बुलंदशहर हिंसाचार : मुख्य आरोपी अटकेत

04 Dec 2018 14:30:09




 
 
बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात आली आहे. त्याने जमावाला भडकावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. गोहत्याप्रकरणाची पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही योगेश राजनेच दाखल केली होती.
 

बुलंदशहरात झालेल्या हिंसाचाराचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीसांकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या हिंसाचारप्रकरणी ८५ पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस निरिक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारजणांमध्ये मुख्य आरोपी योगेश राजचाही समावेश आहे.

 
वाचा संबंधित बातमी : गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशमध्ये उद्रेक  
 

हिंसाचार करणाऱ्या या जमावामध्ये सुमारे ३०० ते ४०० लोक होते. या जमावाने पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस उपनिरिक्षक सुरेश कुमार यांनी दिली. योगेश राज हा आपवल्या साथीदारांसोबत तेथे हजर होता. दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी हा जमाव पोलीस स्टेशनजवळ पोहोचला होता. पोलीस निरिक्षकांसह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी या संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावातील काही लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्या हातात शस्त्रास्त्र होती. त्यांनी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या हातातील पिस्तूल आणि मोबाईल फोन हिसकावला. तसेच वायरलेस सेटचीदेखील यावेळी तोडफोड करण्यात आली. योगेश राज याने या जमावाल भडकावत होता. असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

 

मी घटनास्थळी उपस्थित होतो, परंतु मी जमावाला भडकवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. हिंसाचार घडवण्याचा हा आमचा उद्देश नव्हता.असे स्पष्टीकरण योगेश राज यांने दिले. या हिंसाचार प्रकरणात शिखर अग्रवाल आणि उपेंद्र राघव हे आरोपी असल्याचेदेखील समोर आले आहे. हत्या करणे, हत्येचा प्रयत्न करणे, जमावाला भडकवणे आणि हिंसाचार घडवून आणणे अशा अनेक कलमांखाली या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0