समुद्री सीमांचे रक्षण करण्यास नौदल सक्षम

03 Dec 2018 17:03:50


 

नौदलप्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा यांचा विश्वास

नवी दिल्ली : मागील दहा वर्षांत भारतीय नौदलाने समुद्रातील जहाजांच्या लुटीचे ४४ प्रयत्न हाणून पडले असून १२० समुद्री चाच्यांना पकडले असल्याचे नौदलप्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. लांबा यांनी आपली वार्षिक पत्रकार परिषद घेऊन भारतीय नौदलाच्या कौतुकास्पद कामगिरीचा पाढा यावेळी वाचून दाखवला. भारतीय नौदल भारताच्या समुद्री सीमांचे रक्षण करण्यास सक्षम असल्याची खात्री त्यांनी यावेळी दिली.

 

यावेळी नौदलप्रमुख म्हणाले, नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी ५६ युद्धनौका आणि पाणबुड्यांचा समावेश करण्याचा विचार चालू आहे. सध्या चालू असलेल्या नवीन ३२ जहाजा व्यतिरिक्त या नवीन ५६ युद्धनौका असणार आहेत. भारताची सागरी ताकद वाढविण्यासाठी तिसरे विमान वाहक जहाज आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच तटीय सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, जवळजवळ २५ लक्ष मासेमारी बोटीवर स्वतः ओळख पटवणारे ट्रान्सपोटर लावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

अदनच्या खाडीत लुटारूंपासून जहाजे वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भारत, चीन या देशांसह ३२ देशांची नौदले संयुक्त टेहळणी करीत असून अनेक समुद्री चाच्यांना रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक ऑपरेशन्स केले आहेत. ऑक्टोबर २०१७ मध्ये भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस त्रिशूलने भारताच्या कार्गो जहाजाला लुटण्यापासून वाचवले होते.

 

अमेरिकन पर्यटक जॉन ऍलन चाऊ यांच्याविषयी देखील नौदलप्रमुखांनी भाष्य केले. ते म्हणाले, "सागरी किनाऱ्याचा हे अपशय नसून चाऊ हे अंदमान आणि निकोबर बेटांवर एक पर्यटक म्हणून आले होते. तसेच त्यांच्याकडे तिथे जाण्याचा परवानाही होता." याचबरोबर भारत-मालदीव या दोन्ही देशांमधील समुद्री सहयोग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. असेही ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0