कर्जबाजारी ते कन्या ‘बाजारी’

    दिनांक  03-Dec-2018   अफगाणिस्तानातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग न पत्करता स्वतःच्याच लेकरा-बाळांना विकण्याचा आणि त्यातून कर्जमुक्त होण्याचा मार्ग स्वीकारला. लहान मुलींची लग्नासाठी विक्री करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे अफगाणिस्तानातली बालविवाहाची प्रथा.


दुष्काळ असो वा युद्ध अथवा कोणतीही आपत्ती, त्याचा पहिला फटका बसतो तो बालकांना आणि मुलींना. गेली कित्येक वर्षे जागतिक महासत्तांच्या वर्चस्ववादाला बळी पडलेल्या अफगाणिस्तानमधली धक्कादायक आकडेवारी नुकतीच समोर आली. अफगाणिस्तानमध्ये दुष्काळाची समस्या एवढी तीव्र झाली आहे की, लोकांना आपली कर्जे चुकती करण्यासाठी आणि अन्नखरेदीसाठी स्वतःच्या छोट्या-छोट्या मुलींची लग्नासाठी विक्री करावी लागत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बालकहितासाठी कार्यरत संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार अफगाणिस्तानच्या हेरात आणि बगदीज प्रांतात एका महिन्याच्या मुलीपासून ते १६ वर्षांच्या मुलींची विक्री केल्याच्या १६१ घटना उघड झाल्या. ‘युनिसेफ’च्या प्रवक्त्या एलिसन पार्कर यांनी जिनिव्हामध्ये आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय संमेलनात ही माहिती दिली. जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत या घटना घडल्या असून विक्री करण्यात आलेल्या मुलींचे एकतर लग्न लावून देण्यात आले अथवा त्यांचे साखरपुडे उरकण्यात आले. हा सगळाच प्रकार या मुलींच्या पालकांनी कर्ज फेडण्यासाठी केला, हे खरे तर उद्वेगजनक तितकेच भीषण वास्तव. विक्री करण्यात आलेल्या मुलींच्या पालकांपैकी ८० टक्के कर्जबाजारी आहेत. दुष्काळ पडण्याआधी या सर्वांनाच यंदा शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. ज्यातून त्यांना आपल्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करता आला असता, पण निसर्गचक्र फिरले आणि त्या दुष्काळाच्या दाहात शेतकऱ्यांची स्वप्ने होरपळली. या होरपळीत शेकडो कळ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली आणि त्या कोणाच्या तरी बेगम, बिवी झाल्या. ज्या मुलींचे साखरपुडे उरकण्यात आले, त्यात कित्येकजणी तर काही महिन्यांपूर्वी जन्माला आलेल्या आहेत. याव्यतिरिक्त ११ वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींचे निकाहदेखील लावण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे या १६१ बालकांमध्ये ६ मुलेदेखील आहेत. विक्री करण्यात आलेल्या मुलांचा वापर मजुरी वा कामगार म्हणून करण्यात येणार आहे. कारण, अफगाणिस्तानध्ये लहान मुलांकडून बळजबरीने काम करून घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे.

 

दुसरीकडे शेतकरी कुठलाही आणि विकसनशील देशातला असला की, तो बऱ्याचदा नागवलाच जातो. आपल्या देशातली शेतकऱ्यांची परिस्थिती काही यापेक्षा वेगळी नाही. गेल्या काही दिवसांत दिल्लीसह ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चातूनदेखील ही गोष्ट स्पष्ट झाली. कित्येक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणापायी आत्महत्या केल्याच्या दुःखद घटनाही घडल्या. अफगाणिस्तानातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग न पत्करता स्वतःच्याच लेकरा-बाळांना विकण्याचा आणि त्यातून कर्जमुक्त होण्याचा मार्ग स्वीकारला. लहान मुलींची लग्नासाठी विक्री करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे अफगाणिस्तानातली बालविवाहाची प्रथा. इथे बालविवाह प्रथेची मुळं खोलवर रुजलेली आहेत. देशातली जवळपास ३५ टक्के आणि काही काही ठिकाणी तर ८० टक्क्यांपर्यंत लोकसंख्या आपापल्या मुला-मुलींची लहानपणीच लग्नं लावून देण्यात गुंतलेली आहे. दुर्भाग्याने याला दुष्काळ आणि युद्धाचीही साथ लाभली. आता या सगळ्याचीच किंमत इथल्या मुला-मुलींना चुकवावी लागत आहे. आणखी एक खेदजनक गोष्ट म्हणजे, लहान मुलींचे वृद्धांशी करण्यात येणारे निकाह. अफगाणिस्तानातील ‘व्हॉईस ऑफ वुमन’च्या सुराया पाकजाद यांनी सांगितले की, “आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी गरिबीत खितपत पडलेली कुटुंबे आपल्या घरातील ८ ते १२ वर्षे वयाच्या मुलींचा विवाह पैसे घेऊन म्हाताऱ्या वृद्धांशी करत आहेत. पण, अशा विवाहाला मुलींची मान्यताच नसते, तर त्यांच्यावर यासाठी जबरदस्ती केली जाते. मुलींच्या कुटुंबीयांशी संवाद साधला असता, त्यांचे म्हणणे असते की, आमच्याकडे मुलीला विकण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नाही. आमचे त्यांच्यावर प्रेम आहेच, पण आयुष्य जगायचंय म्हटल्यावर असे केलेच पाहिजे.” अफगाणिस्तानातल्या या घटनांतून दुष्काळाच्या झळा किती चटके देणाऱ्या असू शकतात, हे सिद्ध होते. तसेच ही परिस्थिती कधीतरी पालटू शकते का?, असा प्रश्नही उपस्थित होतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/