हताश कॉंग्रेसचा तारणहार ‘कन्हैया!’

29 Dec 2018 09:17:56

 

 
परवापरवापर्यंत जे लोक प्रत्येकच कार्यक्रमात मंचावर विराजमान असायचे, ते लोक काल समोर प्रेक्षादीर्घेत बसले होते. ज्यांचे भाषण हा कुठल्याही कार्यक्रमाचा मुख्य भाग असायचा, ती मंडळी आज दुसर्याच कुणाचे तरी उद्बोधन ऐकण्यासाठी दाटीवाटीने गर्दी करून बसली होती. यांनी ठोकायची अन्इतरांनी टाळ्या पिटायच्या, हा प्रघात मोडला गेला होता. कुणी माजी मंत्री, कुणी माजी आमदार, कुणी भविष्यात आमदार, खासदार बनण्याचे स्वप्न बघणारे... अशा सर्वांनाच जणू त्यांचा राजकीय तारणहार गवसल्याच्या थाटातले समाधान त्यांच्या चेहर्यांवर ओसंडून वाहात होते.
 

गेल्या निवडणुकीत झालेल्या हाराकिरीनंतर, सत्ता हातून गेल्यानंतर, राहुल गांधींसारखा नवा चेहरा नेतृत्व म्हणून समोर आल्यानंतरही तुरळक अपवाद वगळता, निवडणुकीतला विजय अजूनही नजरेच्या टप्प्यात दिसत नसल्याचे बघून अस्वस्थ झालेल्या, विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांना परवा अचानक एक निमित्त गवसले. त्या संधीचे जणू सोने करण्यासाठीची धडपड चालली होती सर्वांचीच. कधी नव्हे ते, विविध गटांमध्ये विखुरलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा मानस केला. इलाजच राहिला नाही आता दुसरा कुठला! त्यामुळे तो निर्धार प्रत्यक्षात साकारण्यासाठीचा प्रयास आरंभला गेला. हातून निसटलेली सत्ता पुन्हा काबीज करण्याचे स्वप्न साकार करायचे तर हे आपल्या एकट्याचे काम राहिले नसल्याचे वास्तव कॉंग्रेस नेत्यांच्या ध्यानात आले आहेशतकाहून अधिक काळाचा इतिहास लाभलेल्या या पक्षाचे, मी मी म्हणवणारे नेते शरणागती पत्करून कुणाच्या तरी साह्यार्थ सिद्ध झाले होते. मग काय, मिळेल त्याला सोबतीने घेण्याची तयारी सुरू झाली. डावे आले, अति डावे आले, उजव्यातलेही काही डावे आले... निमित्त संविधान बचाव रॅलीचे होते, पण त्याआडून भाजपाविरोधाचे तुणतुणे वाजविण्याची संधी साधण्याचा डाव रचला गेला. मोदी विरोधाचा ढोल मोठ्याने बडवण्याची हौस रंगात आली.

 

हो ना! निवडणुकीचा मुहूर्त असा जवळ असताना, त्यातही कन्हैया कुमार नावाचे सध्याचे चलते नाणे मदतीला उभे राहणार म्हटल्यावर, आपल्या नावावर गर्दी जमण्याचे दिवस केव्हाच मागे पडल्याचे ध्यानात आल्यावर, दुसर्याच कुणाच्या तरी नावाने जमणार्या गर्दीत आपल्याही प्रचाराचा उद्देश अनायासेच साध्य होणार म्हटल्यावर, कॉंग्रेसपासून तर कम्युनिस्टांपर्यंत झाडून सारे नेते कामाला लागले नसते तरच नवल! म्हणजे बघा, तसा विचार केला तर कन्हैया कुमार डाव्या विचारांना बांधील अशा एका विद्यार्थी संघटनेचा नेता. कॉंग्रेसचा तर त्याच्याशी दूरान्वयेही संबंध नाही. विचारांनी नाही. तत्त्वांनी नाही. कृतीने तर नाहीच नाही. तरीही नागपुरातील ज्या दर्जाचे नेते त्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हणून झटत होते, नामवंत नेते ज्या तर्हेने समोर टाकलेल्या खुर्च्यांवर बसून कन्हैया कुमारच्या भाषणात टाळ्या वाजवीत होते, त्यातल्या कित्येकांनी कधीतरी कॉंग्रेसच्या धुरंदर नेत्यांसोबत मंचावरील खुर्च्यांची शोभा वाढविली होती. पण, आता गमावलेल्या सत्तेमुळे वाट्याला आलेल्या लाचारीचे परिणाम हे, की कधीकाळी हुकूमत गाजविलेल्या कॉंग्रेसच्या बड्या बड्या नेत्यांना कन्हैया कुमारची जाहीर सभा यशस्वी करण्याच्या कामी स्वत:ला जुंपून घ्यावे लागले.

