तांदळाच्या दाण्यावरची ‘नीरुकारी’

    दिनांक  27-Dec-2018   

 

 
 
 
 
 
जयपूरच्या नीरू छाबरा यांनी तांदळाच्या एका दाण्याचा वापर आपल्या कलेसाठीचा कॅनव्हास म्हणून केला. त्यांच्या या ‘नीरुकारी’च्या वैशिष्ट्यपूर्ण कलाआविष्कारावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 

भारतीयांच्या जीवनात तांदळाचे महत्त्व मोठे आहे. काश्मीर ते कन्याकुमारी सर्वत्रच आहारात तांदळाचा वापर केला जातो. दक्षिण भारतीयांनी तर तांदळाच्या निरनिराळ्या पदार्थांचा आविष्कार करून त्यांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतासह भारताबाहेरही केला. आहारासोबतच तांदळाचा उपयोग कुंकुमतिलकावर लावण्यासाठी, विवाहात अक्षता म्हणूनही करण्यात येतो. तांदळाचे पापड, पोंगेही तयार केले जातात. पण, याच तांदळाचा वापर कोणी आपली कला सादर करण्यासाठी केला तर? जयपूरच्या नीरू छाबरा यांनी तांदळाच्या एका दाण्याचा वापर आपल्या कलेसाठीचा कॅनव्हास म्हणून केला. याची सुरुवात जवळपास ३४ वर्षांपूर्वी झाली आणि त्या निरंतर ही कला साकारण्यात रममाण आहेत.

 

आपल्या कलाकारीबद्दल नीरू छाबरा यांनी सांगितले की, “लहानपणी मी तांदळाचा वापर करून किंवा तांदळाच्या दाण्यांवर सादर केल्या जाणाऱ्या कलेबद्दल ऐकले होते, तेव्हा मला वाटले की, आपणही करून पाहूया प्रयत्न. मी प्रयत्न केला आणि त्यात यशस्वीही झाले.” नीरू छाबरा यांनी आतापर्यंत तांदळाच्या दाण्यांवर भक्तामर स्तोत्र, ‘अनेकता में एकता,’ ‘मेरा भारत महान’ अशा शब्दांच्या माळाही रंगवल्या आहेत. नीरू छाबरा तांदळावर केवळ कोरीव कामच करत नाहीत, तर निरनिराळ्या रंगांचा, शाईचा वापर करून त्यावर अक्षरे लिहितात. मुळात तांदळाचे छोटे छोटे दाणे हातावर किंवा बोटांच्या चिमटीत पकडणे आणि त्यावर लिखाण करणे तसे जिकिरीचेच. पण, नीरू या छोट्या छोट्या दाण्यांवर विविध अक्षरे लिहिण्याचे काम लिलया करतात. छोट्याशा बीजातून झाड उगवतं, त्याला ओंब्या लगडतात आणि त्यातून धान्याची रास घरादारात पडते, तशी नीरू छाबरा यांच्या कलेतून मात्र स्तोत्रांची, श्लोकांची, घोषणांची निर्मिती होताना दिसते.

 

सृजनाच्या कल्पना मनात घोळत असल्या की, त्यासाठी कोणतेही साधन पुरेसे ठरते. याचाच प्रत्यय नीरू छाबरा यांच्या कलाकृती पाहताना येतो. यंदाच्या वर्षी म्हणजे १३ सप्टेंबर, २०१८ ला गणेश चतुर्थी होती. गणपती बाप्पा सर्वांच्या घरी विराजमान होणार होते. जयपूरमध्ये राहत असलेल्या नीरू छाबरा यांनी गणेशभक्ती आणि श्रद्धा आपल्या कलेच्या माध्यमातून दाखविण्याचे ठरवले आणि एक आगळीवेगळी-शानदार कलाकृती साकार केली. त्यांनी यावेळी तांदळाच्या दाण्यांवर ‘वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा’ हा मंत्र लिहिला. आहे की नाही कमाल? सोबतच नीरू छाबरा यांनी गणेशोत्सवानिमित्त १०८ तांदळाच्या दाण्यांवर गणपतीची १०८ नावेही लिहिली. या सगळ्याच कलाकारीसाठी, सजावटीसाठी व लिखाणासाठी नीरू छाबरा यांनी १८१ तांदळाच्या दाण्यांचा उपयोग केला. सोबतच ८० तांदळाच्या दाण्यांवर गणेशजन्माची माहितीही अंकित केली आहे. गणपतीशी संबंधित त्यांचे हे सादरीकरण त्यांच्या आध्यात्मिक भाव-बोध आणि मौलिक सृजनाचे उत्तम उदाहरण ठरते.

 

आपल्याला आवडणारे काम केले की, आपण त्यात नेहमीच गुंतून, रंगून जातो. असे काम करताना आपल्याला बिलकुल कंटाळा येत नाही. उलट आपण करत असलेले कामच आपल्याला यशोशिखरावर घेऊन जाते. कारण, ते केवळ काम नसते, तर आपली जीवनपद्धतीच झालेले असते. नीरू छाबरा यांचेही तसेच आहे. तांदळावर शब्द रेखाटण्याचा छंद त्यांना जडला आणि त्यांचे नाव आजूबाजूला, राज्यात अन् देशातही घेतले जाऊ लागले. आज त्या तांदळावर कलाकृती रेखाटणाऱ्या अव्वल कलाकार आहेत. त्यांच्या याच कलेची दखल इथल्या कलासक्त समाजाने तर घेतलीच, पण अन्य बड्या नेत्यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले, त्यांचा गौरव केला. १९९४ साली नीरू छाबरा यांनी तांदळाच्या केवळ एका दाण्यावर १०८ अक्षरे लिहिण्याचा विक्रम केला आणि आपली ही कलाकृती तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांना दिली. त्याआधी त्यांनी आपल्या कलाकृती इंदिरा गांधी, राजीव गांधी व नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही भेट स्वरूपात दिल्या आहेत. विद्यमान राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नीरू छाबरा यांनी आपली कलाकृती भेट म्हणून दिली. या सर्वांनीच त्यांच्या कलेचे आणि कलाकृतीचे कौतुक केले.

तांदळावरील सूक्ष्म लेखनाबद्दल नीरू छाबरा यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळालेला आहे. सोबतच श्रवणबेळगोळ येथील मठानेही नीरू छाबरा यांचा सन्मान केला. इथे त्यांच्या ‘जल है तो कल है, जल अनमोल है,’ या तांदळावर लिहिलेल्या संदेशाला पाहून कौतुक करण्यात आले. हे अर्थातच भारतातले झाले, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरही नीरू छाबरा यांच्या कलेला नावाजले गेले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना नीरू छाबरा यांनी आपली कलाकृती भेट दिल्यावर त्यांनी तर कौतुकाचे प्रशस्तिपत्रकच दिले. पण, तत्कालीन फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांनीही नीरू छाबरा यांच्या कलेला सन्मान दिला. कझाकिस्तानचे अध्यक्ष नूर सुलतान नजरबाएफ यांनाही नीरू छाबरा यांनी आपली कला भेट म्हणून दिली होती.
 

नीरू छाबरा यांनी आतापर्यंत तांदळाच्या दाण्यांचा वापर करत त्यावर ४०० पेक्षा अधिक कलाकृती तयार केल्या आहेत. हा एक विक्रमच म्हटला पाहिजे. अशा या सूक्ष्मावरही प्रचंड कार्य करणाऱ्या नीरू छाबरा यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/