‘हिंदू दहशतवादा’चा पर्दाफाश करणारे पुस्तक

    दिनांक  22-Dec-2018   सत्तेचा मोह, नेतेपदाचा गर्व आणि नोकरशाहीला हवं तसे झुकवण्याची काही काँग्रेसी नेत्यांची हुकूमशाही वृत्ती यांचे या पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन मनस्वी चीड आणणारे आहे. त्यामुळे ‘हिंदू दहशतवादा’चा पर्दाफाश करणारे हे पुस्तक प्रत्येक हिंदू बांधवाने तर वाचलेच पाहिजे, शिवाय हिंदू धर्मावर टीका करणाऱ्यांची पुराव्यांसहित बोलती बंद करण्यासाठी या पुस्तकातील संदर्भ कामी येऊ शकतात.


दहशतवादाला कुठलाही रंग, धर्म नसतो, असे वरकरणी म्हटले तरी, दहशतवादाच्या पुढे धर्माचे बिरुद आपसुकच चिकटवले जाते. इतकी वर्षं केवळ इस्लामला दहशतवादाशी जोडण्यात आले. पण, संपुआ सरकारच्या काळात ‘दहशतवादा’सारखा सर्वार्थाने मोठा भयंकर शब्द चक्क हिंदू धर्माशी जोडण्याचे महापाप काही काँग्रेसी नेत्यांनी केले. जो हिंदू धर्म सत्य, अहिंसा, बंधुभाव याची शिकवण देतो, त्याच हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडण्याचे कुभांड काँग्रेसींनी काही नोकरशाहांच्या मदतीने अगदी शिताफीने रचले आणि ‘हिंदू दहशतवाद’ नामक एका भ्रामक संकल्पनेला देशाची दिशाभूल करण्यासाठी, मतपेढीच्या राजकारणासाठी जन्म दिला. दुर्दैवाने, ‘सनसनी’साठी उतावीळ माध्यमांनीही ‘हिंदू दहशतवादा’च्या काँग्रेसी दाव्यांवर, दस्तावेजांवर आंधळेपणाने विश्वास ठेवला. त्यामुळे देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची छी-थू झालीच, शिवाय हिंदू धर्मावर चिखलफेक झाली ती वेगळीच. परंतु, वर म्हटल्याप्रमाणे बहुसंख्य माध्यमांनी दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत सरकारी माहिती ग्राह्य धरुन वृत्तांकन केले आणि त्यामुळेहिंदू दहशतवादा’मागील खरे सत्य, तथ्ये कधीही जनतेसमोर आली नाहीत. पण, गृहखात्यातील अंतर्गत सुरक्षा विभागाचे माजी अवर सचिव आरव्हीएस मणी यांनी ‘द मिथ ऑफ हिंदू टेरर’ या पुस्तकातून ‘हिंदू दहशतवाद’ या काँग्रेसरचित षड्यंत्राचा पदार्फाश केला. दुर्दैवाने, त्यांच्या या इंग्रजी पुस्तकाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण, त्यामुळे सत्य मात्र लपून राहत नाही. त्या पुस्तकातील मणी यांनी त्यांच्या गृहखात्यातील सेवेदरम्यान मांडलेले अनुभव खरंच अंगावर काटा आणणारे आहेत. तेव्हा, इंग्रजी पुस्तकातील ही अनाकलनीय माहिती मराठी वाचकांपर्यंतही पोहोचावी म्हणून या पुस्तकाचा अरुण करमरकर यांनी स्वैर अनुवाद करूनहिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ हे पुस्तक ‘परम मित्र पब्लिकेशन’च्या माध्यमातून प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे नुकतेच मुंबईतील हॉटेल ताज महाल पॅलेस इथे निमंत्रितांच्या उपस्थितीत लेफ्ट. जनरल (नि) दत्तात्रय शेकटकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातील काही प्रसंग, घटना अगदी विचलित करणाऱ्या, मन सुन्नं करणाऱ्या आहेत. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, कुठलीही माहिती ही केवळ कल्पनाविलासावर, ठोकताळ्यांवर, अंदाजांवर आधारित नाही. मणी यांनी सरकारी दस्तावेज, माध्यमे, त्यांच्याकडील नोंदी यांच्या आधारेच अगदी मुद्देसूदपणे १४ प्रकरणांच्या माध्यमातून ‘हिंदू दहशतवादा’मागील खऱ्या चेहऱ्यांचा बुरखा फाडला आहे. त्यामुळे या पुस्तकात केलेले दावे हे सबळ पुराव्यांच्या आधारावरच लेखकाने परखडपणे मांडले आहेत आणि विशेष म्हणजे, या पुस्तकातील आरोपांवर, दाव्यांवर आजवर कोणीही कुठलाही आक्षेप नोंदवलेला नाही.

