उद्यापासून सुरु होणार एसटीची ‘विठाई’

    दिनांक  23-Dec-2018

 


 
 
 
पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन भक्तांना घेता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून नवीन बससेवा सुरु करण्यात येत आहे. सोमवारपासून ही बससेवा सुरू होणार असून ‘विठाई’ असे या एसटी बसचे नाव असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरमध्ये या एसटीसेवेचे लोकार्पण केले जाणार आहे.
 

आषाढी एकादशीला वारीतून अनेक भक्तगण पंढरपुरमध्ये दाखल होतात. वर्षभरही भक्तांचा ओघ पंढरपुरमध्ये असतो. एसटीच्या नियमित बसेस प्रासंगिक करारावर उपलब्ध होतात. काही भक्तगण खासगी वाहनाने पंढरपूरपर्यंतचा प्रवास करतात. परंतु या भक्तांना मार्गात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. विठ्ठल भक्तांची राहण्याची, जेवणाची गैरसोय होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने विठ्ठल भक्तांसाठी ‘विठाई’ ही एसटी बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

 

एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची ही संकल्पना आहे. ‘विठाई’ या बससेवेच्या सुरुवातीला १० एसटी बस विठ्ठल भक्तांच्या सेवेत रुजू होणार आहेत. पुण्यातील दापोडी येथे या एसटी बसेसची निर्मिती सुरु आहे. लवकरच एसटीच्या प्रत्येक विभागात ‘विठाई’ ही एसटी बस दाखल होणार आहे. ‘विठाई’ या एसटी बसमध्ये २x२ अशी पुशबॅक सीट आहे. प्रासंगिक करार पद्धतीने ज्या दरात भाडे आकरले जाते, त्या दरातदेखील ही बससेवा पुरवली जाणार आहे. ‘विठाई’ या बससेवेचा लाभ घेण्यासाठी विठ्ठल भक्तांना अगोदर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. या बससेवेद्वारे विठ्ठल भक्तांच्या राहण्याची, जेवणाची सोय करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळ करणार आहे.

 

प्रवास, मुक्काम आणि जेवण असे पॅकेज विठ्ठल भक्तांना माफक दरात एसटी महामंडळाकडून दिले जाणार आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांची गैरसोय टाळता येणार असून खासगी वाहनांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबेल, असे सांगण्यात येत आहे. ‘विठाई’ या एसटी बसवर विठूराया आणि वारकऱ्याचे चित्र आहे. आरामदायी आसनव्यवस्था असलेल्या या एसटी बसला दोन आपत्कालीन दरवाजे आहेत. नियमित एसटी बसपेक्षा ‘विठाई’ उंच असून त्या ४२ प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. या एसटी बसच्या खिडक्या मोठ्या असून बसमध्ये अल्युमिनिअमच्या ऐवजी पोलादी पत्र्याचा वापर करण्यात आला आहे.

 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्यारोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/