ऋतुकपाच्या निर्मात्या सीमा खंडाळे

    दिनांक  26-Dec-2018


 


महिलांच्या आरोग्यासोबत आणि पर्यावरणही उत्तम राहावे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सीमा खंडाळे यांनी मासिक पाळीसाठी ऋतुकपाची निर्मिती केली आहे. त्यांच्यावर कार्यावर, यामागील प्रेरणेवर प्रकाश टाकणारा हा लेख...


सीमा खंडाळे या ‘अशय सोशल ग्रुप’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीचे कार्य करतात. प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवी आणि सॅनिटरी नॅपकिन ऐवजी मासिक पाळीमध्ये ऋतुकप वापरावा, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. पण, नेमके हा ऋतुकप म्हणजे काय, त्यामागील एकूणच सीमा यांनी सांगितलेली पार्श्वभूमी विचार करायला लावणारी आहे. सीमा खंडाळे यांनी वनस्पतिशास्त्र हा विषय बीएस्सीसाठी घेतला होता. पुढील उच्च शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा होती. परंतु, लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सीमा यांना पुढील शिक्षण काही घेता आले नाही. मात्र, लग्नानंतर तब्बल २० वर्षांनी सीमा यांनी पुढील शिक्षणाचा निर्णय घेतला. त्यांनी २०१३ मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामधून ‘सामाजिक कार्य’ या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. २०१५ मध्ये त्यांना पदव्युत्तर पदवी मिळाली. परंतु, समाजसेवेची इच्छा त्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांना दुसऱ्यांच्या स्वयंसेवी संस्थेत काम करायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतःची संस्था निर्माण करायचे ठरविले. त्यासाठी अभ्यास केला असता, विविध विषयांसाठी विविध संस्था काम करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परंतु, पर्यावरणासाठी खास असे कोणतीही संस्था काम करत नसल्याचे त्यांना आढळले. खरेतर वनस्पतिशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी पदवी मिळवली होती. त्यामुळे त्यांना झाडे आणि मातीमध्ये रस होता. म्हणूनच मग सीमा खंडाळे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी ‘अशय सोशल ग्रुप’ ही समाजसेवी संस्था सुरू केली.

 

पर्यावरणासाठी मोठे आव्हान असणाऱ्या प्लास्टिकवर त्यांनी सर्वप्रथम लक्ष केंद्रित केले. त्या माध्यमातून त्यांनी ‘प्लास्टिकचा वापर टाळा’ हा प्रकल्प सुरू केला. त्यामध्ये त्यांनी जुने कपडे गोळा करून त्यापासून कापडी पिशव्या तयार करण्याची माहिती घेतली. त्यातून त्यांनी जुन्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करण्यास रीतसर सुरुवातही केली. तसेच या पिशव्या शिवण्याचे काम गरीब महिलांना दिले. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला. गरीब, होतकरुंना या पिशव्या मोफत देण्यात येतात. तीन वर्षांत तब्बल २० हजार पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. हे काम सुरू असताना त्यांनी एका वर्षानंतर वृत्तपत्रात ‘एका कपाची कहाणी’ हा लेख वाचला. त्यामुळे ‘त्या’ कपाबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. हा कुठलाही सर्वसाधारण कप नव्हे, तर मासिक पाळीसाठी वापरला जाणारा ऋतुकप होता. परंतु, त्याबाबत त्यांना अधिक माहिती नव्हती. त्यांनी दोन महिने या ऋतुकपाची माहिती शोधली. आपण स्वत: बघून, पारखून त्याची योग्य माहिती घेतली पाहिजे, अन्यथा पैसे वाया जातील, अशी एका सामान्य गृहिणीप्रमाणे त्यांचीही मानसिकता होती. एक दिवस त्यांना पार्ल्यात एका महिलेकडे मासिक पाळीच्या काळात उपयुक्त ठरणारे हे ऋतुकप विकायला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सीमा यांनी दुसऱ्याच दिवशी जाऊन तो कप विकत घेतला. तसेच तो कप स्वत: वापरायला सुरुवात केली. ते वापरत असताना तो त्यांनाही वापरयोग्य वाटला. त्यानंतर त्यांनी या ऋतुकपाबाबत मैत्रिणींना सांगण्यास सुरुवात केली. तसेच याबाबत जनजागृती केली. हे सुरू असताना ही वस्तू सिलिकॉनपासून बनवतात. मात्र, एका व्यक्तीने हे ऋतुकप तोही तयार करत असल्याचे सीमा यांना सांगितले. सीमा यांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे पाच ते सहा ऋतुकप वापरले होते. काही ऋतुकप त्यांना भेट म्हणूनही मिळाले. त्यामुळे कोणत्या कंपनीचा कप कसा आहे, याची त्यांना माहिती होती. म्हणून मग सीमा यांनी त्या व्यक्तीला ऋतुकपाबाबतचे एक डिझाईन करुन दिले आणि या ऋतुकपांच्या उत्पादनाचीही ऑर्डर दिली. अखेरीस फेब्रुवारी २०१७ पासून सीमा परदेशी यांनी आरेखित केलेला हा ऋतुकप बाजारात आला.

 

ऋतुकप हा १०० टक्के सिलिकॉनने बनविलेला असतो. एक कप आठ ते दहा वर्षे वापरता येतो. यामुळे आपण आपले आरोग्य, पर्यावरण यांचे रक्षण करू शकतो. तसेच आपला आर्थिक फायदाही होतो. हा ऋतुकप आरोग्यासाठी चांगला आहे. तो ५५५ रुपयांना मिळतो. ज्यांना हा ऋतुकप हवा आहे, त्यांना तो मिळवून देण्यास सीमा खंडाळे मदतदेखील करतात. हा ऋतुकप तयार करणारी कंपनी आणि ग्राहक यामधील दुव्याची भूमिका त्या करतात. महिलांनी दुसरीकडून ऋतुकप खरेदी करून वापरला आणि त्यामध्ये कोणतीही अडचण आली तरी, त्या मदत करतात. आतापर्यंत एक हजार ऋतुकप विकण्यात आले आहेत. तसेच त्यांनी मैत्रिणी किंवा ओळखीच्या माध्यमातून याबद्दल जनजागृती केली आहे. याचा सकारात्मक परिणाम होऊन हजारो महिलांनी ऋतुकप वापरला, असे त्या सांगतात. अनेक मुली किंवा महिला स्वत: हा कप वापरून त्या संदर्भात जनजागृतीही करतात. या विषयी माहिती देण्यासाठी शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, कॉर्पोरेट कार्यालये, महिला मंडळे इ. ठिकाणी याविषयी जागृती सत्र घेण्यात येतात. झोपडपट्टी आणि ग्रामीण भागात कापडी घड्यावापरल्या जातात, जी पारंपरिक पद्धत समजली जाते. या कापडी घड्या जुनी बेटशीट्स, टी.शर्ट्स आदींच्या कापडापासून कशा तयार करायच्या, याबाबत सीमा महिलांना प्रशिक्षण देतात. त्या चार ते पाच कापडी घड्यांचा सेट तीन ते चार वर्षे वापरता येतो. या पर्यायाच्या मदतीने आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगले पर्यावरण राखू शकतो. हे पर्यावरणपूरक पर्याय महिलांना माहिती असावेत, म्हणून सीमा खंडाळे प्रयत्नशील आहेत.

 

- नितीन जगताप

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/