदू मंदिरे ताब्यात घेऊ, मशिदी आणि चर्चना हात लावणार नाही. यात्रांवर कर बसवू आणि हजला सबसिडी देऊ. हे सर्व करणे म्हणजे ‘सेक्युलॅरिझम’ असे सांगायला सुरुवात झाली. भाडोत्री, लाचार आणि पायचाटे विद्वानांनी त्यावर ग्रंथांचा आणि पुस्तकांचा रतीब घातला. १९९०च्या रथयात्रेने आणि १९९२च्या कारसेवेने या सर्वांचे थोबाड असे फोडले आहे की, ही सर्व मंडळी घरात आता पडलेले दात मोजत बसली आहेत. हिंदू समाजाला सेक्युलॅरिझम सांगणे म्हणजे, देवगडला जाऊन आंब्याचे महत्त्व सांगण्यासारखे आहे!

 

आज या बेगडी सेक्युलॅरिझमची भाषा कोणी करीत नाहीत. हिंदू समाजाचा प्रचंड द्वेष करणारे नेहरू-गांधी घराण्याचे वारस राहुल गांधी म्हणतात की, “मी जानवेधारी हिंदू आहे. मी ब्राह्मण आहे.” (पारश्याचा नातू असून, ब्राह्मण कसा? हे आपण विचारायचे नाही.) त्यांचे पोपट म्हणतात की, ”हिंदू धर्मावर बोलण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे. मोदी, उमा भारती आणि ॠतंभरा या ब्राह्मण नाहीत, म्हणून त्यांना हिंदू धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही.” ९० पूर्वी एखादा काँग्रेसचा नेता हिंदूंमधील ‘ह’ देखील उच्चारू शकत नव्हता आणि धर्मातील ‘ध’ देखील म्हणू शकत नव्हता. ९०च्या कारसेवेने एका गालावर एक हाणली आणि ९२च्या कारसेवेने दुसर्‍या गालावर हाणली. दारूची नशा खूप झाली की, अशा हाणाव्या लागतात, मग नशा थोडी खाली उतरते. तसे सेक्युलर व्हिस्की प्यायलेल्यांचे झाले. ६ डिसेंबर १९९२ने राजकारणाच्या राष्ट्रीयकरणाचा म्हणजे हिंदूकरणाचा मार्ग मोकळा केला. बाबरी ढाचा पडणे म्हणजे केवळ चुना, रेती, विटा खाली पडणे नव्हे, हे एक वैचारिक संक्रमण आहे. म्हणून ज्या पिढीने वैचारिक संक्रमणाचा, देशातील वैचारिक क्रांतीची पायाभरणी केली, त्या पिढीला सलाम! त्यातील अनेक जण आज दिवंगत झाले असतील, त्यांच्या सर्वांच्या स्मृतीस विनम्र प्रणाम आणि त्यातील जे आज हयात आहेत, त्यांनादेखील प्रणाम! त्यांनी एक मार्ग मोकळा केला आहे, त्यावरून त्यांच्यानंतर आलेली पिढी चालत गेली आहे, पुढे येणार्‍या पिढीलाही त्या मार्गावरून चालत जायचे आहे आणि त्याचे अंतिम गंतव्यस्थान भारतमातेला विश्वगुरूच्या पदावर बसविण्याचे आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0