अनाथांना समाधान देणारा ‘संतोष’

    दिनांक  23-Dec-2018    
 
 
समाजकार्य करण्यासाठी तुम्ही किती श्रीमंत आहात? दानशूर आहात? हे महत्त्वाचे नसते. मनात जिद्द आणि अंगी कष्ट करण्याची तयारी असली की, याच जिद्दीच्या बळावर तुम्ही समाजात आमूलाग्र बदल घडवून आणू शकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संतोष गर्जे!
 

आजच्या तरुणाईला त्यांच्या स्वप्नांपुढे काही दिसत नाही. आपली स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी तरुणांची मेहनत करण्याची तयारीदेखील असते. परंतु, मी आयुष्यात कसा यशस्वी होईल? या गोष्टीचाच विचार प्रत्येकजण करत असतो. जीवनात पुढे जाताना, पैशांमागे धावताना, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना दुसऱ्यांचा, समाजाचा विचार खूप कमीजण करतात. असाच चांगला विचार करणाऱ्यांपैकी ‘संतोष गर्जे’ हे एक व्यक्तिमत्त्व! स्वत:साठी कोणीही जगेल. परंतु, दुसऱ्यासाठी जगण्यात जीवनाचा खरा आनंद दडलेला आहे, हे सत्य संतोषला खूप आधीच गवसले होते.

 

बीडमध्ये राहणारा संतोष आपल्या ‘सहारा’ या अनाथ आश्रमाद्वारे अनेक अनाथांचा आधार बनला. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी संतोषने ‘सहारा अनाथालया’ची स्थापना केली. समाजकार्य करण्यासाठी तुम्ही किती श्रीमंत आहात? दानशूर आहात? हे महत्त्वाचे नसते. मनात जिद्द आणि अंगी कष्ट करण्याची तयारी असली की, याच जिद्दीच्या बळावर तुम्ही समाजात आमूलाग्र बदल घडवून आणू शकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संतोष गर्जे! संतोषचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. वडील ऊसतोडणी कामगार होते. संतोषच्या बहिणीचा अकाली मृत्यू झाल्याने तिची दोन मुले पोरकी झाली. त्यांची जबाबदारी संतोषने स्वीकारली. परंतु, ही जबाबदारी स्वीकारताना त्याने समाजातील इतर अनाथ मुलांचाही विचार केला. आपल्या बहिणीच्या मुलांना जगातील कोणताही भाऊ स्वीकारेल, त्यांचा सांभाळ करेल. परंतु, परिस्थितीमुळे अनाथ झालेल्या चिमुरड्यांचे काय? त्यांना मदत करणे तर दूरची गोष्ट पण, अशा अनाथांकडे कोणी वळूनही पाहत नाही. अनेक धनाढ्य लोक, मोठ्या असामी आपला वाढदिवस अनाथाश्रमांमध्ये जाऊन तेथील मुलांसोबत साजरा करतात. आपल्या आयुष्यातील एक दिवस या मुलांसोबत व्यतित करतात. परंतु, पुढे मग वर्षभर त्या अनाथाश्रमाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. पण कोणतेही रक्ताचे नाते नसतानादेखील याच अनाथांना आसरा देऊन वर्षांनुवर्षे त्यांचा सांभाळ करणारा, त्यांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवणारा, त्यांच्यावर संस्कार करणारा संतोष हाच खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. कारण, मनाची श्रीमंती ही कधीही मोठी असते. आपल्या मनाचा हाच मोठपणा दाखवत, संतोष आज तरुण वयात आपली स्वप्ने बाजूला सारून आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लावत आहे. समाजकार्यासाठी वाहून घेणारे अनेकजण असतात. परंतु, यातली बहुतांश मंडळी ही आपले पोट भरले की, दुसऱ्याचा विचार करतात. वयाची अमूक वर्षे उलटली की, वेळ सार्थकी लावण्यासाठी समाजसेवा करतात. पण संतोषसारख्या तरुणांमुळे आणि त्यांच्या कार्यामुळे हे चित्र पालटताना दिसत आहे.

 

संतोष आज २८ वर्षांचा असून त्याने अर्थशास्त्रात पदवी संपादन केली आहे. मनात आले तर तो सहज कुठेही नोकरी करू शकतो. परंतु, केवळ स्वत:पुरता विचार करणे हेच मुळात संतोषला पटत नसल्याने त्याने हे अनाथांसाठीचे सेवाव्रत हाती घेतले. सुरुवातीच्या काळात ‘सहारा’तील मुलांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी संतोषकडे पैसे नसायचे. आर्थिक चणचण असायची. अशा परिस्थितीत दारोदारी भटकून, गावोगावी फिरून संतोषने आर्थिक मदत गोळा केली. सुरुवातीला पत्र्याच्या शेडमध्ये असलेला हा ‘सहारा परिवार’ पाहता पाहता स्वत:च्या मालकीच्या वास्तूत स्थलांतरितही झाला. ‘सहारा’तील मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये त्यांच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे शिक्षण घेऊ लागली. या सर्व कार्यात संतोषला त्याची पत्नी प्रीती हिची मोलाची साथ लाभली. प्रीती ही एक वकील आहे. प्रीती संतोषसोबत आज तिचा स्वत:चा संसार तर सांभाळत आहेच पण, त्याचबरोबर हे दोघेजण मिळून ‘सहारा’च्या रुपाने अनेक अनाथांसाठी आसरा बनले आहेत.

 

माणूस नेहमी आपण किती दु:खी आहोत, हेच पाहतो. आपलेच रडगाणे गात राहतो. स्वत:चाच विचार करतो. पण जेव्हा तो इतरांचे दु:ख न्याहाळतो. तेव्हा त्याला कळते की, त्याच्या वाटेला आलेले दु:ख हे फार कमी आहे. संतोषचेही काहीसे असेच झाले. बहिणीची पोरकी झालेली मुले त्याने आपलीशी केली. परंतु, त्यांच्याच वयाच्या इतर अनाथ मुलांचे दु:ख पाहून त्याने हा निर्धार केला. ‘सहारा’ची स्थापना करून त्याने अनेकांना आसरा दिला. आपले दु:ख झिडकारून त्याने अनेकांच्या जीवनात आनंदाचे बीज रोवले. आज ‘सहारा’तील मुले जेव्हा मोठी होऊन बाहेर पडतील. आपले विश्व निर्माण करतील. तेव्हा त्यांच्या जीवनात कितीही संकटे आली तरी, ही मुले डगमगणार नाहीत, कोलमडणार नाहीत. कारण, त्यांच्या मनातील ‘संतोष’ नावाचे समाधान कायम त्यांना स्फूर्ती देत राहील!

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/