 

या पुस्तकातील घटनांचा सविस्तर तपशील समजून घेण्यापूर्वी लेखकाने गृहमंत्रालयातील पदानुक्रम, कार्यप्रणाली सविस्तरपणे विशद केली आहे, जेणेकरून वाचकांना मणी तसेच केंद्रीय गृहमंत्रालयातील अंतर्गत सुरक्षा विभाग कसा काम करतो, याची प्राथमिक माहिती मिळते. म्हणजे सांगायचेच झाले, तर लोकसभेत-राज्यसभेत उपस्थित होणारे तारांकित प्रश्न, शून्य प्रहरातील प्रश्न वगैरे. तेव्हा, संबंधित खात्याचे मंत्री जरी एखाद्या विषयाचे निवेदन प्रस्तुत करत असले तरी ते निवेदन तयार करणारी, त्यासाठी उचित माहिती वेळेत गोळा करणारी एक मोठी अधिकाऱ्यांची फौजच कार्यरत असते. त्याच आधारे हे मंत्रिमहोदय आपल्या निवेदनातून, भाषणांतून आकड्यांची अगदी सहजपणे मांडणी करतात. पण, बहुतांशी ते त्या नेतेमंडळींनी वैयक्तिकरित्या केलेले संशोधन नसून या अधिकाऱ्यांनी केलेली मेहनत असते, हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे दहशतवादी हल्ल्यांपासून देशाच्या सुरक्षेची इत्यंभूत माहिती ही गृहखात्याला आणि खासकरून अधिकाऱ्यांना अगदी ‘फर्स्ट हँड’ प्राप्त होते. पण, या संवेदनशील माहितीतही फेरफार करण्याचे, ती गहाळ करण्याचे गंभीर, देशविरोधी प्रकार काँग्रेसच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी कसे केले, याचा लेखाजोखाच लेखकाने वाचकांसमोर ठेवला आहे.

 

२००६ ते २०११ या काळात घडलेल्या दहशतवादी घटना, त्यामागील संशयित, अटक करण्यात आलेले आरोपी, न्यायालयातील खटले, तपास यंत्रणा आणि काही खटल्यांच्या तपासात केला गेलेला उच्चस्तरीय हस्तक्षेप या साधारण स्वरूपात विविध खटल्यांचा परामर्श लेखकाने घेतला आहे. ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाची ज्या प्रकरणापासून सुरुवात झाली, त्या नांदेडच्या समीर कुलकर्णी याच्या फॅक्टरीतील स्फोटांचा दहशतवादाशी संबंध जोडला गेला. का, तर त्याचा दोष हाच की, समीर कुलकर्णी हा बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. हे असे पहिले प्रकरण होते, जिथे ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचा प्रयोग केला गेला. हळूहळू अगदी नियोजनबद्ध, पण छुप्या पद्धतीने विशिष्ट मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने तपास यंत्रणांच्या तपासाची दिशा मुद्दाम कपोलकल्पित ‘हिंदू दहशतवादा’कडे वळविण्यात आली. तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील, तत्कालीन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांचाही लेखकाला जवळून परिचय आला. त्यांच्या बोलण्यातील विषय, नेमक्याच माहितीमधील रस याचेही नेमके संदर्भ लेखकाने या पुस्तकात उद्धृत केले आहेत. त्यानंतर ८ सप्टेंबर, २००६ रोजी झालेल्या मालेगाव स्फोटानंतरही अशीच ‘हिंदू दहशतवादा’च्या थिअरीची परस्पर मुद्दाम पेरणी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झालेल्या अहवालात या हल्ल्यात एका मुस्लीम दहशतवादी गटाचा संबंध होता. पण, त्यामध्येही कर्नल श्रीकांत पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह यांना तपास यंत्रणांकरवी गोवण्यात आले. विशेष बाब म्हणजे, ११ जुलै, २००६ रोजी झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील संशयितांना ताब्यात घ्यायला एटीएसला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागला, पण मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाची दिशा अवघ्या महिन्याभरात बदलून ‘हिंदू दहशतवादा’च्या नावाखाली कर्नल पुरोहितांना ताब्यात घेतले गेले. यावरून सरकारची, सरकारच्या हाताखाली बाहुले म्हणून वावरणाऱ्या काही अधिकाऱ्यांची नियत लक्षात येते. २००६ पासून सुरू झालेल्या या ‘हिंदू दहशतवादा’च्या काँग्रेसकृत भूताला हळूहळू आणखीन मोठे केले गेले. या सगळ्या प्रकरणाने कळस गाठला तो २६ नोव्हेंबर, २००८च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी. विशेष बाब म्हणजे, हा हल्ला होण्यापूर्वी गृहमंत्रालयातील सर्व महत्त्वाचे अधिकारी, अंतर्गत सुरक्षा विभागाचे सचिव अशा आपात्कालीन परिस्थितीत माहितीची देवाणघेवाण, सुरक्षेसंबंधी उपाययोजना करणाऱ्या या मंडळींचे शिष्टमंडळही पाकिस्तान दौऱ्यावर होते. या भारतीय शिष्टमंडळाला संपर्क व्यवस्था अत्यंत दुर्बल असलेल्या मुरी येथे नेण्यात आले. त्यामुळे या शिष्टमंडळाचे मुरी येथे अडकणे आणि नेमका त्याच वेळी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला यावर काही प्रसारमाध्यमांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी हल्ल्यावेळी मुंबईतील सैन्याची कुमक न वापरता दिल्लीहून एनएसजीच्या तुकड्या पाठविण्याचा घेतलेला निर्णय, त्यांच्याबरोबर स्वत: जबाबदारी म्हणून मुंबईत न येता संपर्ककक्षेच्या बाहेर जाणे, अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि पुढचे आदेश न देणे यांसारखे गंभीर प्रकारही मणी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आणले आहेत. हे कमी की काय म्हणून, ज्यावेळी ताज हॉटेलमध्ये अतिरेकी चाल करून गेले, त्यावेळी गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव चित्कला झुत्शी यांची संशयास्पद उपस्थिती आणि सुटका यावरही लेखकाने सवाल उपस्थित केले आहेत. तसेच २६/११च्या दहशतवादी हल्ल्यामागील पाकमधून शिजलेले संपूर्ण कटकारस्थान आणि दहशतवाद्यांना मिळालेल्या अंतर्गत मदतीचा संशय यावरही लेखकाने पुस्तकात भाष्य केले आहे.

