गणिताचा ‘इ-जिनिअस’ शिक्षक

    दिनांक  03-Dec-2018 
 

जिल्हा परिषदेच्या ‘या’ शिक्षकाकडून जगभरातील विद्यार्थी शिकत आहेत गणित

 

उस्मानाबाद : गणित म्हटले की भल्याभल्यांना पोटदुखी सुरु होते. गणित हा बहुतांश लोकांचा नावडता विषय! पण आता जगभरातील विद्यार्थांची गणिताविषयीची भीती पूर्णपणे नाहीशी होणार आहे. उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक प्रवीण बनकर यांनी फक्त गावातीलच नाही तर जगाच्या विविध कोपऱ्यातील विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण केली आहे.

 

प्रवीण बनकर हे यूट्यूबवरून निरनिराळ्या सोप्या पद्धती वापरून गणित शिकवितात. तब्बल ७६ लाख अभ्यासकांनी प्रवीण बनकर यांना सदिच्छा भेट दिली आहे. तसेच दीड लाखांहून अधिकजण प्रवीण बनकर यांच्या गणित शिकविण्याच्या पद्धतीचा अवलंब करत आहेत. प्रवीण बनकर यांच्या यूट्यूब चॅनेलचा प्रभाव जगभरातील अनेक विद्यार्थ्यांवर आहे. अनोख्या पद्धतीने गणित शिकविणाऱ्या या शिक्षकाच्या ४५० व्हिडिओजना अनेकांची पसंती मिळतेय. अवघड गणित सोप्या पद्धतीने सोडवून दाखविणाऱ्या प्रवीण बनकर यांना यूट्यूबकडून ‘सिल्वर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

 
प्रवीण बनकर हे गेल्या १२ वर्षांपासून गणित शिकवतात. उस्मानाबादच्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये गेल्या वर्षी त्यांनी तंत्रस्नेही शिक्षक म्हणून काम केले. यूट्यूब चॅनलचा वापर शिक्षण आणि प्रशिक्षणात कसा करावा, याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील इतर शिक्षकांना धडे दिले. ‘इ-जिनिअस’ असे प्रवीण बनकर यांच्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे. या यूट्यूब चॅनेलद्वारे त्यांनी इयत्ता पाचवीपासूनचे गणित आणि स्पर्धा परिक्षांमधील गणित, बुद्धिमत्ता आणि भूमितीतील काही प्रकरणे सोप्या पद्धतीने सोडवून दाखवली आहेत. इ-जिनिअस चॅनलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज्यभरातील सर्व स्पर्धा परिक्षांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी या चॅनलवर त्या परिक्षांची आदर्श उत्तरपत्रिका तयार असते. प्रवीण बनकर यांच्या चॅनलला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स लाभले आहेत.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/