आता मुंबई ते नवी मुंबई दरम्यान 'वॉटर टॅक्सी'

29 Dec 2018 20:46:48



मुंबई - शहरामध्ये रस्ता वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ झाली आहे. यावर पर्याय म्हणून सरकारने जलवाहतुकीचा विचार सुरू केला आहे. त्यानुसार सरकार मुंबई-नवी मुंबई हे अंतर जलवाहतुकीच्या माध्यमातून कमी करणार आहे. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने 'वॉटर टॅक्सी' सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

मुंबई ते नवी मुंबई हे ४०-४५ किलोमीटरचे अंतर रस्ता वाहतुकीने पार करताना साधारणतः दीड ते २ तासाचा वेळ लागतो. शिवाय या रस्ता वाहतूकीला इंधनही अधिक जाते. मात्र, सरकराने घेतलेल्या निर्णयामुळे हेच अंतर जलमार्गाने पार केल्यास इंधन आणि वेळ या दोन्हींची बचत होणार आहे. त्यामुळे मुंबईतील भाऊचा धक्का ते बेलापूर, नेरूळ आणि मांडवा अशी ही वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा विचार सरकारने केला आहे. या सेवेचे लवकरच लोकार्पणदेखील होणार आहे. त्यामुळे पाण्यावरुन सुसाट धावणार्‍या वॉटर टॅक्सीमधून प्रवास करण्याचा आनंद मुंबईकरांना घेता येणार आहे.

 

वॉटर टॅक्सी सेवा सुरुवातीला गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान चालवण्यात येणार असून त्यापाठोपाठ दुसरीकडे भाऊचा धक्का ते मांडवा, भाऊचा धक्का ते नवी मुंबई विमानतळ, भाऊचा धक्का ते बेलापूर-नेरुळ या मार्गावर ही सेवा सुरू केली जाणार आहे. त्यादृष्टीने मुंबई पोर्ट ट्रस्टकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. वॉटर टॅक्सीची प्रवासी क्षमता, सेवेचे दर आणि वेळ हे सर्व निविदा अंतिम झाल्यानंतरच निश्‍चित केल्या जाणार आहेत. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर या वॉटर सेवेला प्रचंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टने बाळगला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0