 

यातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, मणी यांचा २६/११च्या हल्ल्यानंतर झालेला अपहरणाचा प्रयत्न आणि गृहविभागाच्या एका अधिकाऱ्यास (लेखक खुद्द) ओलीस ठेवून कसाबला सोडविण्याचा शिजलेला कट. त्यामुळे कुठे तरी मणी यांच्या जीवितालाही धोका होताच. पण, इशरत जहाँ प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे न्यायालयात शपथपत्र दाखल करण्याची जबाबदारी असलेल्या मणी यांनी त्याच शपथपत्रात नंतर सरकारनुरूप बदल करण्यासाठी प्रचंड दबावालाही सामोरे जावे लागले. त्यामध्ये सीबीआयच्या संचालकांनी त्यांचा वेळोवेळी केलेला पाठलाग, कामामध्ये अडथळा आणणण्याचा केलेला प्रयत्न, त्यांच्या घरात घुसून घातलेला धुडगूस या सगळ्यामुळे त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना झालेला मनस्ताप, त्यांच्या आईचे निधन अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनांचे चित्रण वाचून संताप आल्याशिवाय राहत नाही. पण, मणी यांनी अखेरपर्यंत हार मानली नाही. ते लढत राहिले. मणी यांचे वैयक्तिक अनुभव आणि गृहमंत्र्यांच्या पातळीवरुन रचली गेलेली ही षड्यंत्र एकाच गोष्टीकडे अंगुलीनिर्देश करतात की, ‘हिंदू दहशतवादा’चा हा बागुलबुवा उभा करण्यात काँग्रेसचा हात आहे, यात तीळमात्रही शंका नसावी. केवळ आणि केवळ आपल्या मुस्लीम मतपेढीला कुरवाळण्यासाठी, हिंदुत्ववादी संघटना, पक्ष, नेते यांना नेस्तनाबूत करण्यासाठी ‘हिंदू दहशतवादा’च्या नावाखाली ही नीचकृत्ये अगदी निलाजरेपणाने पडद्याआड घडत होती. सत्तेचा मोह, नेतेपदाचा गर्व आणि नोकरशाहीला हवं तसे झुकवण्याची काही काँग्रेसी नेत्यांची हुकूमशाही वृत्ती यांचे या पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन मनस्वी चीड आणणारे आहे. त्यामुळे ‘हिंदू दहशतवादा’चा पर्दाफाश करणारे हे पुस्तक प्रत्येक हिंदू बांधवाने तर वाचलेच पाहिजे, शिवाय हिंदू धर्मावर टीका करणाऱ्यांची पुराव्यांसहित बोलती बंद करण्यासाठी या पुस्तकातील संदर्भ कामी येऊ शकतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी २६/११च्या हल्ल्यावेळी अग्निज्वाळांत धुमसणाऱ्या ताज हॉटेलचे छायाचित्र बरेच काही सूचित करून जाते. पुस्तक अत्यंत माहितीपूर्ण आणि सुबक छपाईचे असले तरी, प्रकरणानुरूप पुस्तकामध्ये छायाचित्रांचा समावेश करता आला असता, तर त्या पुस्तकाच्या सजावटीत निश्चितच भर पडली असती. पण, एकूणच ‘हिंदू दहशतवादा’च्या पोकळ दाव्यांना खोडून काढणारे असे हे संदर्भमूल्य संपन्न पुस्तक वाचकांच्याही पसंती पडेल, अशी आशा करायला हरकत नाही.

 

पुस्तकाचे नाव : हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड

मूळ लेखक : आरव्हीएस मणी

अनुवाद : अरुण करमरकर

प्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन्स

पृष्ठसंख्या : १६०

मूल्य : २५० रुपये

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/