जम्मू-काश्मीरमध्ये ६ दहशतवाद्यांचा खात्मा

22 Dec 2018 12:55:44

 

 
  
पुलवामा : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या दहशवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
 

अवंतीपोरा येथील त्राल परिसरात असलेल्या आरमपोरा या गावात दहशतवादी लपून बसले होते. ही माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. शनिवारी सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसरात लपून बसलेल्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम राबवली. दरम्यान, दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर हे ऑपरेशन संपल्याचे जवानांनी स्पष्ट केले.

 

या चकमकीमध्ये मारण्यात आलेले दहशतवादी हे झाकीर मुसाच्या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी या वर्षभरात २३० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्याच आठवड्यात पुलवामा येथे असलेल्या सिरनू गावात सुरक्षा दलाच्या जवानांनी ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. परंतु त्यानंतर तेथील स्थानिक तरुण रस्त्यावर उतरले होते. यावेळी ६ तरुणांचा मृत्यू झाला होता.

 
 
   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/
 
 
 
Powered By Sangraha 9.0