मेकअपविरोधात ‘बंड’

    दिनांक  04-Dec-2018   


ग्लॅमर, ‘डिझायरेबल’ या सगळ्या जड इंग्रजी शब्दांच्या पाठोपाठ येते ती ‘वूमन.’ स्त्रियांच्या सौंदर्यावर स्त्रियांच्या अस्तित्वापेक्षा जास्त बोललं जातं. त्यात या सौंदर्याचा बाजार आलाच. यामुळे जगातील जवळजवळ ५० टक्के लोक या बाजारात आपला पैसा घालवतात किंवा या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. हे वापरणे काही गैर नाही, मात्र प्रत्येक स्त्रीने सुंदर दिसलंच पाहिजे, हा अट्टाहास कशासाठी? याच विचाराने दक्षिण कोरियात एक वेगळंच आंदोलन तिथल्या महिलांनी सुरू केलं. ते म्हणजे ’डिस्ट्रॉय मेकअप’.

 

मुळात दक्षिण कोरियासारख्या देशाने हे असे काहीतरी आंदोलन करावे, हे खरंतर हास्यास्पद. कारण, दक्षिण कोरिया सौंदर्यप्रसाधन निर्मितीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. एवढेच नाही तर एका इंग्रजी वृत्तपत्राने जाहीर केलेल्या सर्वेक्षणात दक्षिण कोरियन महिला या साधारण एक ते दोन तास नियमितपणे आरश्यासमोर घालवतात, असे उघड झाले होते आणि त्यांच्या सौंदर्यप्रसाधन खरेदीसाठीचा खर्च हा महिना २०० डॉलर्स एवढा आहे. या गोष्टी वाचून आपल्याला नवल नक्कीच वाटणार नाही, मात्र हा आवडीपेक्षा न्यूनगंडाचा भाग असल्याचेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. दक्षिण कोरियातील कृत्रिम संस्कृतीला असलेली मागणी ही त्यांच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा भाग आहे. दक्षिण कोरियातील ८० टक्के महिला या प्लास्टिक सर्जरीच्या अधीन आहेत, कारण आपण जसे आहोत, त्यापेक्षा अधिकाधिक चांगले दिसणे हा त्यांच्या मानसिकतेचा भाग झाला आणि मग रचले जातात चेहर्‍यावर मेकअपचे थरांवर थर. अखेर या परिस्थितीला वाचा फोडावी, असं लीना बेई हिला वाटलं आणि तिने ‘एस्केप द कॉर्सेट’ या हॅशटॅग अंतर्गत सर्व समाजमाध्यमांवर ही चळवळ पसरविण्याचा प्रयत्न केला.

 

असा काहीसा प्रकार भारतातही झाला होता, जेव्हा अभिनेता अभय देओलने अभिनेत्री व अभिनेत्यांनी सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिराती करण्यावर बंदी घालावी, असे आवाहन केले होते. हा विषय अनेक दिवस गाजलाही आणि काही चित्रपट कलाकारांनी याचे समर्थनही केले. पण, आजही अशी अनेक सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिराती आपण सतत टिव्हीच्या माध्यमातून पाहत असतो, त्याचा थेट परिणाम हा आपल्या मानसिकतेवर होत असतो. याच मुद्द्यावर स्वत: ब्युटी ब्लॉगर असलेल्या लीना बेई हिने एका व्हिडिओ स्वरूपात ’मी जशी आहे तशी बरी आहे, नको तो मेकअपचा थर,’ असा संदेश दिला आणि बघता बघता ही लाट संपूर्ण दक्षिण कोरियात पसरली. कथित बाजारू संकल्पनेविरोधातील हा लढा सुरू झाला. आतापर्यंत अनेक मुलींनी सौंदर्यप्रसाधने वापरणे बंद केले आणि याचा फटका अर्थातच दक्षिण कोरियातील सौंदर्यप्रसाधन बाजाराला बसला. कारण गाल, हनुवटी, डोळे, कान, दात, कपाळ शरीराचा असा कुठलाच अवयव नाही ज्याचं सौंदर्यीकरण कोरियात होत नसावं.

 

रशियन, चिनी, मंगोलिया आणि जपानी नागरिक प्लास्टिक सर्जरी आणि मेडिकल टूरिझमसाठी खास दक्षिण कोरियाला भेटी देतात. त्यामुळे या चळवळीत किम जाँग ऊन यांनीही भाग घेतला आणि युट्युब, इन्स्टा व ट्विटरवरील काही मजकूर त्यांनी उडवायला लावला, हे असं किम यांनी करणं अपेक्षित असलं तरी, या चळवळीची दखल त्यांनी घेतली, हेच या चळवळीचे यश म्हणता येईल. सौंदर्याच्या वाढत्या बाजारीकरणाचा परिणाम थेट महिलांच्या मानसिकतेवर होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे संपूर्ण जगात खरंतर ही चळवळ पसरायला हवी. जगभरात या सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीकरिता करोडो रुपये खर्च केला जातात आणि त्याकरिता सुंदर मॉडेल्स वापरल्या जातात. या सर्व गोष्टींचा काही प्रमाणात का होईना, महिलांच्या एकूणच विचारसरणीवर परिणाम झालेला दिसतो, त्यामुळे भारतातही या चळवळीने शिरकाव केला आणि सौंदर्याबद्दल खोटे दावे केल्याने भारतात सौंदर्यप्रसाधन कंपन्यांविरोधात न्यायालयात खटलेही दाखल करण्यात आले. त्यामुळे या मोहिमेमुळे हे सौंदर्यशास्त्राचे कथित टॅबू काही प्रमाणत तोडले जातायत हे विशेष...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/