अमेरिकेत शटडाऊन, कर्मचाऱ्यांचे हाल

22 Dec 2018 18:25:18

 


 
 
वॉशिंग्टन : शुक्रवारी मध्यरात्रीपासून अमेरिकेत सरकारला शटडाऊन लागू करावे लागले आहे. मेक्सिकोच्या सीमेवर संरक्षण भिंत उभारण्याची मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संसदेकडे केली होती. संसदेने नकार दिल्यास सरकारी खर्चांवर अधिकृत स्वाक्षरी करणार नाही. अशी धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संसदेतील खासदारांना दिली होती. यासंदर्भात अमेरिकेतील वरिष्ठ सभागृहाच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुरक्षा भिंत उभारण्यासाठी निधी देण्याच्या मुद्द्यावर एकमत होऊ शकले नाही. बजेटवर राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वाक्षरी करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला. परिणामी अमेरिकेमध्ये शटडाऊन लागू करावे लागले.
 

ख्रिसमस जवळ आला असताना जगभरात एकीकडे त्याची तयारी सुरु आहे. परंतु अमेरिकेत मात्र 8 लाख कर्मचाऱ्यांपैकी ३.८ लाख कर्मचाऱ्यांना बिनपगारी सुट्टीवर जावे लागणार आहे. उर्वरित ४ लाख २० हजार कर्मचाऱ्यांना काम करावे लागणार असून त्याचा मोबदला त्यांना देण्यात येणार नाही. अमेरिकेतील केंद्र सरकारच्या एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांना या शटडाऊनची झळ सोसावी लागणार आहे. पोलीस, परिवहन, कृषी विभाग, परराष्ट्र मंत्रालय आणि न्यायालयीन विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर या शटडाऊन दरम्यान राष्ट्रीय अभयारण्ये आणि जंगलेदेखील बंद ठेवली जाणार आहेत.

 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ 
 
Powered By Sangraha 9.0