मुंबईची मुक्तता

    दिनांक  23-Dec-2018   


 
 
 
 
आर्थिक राजधानी म्हणून दिमाखात वावरताना मुंबई नावाच्या सूर्याच्या काळजात किती दुखरे कोपरे असतील याची गणना होणार नाही. त्यापैकी एक दुखरा कोपरा आहे अग्नितांडवांचा. गेल्या दहा वर्षांत मुंबई शहरामधील आगीचा आढावा घेताना नोव्हेंबर महिन्यात नगर विकासमंत्री रणजित पाटील यांनी माहिती दिली होती की, गेल्या दहा वर्षांत मुंबईमध्ये ४९ हजार वेळा आगीमुळे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. या ४९ हजार घटनांमध्ये १४ हजार, ३२९ घटनांची कारणं तत्सम होती. तर गॅस गळतीमुळे १ हजार ११५ वेळा आग लागली. मात्र ३३ हजार, ९४६ वेळा आग लागण्याचे कारण होते चुकीची वीजजोडणी किंवा वीजजोडणीच्या संदर्भातले कारण. या आगींच्या घटनांमुळे गेल्या दहा वर्षात शेकडो माणसे मृत्युमुखी पडली तर जवळजवळ १.१ दक्षलक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंबई शहराचा इतिहास पाहिला तर, १७ फेब्रुवारी, १८०३ रोजी मुंबई शहर जुने फोर्ट येथे भयंकर आग लागली होती. त्या आगीच्या तांडवामध्ये औद्योगिक नगरी म्हणून नुकतेच कुठे पाऊल टाकायला सुरुवात केलेल्या मुंबई शहराचे अतोनात नुकसान झाले होते. विस्कळीत आणि कसलेही नियोजन नसलेले रस्ते, सामान्य नागरिकांच्या वसाहती यामुळे या आगीचा प्रभाव जबरदस्त वाढला होता. त्यामुळे म्हणे, इंग्रजांनी मुंबईचा शहर म्हणून विस्तार करायचे ठरवले. त्यानंतरची मुंबई विकसित होत गेली. हा विकास आर्थिक सुधारणेचा होता. जनविकासाचा होता. वेगाने मुंबई बदलत गेली. स्वातंत्र्यानंतरही मुंबईचा दिमाख आणि दर्जा कायमच होता आणि आहेही. मात्र, सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांनी मुंबईचा श्वास कोंडतोय की काय, असे वातावरण निर्माण झाले आहे. सगळ्या आगीच्या घटनांचा विचार केला तर वांद्रे झोपडपट्टीला लागणारी आग किंवा प्रशासकीय वास्तूंना लागणारी आग या दोन्ही ठिकाणी लागणाऱ्या आगी सामान्य मुंबईकरांसाठी संशयास्पद घटना असतात. असो, पूर्वी म्हटले जायचे की अस्ताव्यस्त पसरलेल्या झोपड्यांमुळे आगीला आमंत्रण मिळते. पण आता दुर्दैवाने असेही दिसून येते की, उंचच उंच इमारती, भव्यदिव्य गगनचुंबी वास्तूंना आगीची झळ पोहोचत आहे. त्यातून हॉटेल्स, इस्पितळे आणि प्रशासकीय वास्तूही सुटत नाहीत. अग्नितांडवापासून मुंबईची मुक्तता कधी होईल?
 

अग्नीची जनजागृती

 

मुंबई शहरातील उंचच उंच इमारती दुरून पाहिल्यात का? या गगनाला भेदू पाहणाऱ्या इमारतींकडे पाहून डोळे फिरतात. इमारतींच्या प्रत्येक मजल्यावरची स्वतंत्र कहाणी असलेली ती घरं. त्यांना पाहून वाटते की, आगीच्या काडेपेट्या (माचिस) एकावर एक आणि आजूबाजूला सजवून ठेवल्या आहेत. या दुरून माचिससारख्या दिसणाऱ्या इमारतीतील घरे मात्र खऱ्या अर्थाने माचिसच्या अंगाखाद्यावर आहेत, असे वाटते. कारण गेल्या चार वर्षांत अग्निशमन दलाने दर महिन्याला सरासरी १२० इमारतींची पाहणी केली. त्यानुसार किती इमारतीत अग्नी सुरक्षा नियमांचे पालन केले जाते याचे परीक्षण करण्यात आले. या परिक्षणाचा निकाल होता की, मुंबईतील ५० टक्के इमारतींमध्ये आग प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवले आहेत. मौल्यवान आयुष्याला नशिबाच्या हवाली केले आहे. इतका निष्काळजीपणा का? तर दुसरीकडे सात शहारांच्या बेटांना एकत्रित करून पुढे जमेल तसे वाढणारे मुंबई शहर. शहराची आडवी बांधणी अशक्य झाली आणि वेध सुरू झाला आकाशाचा. आकाशाला गवसणी घालणाऱ्या गगनचुंबी इमारती, टॉवर बांधण्याचा सपाटा सुरू झाला. जागेला सोन्याचा भाव आला आणि माणसाच्या जीवाला मर्यादा आल्या. मुंबईत स्वतःचे छप्पर मिळवणे, हे मोलाचीच गोष्ट. पण हे छप्पर पुढे जाऊन आगीचा डोंब होऊन आपला घास घेणार नाही ना? हे पाहण्याचे नैसर्गिक भानही लोकांना नाही. लोकांच्या मते आग लागली तर आहे ना अग्निशमन दल विझवायला. आमच्या घरात आग लागू नये म्हणून आम्ही प्रतिबंध केले आहेत ना बस. मात्र, वास्तव हे आहे की, उत्तुंग इमारतीमध्ये आग लागली असता तिथपर्यंत पोहोचून आग विझवण्याची अद्ययावत यंत्रणा आजही अग्निशमन दलाकडे नाही. त्यामुळे अशा इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर आग लागल्यास तिथपर्यंत पोहोचणे अग्निशमन दलाच्या जवानांना शक्य होत नाही. अग्निशमन दलाकडे सर्वात उंच म्हणजे ९० मीटरपर्यंत पोहोचणाऱ्या शिड्या आहेत. त्या इमारतीच्या २८ व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकतात. त्यापुढच्या मजल्यांचे काय? राज्यात त्यातल्या त्यात मुंबई शहरात ठिकठिकाणी लागणाऱ्या आगींचे तांडव हा भयाण प्रश्न आहे. ठिकठिकाणी आग विझवणारी करणारी यंत्रणा बसवली तरी त्याबाबत जनजागृती होणार कधी?

 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्यारोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/