नवा अध्याय रचला जाईल का?

    दिनांक  25-Dec-2018   

 

 
 
 
 
कोहली कर्णधार म्हणून यशस्वी की अयशस्वी हे ठरवण्याची वेळ आता तरी निश्चितच आलेली नाही. ती येईपर्यंत त्याला त्याचा नैसर्गिक खेळ दाखवणं भाग आहे. मात्र, हे सर्व होत असताना विदेशात आणि त्यातही ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचं आव्हान मात्र कोहलीपुढे आ वासून उभं राहतंच.  
 
 
क्रिकेट जगतात कित्येकदा एकदिवसीय विश्वचषक वा टी-२० विश्वचषक यापेक्षाही अधिक चर्चिल्या गेलेल्या मालिका म्हणजे ऑस्ट्रेलिया व इंग्लंडदरम्यान होणारी प्रसिद्ध अ‍ॅशेस मालिका आणि भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान होणारी बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका. तीनही तगड्या आणि क्रिकेटमधील ‘दादा’ समजल्या जाणाऱ्या संघांतील या मालिका अवघ्या जगातील क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधून घेतात. यांपैकी भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सध्या ऑस्ट्रेलियात सुरू आहे. सध्या जागतिक स्तरावर क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण व दूरगामी बदल घडत असताना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका म्हणजे उद्याच्या क्रिकेटचा एक ट्रेलर ठरेल, यात काही शंका नाही.
 

पहिली कसोटी जिंकत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आशा पल्लवित केल्या, तर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत ही मालिका भारताला एवढी सोपी नसल्याचे दाखवून दिले. परदेशात जाऊन जिंकणे, विशेषतः कसोटी मालिका आणि तीही क्रिकेटमधील तगड्या समजल्या जाणाऱ्या देशांमध्ये जाऊन जिंकणे, ही गोष्ट भारताला नेहमीच आव्हानात्मक ठरली आहे आणि त्यामुळे ती तितकीच हवीहवीशीदेखील ठरली आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकात त्यावेळचा बलाढ्य संघ वेस्ट इंडिजला आणि इंग्लंडला त्यांच्या मायभूमीवर नमवत अजित वाडेकरांच्या संघाने इतिहास घडवला. त्यानंतर कालांतराने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये ती जान राहिली नाही, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका यांसारख्या नव्या क्रिकेट महासत्तांचा उदय झाला. नव्वदच्या दशकात पाकिस्तान, श्रीलंका आदी देशांनी विश्वचषक जिंकत जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडले. परंतु, कसोटीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत एकहाती वर्चस्व गाजवणे या देशांना काही जमले नाही. ते जमलं ऑस्ट्रेलियाला.

 

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने कात टाकली आणि आपणही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिकेच्या खेळाडूंप्रमाणे आक्रमक खेळ करू शकतो, समोरच्याला जशास तसे उत्तर देऊ शकतो, आपले फलंदाज विदेशी खेळपट्ट्यांवर वादळी म्हणावेत अशा वेगवान गोलंदाजांचा समाचार घेऊ शकतात, हा आत्मविश्वास भारतीय खेळाडूंमध्ये निर्माण झाला. परंतु, मायदेशात वाघ आणि परदेशात शेळी ही प्रतिमा साफ पुसून टाकणं काही गांगुलीला म्हणावं तसं जमलं नाही. महेंद्रसिंग धोनीने ते करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कसोटी क्रमवारीत भारताला क्र. १ वर आणून दाखवलं. मात्र, त्यानंतर कर्णधारपदाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या काळात विदेशात झालेले मानहानीकारक मालिका पराभव धोनीच्या कारकिर्दीतील कटू क्षण ठरले व त्याची परिणिती धोनी कर्णधारपदावरून दूर होण्यात झाली. द्रविड, कुंबळे आणि धोनी हे सतत डोक्यावर बर्फ ठेऊन वावरणारे ‘कॅप्टन कूल’ पाहिल्यानंतर भारताला पुन्हा एकदा विराट कोहलीच्या रूपाने आक्रमक कर्णधार मिळाला आहे. समोरच्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची कोहलीची सवय क्रिकेटचाहत्यांना गांगुलीची आठवण करून देते.

 

असा हा कोहली कर्णधार म्हणून यशस्वी की अयशस्वी हे ठरवण्याची वेळ आता तरी निश्चितच आलेली नाही. ती येईपर्यंत त्याला त्याचा नैसर्गिक खेळ दाखवणं भाग आहे. मात्र, हे सर्व होत असताना विदेशात आणि त्यातही ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचं आव्हान मात्र कोहलीपुढे आ वासून उभं राहतंच. शिवाय, पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषकही आहे, जिथे कोहलीच्या नेतृत्वगुणांची ‘कसोटी’ लागेलच. तूर्तास, ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत काय निकाल लागतो, यावर भारतीय संघाची पुढील वाटचाल ठरेल. एकदिवसीय काय किंवा टी-२० काय. खरा दर्दी क्रिकेटरसिक आजच्या काळातही आपले कसोटीप्रेम टिकवून आहे. त्यामुळे भारताने यावेळी तरी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच नमवून इतिहास घडवावा, अशी तमाम क्रिकेटरसिकांची इच्छा आहे. सचिन, गांगुली, द्रविड, कुंबळे, लक्ष्मण या फॅब-५ असणाऱ्या संघाला ते जमलं नाही. इतकंच काय तर धोनीलाही ते जमलं नाही. परंतु, दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही आता वॉ, पॉन्टिंग, वॉर्न, गिलख्रिस्ट, हेडन, ब्रेट लीचा संघ राहिलेला नाही. त्यामुळे आतातरी कोहलीचा नव्या दमाचा संघ भारतीय क्रिकेटरसिकांचं हे स्वप्न पूर्ण करतो का आणि मेलबर्न व सिडनीच्या मैदानावर नवा अध्याय रचला जातो का, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. तूर्तास, त्याकरिता ‘टीम इंडिया’ला शुभेच्छा देणे, हेच अधिक योग्य ठरेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/