बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी अमित शाह यांनी दिली प्रतिक्रीया

05 Dec 2018 13:12:58
 

जयपुर : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी राजस्थानमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उधळल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी जयपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस पक्षावर निशाणा साधला.

 

राजस्थान आणि देशभरातील विविध घटनांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसेप्रकरणी विचारले असता ही दुर्भाग्यपूर्ण घटना असल्याचे सांगितले. योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले असून अधिकारी योग्य तपास करत असल्याचे म्हणत विरोधकांनी याचे राजकारण करू नये, असे सांगितले.

 

ते म्हणाले, कॉंग्रेसकडे याशिवाय दुसरा मुद्दा राजकारणासाठी नाही, जेव्हा तपास पथकांचा अहवाल येईल. तेव्हा सत्य सर्वांसमोर असेल. कॉंग्रेसने आत्तापर्यंत धर्म आणि जातीपातींचेच राजकारण केले. राजस्थानच्या निवडणूकीतही त्यांनी धर्माच्या नावावरच मते मागितली आहेत. कॉंग्रेसने अद्याप राजस्थानचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हे अद्याप ठरवलेले नाही. प्रत्येक उमेदवार स्वत: मुख्यमंत्री असल्याचे सांगून मते मागत आहे. त्यामुळे राजस्थानातील मतदारांना माहीत आहे कि, कॉंग्रेसकडे ना निती आहे ना नेते आहेत. मला पूर्ण विश्वास आहे कि, राजस्थानचे मतदार पूर्ण बहुमत असलेल्या सरकारलाच पाठींबा देतील. वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली पून्हा एकदा विकासपर्वासाठी भाजपवर विश्वास दाखवला जाईल., असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0