पानगळीचं शास्त्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2018   
Total Views |पानगळ हा वनस्पतीच्या जीवनचक्रातला एक महत्त्वाचा भाग आहे. पानगळीची कारणं ही वनस्पतीपरत्वे आणि हवामानपरत्वे बदलतात. पानगळीच्या शास्त्राविषयी थोडंसं...


म्हाताऱ्या मनुष्याला 'पिकलेलं पान' अशी उपमा देतात. कारण, झाडाचं पिकलेलं पान कधीही गळून पडेल अशा अवस्थेत असतं! झाडांची पानं का गळतात? ती विशिष्ट ऋतूतच का गळतात? काही झाडांची पानं जास्त प्रमाणात, तर काही झाडांची पानं कमी प्रमाणात गळतात, असं का होतं? काही प्रदेशांत पानगळ जास्त, तर काही प्रदेशांत ती कमी का होते? वनस्पतींच्या पानगळीचं शास्त्र मोठं गंमतीशीर आहे. पानगळीची अनेक कारणं आहेत. वनस्पतिशास्त्राच्या भाषेत पानगळ होते त्याला abscission म्हणतात. वास्तविक abscission म्हणजे निरूपयोगी झालेला अवयव टाकून देण्याची सजीवांची क्रिया. सापाने टाकलेली कात हे त्याचं ठळक उदाहरण. वनस्पतींच्या बाबतीत पानं, फूलं आणि फळं ही सतत जुनी जाऊन नवीन येत असतात. काही झाडांच्या खोडांच्या साली निघतात. याचं साधं शास्त्रीय कारण म्हणजे ठराविक कालावधीनंतर त्या त्या अवयवांचं कार्य संपलं की, त्यातील पेशी मृत होतात आणि तो अवयव झाडापासून वेगळा होतो. 'परागीभवनाद्वारे फळनिर्मिती' हे फुलाचं कार्य आहे. ते एकदा झालं की, फुलं झाडासाठी निरुपयोगी होतात आणि गळून पडतात. तसंच 'पुनरुत्पादनक्षम बीजनिर्मिती' हे फळाचं कार्य आहे. ते झालं की फळं पिकतात आणि गळून पडतात. पानगळ होण्याच्या अगोदर पानातली हरितद्रव्य (Chlorophyll) हळूहळू कमी होऊ लागतात. म्हणूनच पानाचा हिरवा रंग बदलून तो पिवळा, लालसर वा तपकिरी होतो. जिथून पान तुटतं, त्या भागावर पेशींचा एक संरक्षक थर तयार झालेला असतो, ज्यामुळे पान तुटताना झाडाला इजा होत नाही. (आपण पान तोडातो तेव्हा मात्र झाडाला जखम होते.)

 

झाडांची पानगळ किती प्रमाणात होते त्यावरून त्या झाडांचे 'सदाहरित वृक्ष' (Evergreen Trees) आणि 'पानझडी वृक्ष' (Deciduous Trees) असे मुख्यत: दोन प्रकार पडतात. आंबा, फणस, वड, पिंपळ, कडुनिंब ही सदाहरित वृक्षांची उदाहरणं होय, तर सागवान, शिवण, किंजळ, हसाणी, साल इ. पानझडी वृक्ष होत. पानगळीच्या कमी-अधिक प्रमाणावरून त्यांचे निम्न-सदाहरित, निम्न-पानझडी, आर्द्र सदाहरित, शुष्क सदाहरित असे अनेक उपप्रकार पडतात. सदाहरित आणि पानझडी वृक्षांमधील मुख्य फरक असा की, सदाहरित वृक्षांमध्ये जुनी पानं गळणं आणि नवीन पालवी येणं या दोन्ही क्रिया एकाच वेळी समांतर चालू असतात. सगळी पानं एकदम गळून जात नसल्यामुळे झाड वर्षभर हिरवगार दिसतं. याउलट पानझडी वृक्षांची सगळी पानं कोरड्या ऋतूत गळतात आणि झाड पूर्णपणे निष्पर्ण होतं. आता, असं नेमकं का होतं? इथे पुन्हा येतो तो चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत. 'पानगळ' हे झाडांनी हवामानाशी साधलेलं अनुकूलन आहे. पावसाचं प्रमाण, तापमान, जमिनीचा प्रकार, सूर्यप्रकाशाची उपलब्धता इ. घटकांचा पानगळीवर परिणाम होत असतो. झाडांची मूळं जमिनीतून पाणी शोषून घेतात आणि सर्व अवयवांना पुरवतात. पानांची कामं दोन. एक म्हणजे प्रकाशसंश्लेषण आणि दुसरं म्हणजे श्वसन. झाडांची पानं जेव्हा श्वसन करतात तेव्हा त्यांच्यातल्या पाण्याचं बाष्पीभवन होत असतं. याला Evapotranspiration म्हणतात. माणसाच्या शरीरातलं पाणी जसं घामावाटे बाहेर पडतं तसंच झाडातलं पाणी पानांमधून होणाऱ्या बाष्पीभवनावाटे बाहेर पडतं. यामुळे झाडातील पाणीसाठा सतत कमी होत असतो. तेवढा पाण्याचा पुरवठा मुळांकडून व्हावा लागतो. त्यासाठी जमिनीत तेवढं पाणी असावं लागतं. त्यासाठी तेवढा पाऊस पडावा लागतो. आता, पावसाळा संपल्यावर झाडाला पाणीपुरवठा कमी होतो. पुढचा पावसाळा येईपर्यंत झाडाला तगण्यासाठी पाणी पुरवून पुरवून वापरावं लागतं. म्हणूनच या काळात पानांमधून होणाऱ्या बाष्पीभवनावाटे झाडातलं पाणी निघून जाऊ नये, यासाठी 'पानगळ' ही निसर्गाने केलेली एक अफलातून सोय आहे!

