‘गंभीर’ची निवृत्ती

    दिनांक  05-Dec-2018    
 
 
२०११ चे विश्वचषक, मुंबईतील गच्च भरलेले वानखेडे मैदान... भारत विरुद्ध श्रीलंकेचा अंतिम सामना... आधीच सेहवाग आणि सचिनची विकेट गेल्यानंतर हिरमुसलेले लाखो क्रिकेटप्रेमी... पण, त्यानंतर बंद झालेले टीव्ही पुन्हा सुरू झाले ते, गौतम गंभीरमुळेच. सलामीला येणारा हा फलंदाज त्या अंतिम सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आणि सगळ्यांची विकेट पडत असताना मैदानावर तटस्थ राहिला. एवढा शांत पण तेवढाच ‘गंभीर’ असा गौतम यानंतर कधी दिसलाच नाही, नेहमी आपल्या ‘अग्रेसिव्ह’ खेळीने मैदानावर राजासारखं राज्य करणाऱ्या गंभीरने संयमी खेळ करत, भारताला विश्वचषक जिंकून दिला. पण, या सगळ्याचं श्रेय धोनीचा हेलिकॉप्टर शॉट घेऊन गेला, ही गोष्टी वेगळी. मात्र, या आधीही गंभीरने भारतासाठी अनेक विजयरथ ओढले. २००८ च्या टी-२० विश्वचषकात भारताला जिंकून देण्यात गंभीरचा मोलाचा वाटा होता, या विश्वचषकात सगळ्यात जास्त धावा करणारा गंभीर हा एकमेव भारतीय खेळाडू होता आणि अर्थातच पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात आफ्रिदीला दिलेला तो ‘धक्का’ आजतागायत ना आफ्रिदी विसरला असेल, ना क्रिकेटचा चाहता. एवढं सगळं असलं तरी, त्याला २०११ नंतर भारतीय संघात आपलं स्थान टिकवता आलं नाही किंवा त्याला स्थान दिलं गेलं नाही... असो अखेर मंगळवारी क्रिकेटमधल्या या ‘गंभीर’ अशा गौतमने आपली निवृत्ती जाहीर केली आणि ती सुद्धा फेसबुकवरून. ही कदाचित सगळ्यात दुर्दैवी गोष्ट असावी, कोणत्याही खेळाडूकरिता की, आपल्या निवृत्तीची दखलही कोणी घेऊ नये. हे असं भाग्य बऱ्याच खेळाडूंच्या नशिबी आलं आहे. म्हणजे, ज्या खेळापासून आपली सुरुवात झाली, ज्या खेळावर आपणं जिवापाड प्रेम केलं, त्या खेळाडूचा, त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामनाही न व्हावा हे दुर्दैवीच... खरंतर २००३ साली आपल्या कारकिर्दीची सुरुवात गंभीरने एकदिवसीय सामन्यातून केली आणि त्याचवर्षी त्याने आपल्या आयुष्यातील पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला. त्यानंतर त्याने अनेक विक्रम आपल्या नावी कोरले. पण, २०१३ नंतर पुन्हा त्याला त्याच्या चाहत्यांनी भारताचा झेंडा असलेल्या निळ्याशार जर्सीत पाहिलं नाही. एकच गोष्ट मात्र बरी आहे की, त्याला निदान आपल्या निवृत्तीचा शेवटचा सामना हा आपल्याच घरच्या मैदानावर खेळायला मिळेल. सध्या सुरू असलेल्या रणजी सामन्यात अखेरचा सामना दिल्लीचं प्रतिनिधीत्व करताना गंभीर खेळेल... चला, निदान त्याच्या चाहत्यांना शेवटचं “गंभीर...गंभीर...” असं ओरडायची संधी तरी मिळेल...
 

शेरदिल गौतम

 

तम गंभीरने त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत विरोधी खेळाडूंचं सुख तर हिरावून घेतलंच होतं, पण त्याच्या एका विशिष्ट ‘शैली’त तो भारताचा (गांगुलीचा) एक प्रमुख शिलेदारही झाला होता. विशेषत: २००९ ते २०११ हा काळ गंभीरसाठी खास होता, कारण खेळाडू म्हणून क्रिकेटप्रेमींना त्याची एक ‘खास खेळी’ पाहायला मिळाली. २००९ मध्ये गंभीरने एकामागोमाग एक पाच शतकं ठोकली आणि असं करणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्यानंतर विराट कोहलीने असे अनेकदा केले, हा भाग सोडला तरीही या विक्रमाचा पहिला मानकरी हा गंभीरच. त्यानंतर तो थांबलाच नाही. २०१० मध्ये त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचं कर्णधारपद दिलं गेलं आणि त्याने त्या संधीचं अगदी सोनं केलं. पाच सामन्यांची मालिका गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने ‘५-०’ असा व्हाईटवॉश देत जिंकली. त्यानंतर हा शेर मैदानावर एक एक किमया करत गेला. जेवढा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गंभीरचा दबदबा होता, तसं त्याने आयपीएलही गाजवलं. मात्र, २०१३ नंतर संघात स्थान न मिळाल्यानंतर त्याने आपला मोर्चा फर्स्ट क्लास क्रिकेटकडे वळवला. एकेकाळी आंतरराष्ट्रीय कसोटी सामने गाजवलेल्या गंभीरने रणजीसाठी दिल्लीचं कर्णधारपदही स्वीकारलं आणि त्याने आपल्या खेळाच्या जोरावर अनेकवेळा दिल्ली संघालाही तारलं. मात्र, अखेर तरुण खेळाडूंना ही संधी मिळावी म्हणून त्याने आपलं कर्णधारपद सोडलंही. असंच काहीसं त्याने मागच्यावर्षी आयपीएलच्या सामन्यात केलं, कर्णधार म्हणून दिल्लीसाठी एकही सामना जिंकता आला नाही म्हणूनही सर्व अपयशाची जबाबदारी स्वत:वर घेऊन त्याने कर्णधारपद सोडलं. जसं प्रत्येक खेळाडू आपल्या उमेदीच्या काळात अगदी सर्वोच्च स्थानी असतो, मात्र नंतर जसजसा खेळ बदलतो, तसतसा खेळही बदलत जातो. असंच काहीसं गंभीरच्या बाबतीतही घडलं. आपल्या या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत गंभीरने अनेक विक्रम केले, अनेक कारणांसाठी तो कधीकधी क्रिकेटच्या मैदानाबाहेरही चर्चेत आला, त्याचं ‘अग्रेशन’ही त्याच्या विरोधात गेलं. पण, असं असलं तरी, आजही गंभीरच्या फोरहँड शॉटला कोणीही टक्कर देऊ शकलेलं नाही... विश्वचषक, आयपीएल सर्वच गाजवून आज अखेर हा क्रिकेटच्या मैदानावरचा शेर निवृत्त झाला असला तरीही त्याचं फेअरवेल हे यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं झालं असतं. तरीही मैदानावर, पाच फूट उंचीचा, हाताने बॅट फिरवत येणारा गंभीर पाहणं नक्कीच त्याचा चाहतावर्ग मिस करेल...गुडबाय गंभीर...

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/