 

संविधान बचावपेक्षाही भाजपाविरोधाचा धागा महत्त्वाचा ठरला, सार्या विरोधकांची ठिसूळ झालेली मोट नव्याने बांधायला. तसेही लोकसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आलेली असताना मरगळ झटकणे आवश्यक होते. कार्यकर्त्यांमधला सरलेला उत्साह जागवायला एखादे निमित्त हवे होतेच. त्यांच्यात आत्मविश्वास जागवायला हवा होता. ती संधी कन्हैया कुमार यांच्या सभेच्या निमित्ताने उपलब्ध झाली. कुमार यांचे भाषण चांगलेच झाले. या देशातल्या सामान्य माणसाच्या हिताची भाषा ते बोलले. दारूच्या एका बाटलीत लाखमोलाचे मत विकणार्यांच्या भरवशावर सरकारे निवडली जातात, या त्यांच्या आरोपात सत्य दडले असेल, तर आजवरच्या नेमक्या कोणत्या सरकारच्या संदर्भात त्यांचे म्हणणे लागू होत नाही, हे सांगता येईल त्यांना तरी? सत्ताधारी लोक भांडवलदारांसाठी काम करतात, या त्यांच्या आरोपातून ते आजवरच्या कोणकोणत्या नेत्यांची नावे वगळू शकतात, हे सांगता आले असते त्यांना, तर मग समोर बसून त्यांच्या भाषणावर टाळ्या पिटणार्या कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांना स्वत:च्या कपाळावरचा घाम पुसायलाही फुरसत झाली नसती.

 

एकूणच, लोकशाही व्यवस्थेत होणारी सामान्य माणसाची हेळसांड, त्याला गृहीत धरून चालणारे बड्यांचे राजकारण, देशहिताच्या प्रमुख मुद्यांवर विचार करण्याची घडीभराचीही फुरसत त्याला होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करत कुठल्याशा अनावश्यक मुद्यांत सामान्य माणसाला गुंतवून ठेवण्याचे राजकारणातले डाव, आजवरच्या इतिहासात कधी खेळले गेले नव्हते? राममंदिरासारखे विषय मतांचे राजकारण खेळण्यासाठी उपयोगात आणले जात असल्याचा कन्हैया कुमारांचा आरोप खरा मानला, तर मग गुजरातेत तिथल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ऐरणीवर असलेल्या, जाणीवपूर्वक पेटवल्या गेलेल्या, पाटीदारांच्या आंदोलनाची धग मतदान आटोपताच शांत कशी झाली, याचे उत्तर देता येईल, हार्दिक पटेल अन्कन्हैया कुमारांना? एकदा भीमा-कोरेगावच्या मुद्यांवरून पद्धतशीरपणे पेटविण्यात आलेल्या दंगलीचे अपश्रेय ज्यांच्या पदरी पडते, त्याशिलेदारांचीयादी तपासून घेतली असती भाषणापूर्वी, तर मग इतर कुणावर दंगलखोरीचा आरोप करताना जीभ जराशी तरी चाचरली असती कन्हैया कुमारांची. कायदा सर्वांसाठी समान असावा, असे मत जाहीर सभांमधून व्यक्त करीत टाळ्या मिळवणारे लोक समान नागरी कायद्याला विरोध का म्हणून करतात, मुस्लिम महिला संसदेपासून तर न्यायालयापर्यंत ज्या मुद्यावरून झगडत आहेत, त्या तीन तलाकविरुद्ध उभे ठाकताना का म्हणून पाय लटपटतात त्यांचे? त्यात नसते का कुठेच मतांचे राजकारण?