 

झाडांची सगळी पानंच गळून गेली की, मग बाष्पीभवनावाटे पाणी निघून जायचा प्रश्नच मिटला! त्यामुळे उपलब्ध पाणी झाडाला पुढच्या पावसाळ्यापर्यंत पुरतं. म्हणूनच शरद, हेमंत आणि शिशिर या पावसाळ्यानंतरच्या कोरड्या ऋतूंमध्ये पानझडी वृक्षांची भरपूर पानगळ होऊन ते निष्पर्ण झालेले दिसतात. अर्थात, झाडाच्या प्रजातीनुसार पानगळीचं प्रमाण आणि कालावधी बदलतो. सगळी पानं गळून गेली तर प्रकाशसंश्लेषण कोण करणार आणि झाडाला अन्नपुरवठा कसा होणार? यासाठीच वसंत ऋतू आला की, निष्पर्ण झालेल्या झाडांना नवीन पालवी यायला सुरुवात होते.अशाप्रकारे झाड अन्न आणि पाणी यांच्या पुरवठ्याचं संतुलन साधत असतात. काही शास्त्रज्ञांच्या मते, जमिनीतून झाडाला पोषणमूल्य किती मिळतात त्यावरही पानगळ अवलंबून असते. ती जर कमी मिळत असतील, तर पानगळ होणं आणि नवीन पालवी येणं यातला कालावधी कमी असतो. कारण, झाडाला अन्नासाठी पानांची गरज असते. अर्थात, हे वैशिष्ट्य फक्त पानझडी वृक्षांच्या बाबतीतच आहे. सदाहरित वृक्षांची यंत्रणा वेगळी असते. सदाहरित वृक्ष हे जास्त पावसाच्या प्रदेशात आढळत असल्याने त्यांना कोरड्या ऋतूतही पाण्याचा तुटवडा जाणवत नाही. त्यामुळे पानझडी वृक्षांसारखी त्यांची पानगळ होत नाही. सदाहरित वृक्षांची थोड्या प्रमाणात गळणारी पानं ही वय झाल्यामुळे गळतात. जुनी पानं गळणं आणि नवी येणं या दोन्ही क्रिया समांतर चालू राहतात. पावसाच्या प्रमाणानुसार झाडांनी केलेलं हे अनुकूलन आहे. विषुवुवृत्तीय प्रदेश हा पृथ्वीवरचा सर्वाधिक पावसाचा प्रदेश असल्याने या प्रदेशात सदाहरित वनं जास्त आहेत, तर विषुवुवृत्तापासून जसजसं ध्रुवीय प्रदेशाकडे जावं तसतसं पानझडी वृक्षांचं प्रमाण तुलनेने वाढत जातं. भारतातही पश्चिम घाट, आसाम अशा जास्त पावसाच्या प्रदेशांमध्ये सदाहरित वनं जास्त आहेत.

 

काही निरीक्षणकार असं सांगतात की, दिवस लहान-मोठे होण्यावरही काही झाडांची पानगळ होत असते. ध्रुवाकडच्या प्रदेशांमध्ये दिवस लहान झाल्यावर पानांना प्रकाशसंश्लेषणासाठी पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे पानांचं उपयोगमूल्य कमी होऊन झाडासाठी ती अनावश्यक भार बनतात. त्यामुळे या काळात पानगळ होते. चाफा, पळस या झाडांचं निरीक्षण केलं, तर सहज लक्षात येतं की, ही झाडं जेव्हा फुलतात तेव्हाच त्यांची पानं गळतात. झाडांना फुलण्यासाठी पुरेशी ऊर्जा आणि पाणी मिळावं, तसंच फुलांकडे कीटक आणि पक्षी आकर्षित व्हावेत यासाठी झाड या काळात पानांचा भार कमी करतं, असंही काही निरीक्षणकार सांगतात. खारफुटी वनस्पतींच्या बाबतीत पानगळ ही अधिकचे क्षार उत्सर्जित करण्याची यंत्रणा आहे. या वनस्पती खाऱ्या पाण्यात वाढतात. पाण्यावाटे वनस्पतीत आलेल्या क्षारांचं पानांमध्ये संचयन होतं आणि पानं सुकून गळतात तेव्हा ते आपोआप बाहेर टाकले जातात. अशाप्रकारे वनस्पती प्रजातीनुसार आणि बदलत्या भूगोलानुसार पानगळीची कारणं वेगवेगळी आहेत. वास्तविक पानगळीचं शास्त्र हे खूप गुंतागुंतीचं आहे. पण अभ्यास करायला मात्र मजेशीर आहे!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@