सत्तालोभाची लक्षणे

    दिनांक  25-Dec-2018   

 

 
 
 
 
एकदा का मधुमेह जडला की, माणसाला इतर वेदना जाणवणं बंद होऊन जातं. सर्दी-ताप वगैरे आजार जाणवत नाहीत आणि जेव्हा त्या लक्षात येतात तेव्हा मात्र उशीर झालेला असतो. सत्ताप्रेम हे या मधुमेहासारखंच असतं. एकदा का सत्तेचा स्पर्श झाला की माणूस बाकी सर्व गोष्टींना पारखा होतो आणि केवळ सत्तेपुरता उरतो, असं म्हणतात. राजकारण म्हणजे काय, याबाबत निरनिराळ्या व्याख्या राज्यशास्त्रात सांगितल्या आहेत. परंतु, त्या सर्व व्याख्यांत ‘राजकारण म्हणजे सत्ता असलेल्यांनी ती टिकवण्यासाठी व नसलेल्यांनी ती मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न’ अशी एक अगदीच प्रॅक्टिकल वगैरे म्हणावी, अशी व्याख्या आहे जी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणाशी जुळणारी आहे. महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या राजकीय पक्षाची सध्या सुरू असलेली वाटचाल पाहिल्यास ही सर्व लक्षणे आपल्याला दिसून येतील. एकेकाळी ६० टक्के समाजकारण आणि ४० टक्के राजकारण वगैरे घोषणा देणारा, जे बोलतो ते करून दाखविण्याबाबत ख्याती असलेला एक पक्ष. या पक्षाची सध्याची वाटचाल पाहता, सत्ताप्रेम माणसाला कुठवर आणून सोडतं हे आपल्याला लक्षात येतं. हा पक्ष कोणता, हे एव्हाना आपल्या लक्षात आलंच असेल. या पक्षाचे पक्षप्रमुख सध्या शरयूचा तीर ते चंद्रभागेच्या काठापर्यंत ठिकठिकाणी प्रवास करत आहेत, सभा घेत आहेत. चांगलीच गोष्ट आहे, परंतु येथे जाऊन ते करत काय आहेत, तर आपलाच पक्ष सहभागी असलेल्या सरकारवर यथेच्छ टीका करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवण्यात मश्गुल आहेत. नुकत्याच पंढरपुरात घेतलेल्या सभेचंच उदाहरण घ्या. एखाद्या विरोधी पक्षनेत्याला लाजवेल (महाराष्ट्रातील विद्यमान विरोधी पक्षनेत्यांना तर निश्चितच) अशा थाटात उद्धवजी बोलले. परंतु, हे सर्व करत असताना, मंत्र्यांच्या खिशात असलेल्या राजीनाम्यांचे काय झाले? सत्तेत येऊन साडेचार वर्षे झाली, या साडेचार वर्षांत आपण सरकारवर आणि भाजप नेत्यांवर वाट्टेल ती टीका केली परंतु तरीही आपण सत्तेतच कसे? मध्यंतरी आपण युती तुटली अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले?, हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले.
 

स्पष्ट होईलच...

 

या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा बाळगण्यात निश्चितच काही अर्थ नाही. कारण, या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे बोलले आणि त्याच दिवशी प्रवक्ते खा. संजय राऊत जे बोलले, ती दोन्ही विधाने समोरासमोर ठेवली की, सारंच कसं गोलमाल आहे, हे लक्षात येतं. “युती होणार की नाही, जागावाटप किती होणार, या फालतू चर्चेत मी जात नाही. मला राम मंदिर आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जास्त महत्त्वाची आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. दुसरीकडे संजय राऊत काय म्हणाले? “राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा आणि शिवसेनेचं राज्य यावं,” ही आमची इच्छा आहे. जनतेला मूर्ख समजून आपलंच घोडं पुढे दामटण्यालाही काही मर्यादा असतात. शिवसेना नेतृत्वाने सध्या त्याही सोडल्याचं या वक्तव्यांतून स्पष्ट दिसतं. तुम्हाला जर सरकारचा एवढाच राग आहे, तर सत्ता सोडा. विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरा, उग्र आंदोलन करून सरकारला जेरीस आणा. कुणी अडवलं आहे काय? परंतु, सत्तेत राहायचं, मंत्रिपदं घ्यायची आणि दुसरीकडे त्याच सरकारला दूषणेही द्यायची, हा दुटप्पीपणा महाराष्ट्र गेली साडेचार वर्षे पाहत आहे. सुरुवातीला जेमतेम काही दिवस विरोधी पक्ष म्हणून काम केल्यानंतर सत्तामोह सोडवता न आल्याने चूपचाप शिवसेना सत्तेत सामील झाली. एवढी नाचक्की होऊनही पुन्हा आपल्याच सरकारच्या विरोधात दूषणे देणे मात्र सेनेने थांबवले नाहीच. या दुटप्पी धोरणाची फळे प्रत्येक निवडणुकीत मिळाली तरीही सेनेने आपलं धोरण बदललं नाहीआता तर म्हणे, आम्हाला जागावाटप आणि निवडणुकांत स्वारस्य नाही. ते नसतं तर २०१४ मध्ये युती तुटली असती का? उगाच काहीही बोलायचं? बरं, मुळात युती तुटली आहे आणि राज्यात सेनेचाच मुख्यमंत्री आणायचा आहे, तर जागावाटपात तुम्हाला स्वारस्य आहे अथवा नाही, याचा संबंधच कुठे उरतो? तीन राज्यांत भाजपचा पराभव झाल्याने तुम्हाला एवढ्या आनंदाच्या उकळ्या का फुटाव्यात? हे आणि असे शेकडो प्रश्न अनुत्तरितच राहतात. उरतं ते फक्त साहेबांचं झक्कास भाषण आणि त्यावर टाळ्यांचा कडकडाट वगैरे. आता हे सारं २०१९ च्या निवडणुकांपर्यंत चालेलच. परंतु, प्रत्यक्ष रणमैदान जवळ आल्यानंतर जागावाटपात आणि निवडणुकीत कोणाला स्वारस्य आहे, हेही स्पष्ट होईलच.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/