 

कन्हैया कुमारांचे भाषण ऐकल्यानंतर असे कितीतरी प्रश्न उपस्थित होतात, स्वत:सहित कॉंग्रेसलाही अडचणीत आणणारे. कुणी सुरू केली प्रथा लोकांची लाखमोलाची मतं दारूच्या एका बाटलीने तोलण्याची? विजय मल्ल्या, नीरव मोदीला बँकेतून कर्ज काय भाजपा सरकारच्या कार्यकाळात मिळाले होते? नियम धाब्यावर बसवून या लोकांना कर्ज उपलब्ध करून देणारी तेव्हाची यंत्रणा काय भांडवलदारांविरुद्ध छातीठोकपणे उभी राहिली होती? ‘‘लोकांनी केंद्रात नरेंद्र मोदींना मत देताना ते विकासासाठी दिलं होतं, महागाई कमी करण्यासाठी दिलं होतं, भ्रष्टाचारावर अंकुश लागावा, चांगले दिवस यावेत म्हणून दिलं होतं...’’ गेल्या चार वर्षांत यातल्या सार्याच गोष्टी पूर्णत्वास गेल्याचा दावा तर कुणीच करीत नाही इथे. पण, या गोष्टी अद्यापही झाल्या नसल्याचा आरोप विद्यमान सरकारवर करताना, चार वर्षांपूर्वी या सार्या बाबींचा कमालीचा अभाव होता, ही बाबही ते अप्रत्यक्ष रीत्या मान्य करतात! मग समोर बसलेले कॉंग्रेसचे तमाम नेते टाळ्या कोणत्या गोष्टीवर वाजवीत होते? चार वर्षांत मोदी ते करू शकले नाहीत, या आरोपावर खुश होऊन? की स्वत:च्या नाकर्तेपणावर?

 

हे खरेच आहे की, रया हरवून बसलेल्या कॉंग्रेस पक्षाला कन्हैया कुमारांचाही आता आधार वाटू लागला आहे. त्याच्यातही ते आपला तारणहार शोधू बघताहेत. त्या धुंदीत तारतम्याचेही भान राहिलेले नाही त्यांना. हा बेटा मोदींवर असा मस्त बरसतोय्म्हटल्यावर त्यांना नको तेवढा हुरूप येतो. पण, या परिस्थितीला आपला नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे सत्य त्यांच्या ध्यानातच येत नाही. मुद्दा सत्ताधार्यांनी भांडवलदारांसाठी सत्ता राबविण्याचा असो, की मग लोकशाही व्यवस्थेने चालविलेल्या गरिबांच्या थट्टेचा, या वावटळीतून कॉंग्रेसला बाजूला कसे ठेवता येईल कुणाला? हे कन्हैया कुमारांनाही कळत नसेल, केवळ भाजपाला विरोध करायचा म्हणून ते याच नाकर्त्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या सभेच्या मंचावरून भाजपावर निशाणा साधत असतील अन्समोर बसलेले शहाणे त्यामुळे आनंदात न्हाऊन निघत असतील तर आनंदिआनंदच आहे सारा. ज्यांनी कालपर्यंत नुसती लूट मांडली होती तेच आज न्यायाच्या बाता हाणत असल्याचे दुर्दैवी चित्र त्यातून निर्माण होत आहे...

तू इधरउधर की बात ना कर

पहले ये बता, कारवॉं किसने लुटा?

Powered By Sangraha 9.0