नाशिक ते शेगाव ‘रॉयल सायकलवारी’

    दिनांक  22-Dec-2018   आध्यात्मिक नगरी नाशिक ते संतनगरी शेगाव अशी सायकलवारी काढावी आणि सायकल वापरासंबंधी प्रसार आणि प्रचार करावा, अशी इच्छा ‘नाशिक सायकलिस्ट असोसिएशन’च्या काही सदस्यांच्या मनात आली. त्यांनी त्याला मूर्त स्वरूपदेखील दिले.


संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेले स्थान म्हणून शेगाव अवघ्या देशाला सुपरिचित आहे. आध्यात्मिक नगरी नाशिक ते संतनगरी शेगाव अशी सायकलवारी काढावी आणि सायकल वापरासंबंधी प्रसार आणि प्रचार करावा, अशी इच्छा ‘नाशिक सायकलिस्ट असोसिएशन’च्या काही सदस्यांच्या मनात आली. त्यांनी त्याला मूर्त स्वरूपदेखील दिले. याबद्दल असोसिएशनचे सदस्य आणि या वारीचे नियोजनकर्ते डॉ. आबा पाटील यांच्याकडून जाणून घेतले असता ते म्हणाले की, “आम्ही अवघ्या १२-१५ जणांनी मिळून शेगाव वारी सुरू केली. त्याअगोदर योगेश शिंदे आणि मित्र परिवार, जल्लोष ग्रुप, मुक्त विद्यापीठ परिवार नाशिक ते शेगाव असा सायकल प्रवास करून आलेला होता. मात्र, आज सांगताना मला आनंद होतो की, ‘नाशिक सायकलिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया रामभाऊ लोणारे, राजाभाऊ कोटमे, हेमंत अपसुंदे किशोर, भाऊसाहेब काळे, डॉ. शिरीष राजे आणि मी स्वत: तसेच ‘सायकलिस्ट’चे सदस्य व परिवार यांनी या वारीसाठी खूप प्रयत्न केले.”

 

या मोहिमेच्या दिवसांचे वर्णन करताना डॉ. आबा पाटील यांच्या चेहऱ्यावर कर्तृत्वाची एक वेगळीच झळाळी आपल्याला दिसून येते. या मंतरलेल्या दिवसांचे दिवसागणिक वर्णन करताना ते सांगतात की, “आम्ही पहिल्या दिवशी नाशिकमधील शिवशक्ती सायकल शॉपपासून मान्यवरांच्या हस्ते ध्वज दाखवून या वारीची सुरुवात केली. पिंपळगाव येथे स्वागत व चहा झाला. त्यानंतर वडाळी येथे नाश्ता घेऊन पुढे प्रस्थान केले. काही जणांनी रेणुकामातेचे दर्शन घेतले व पुढे माझे गाव सौंदाणे येथे शेंगदाणे, गूळ, केळी, लिंबूपाणी देऊन सर्व सायकलस्वारांचे स्वागत करण्यात आले. यानंतर सायकल निघाली, ती थेट मालेगाव रॉयल पॅलेस येथे. सर्व सायकलवीरांनी यथेच्छ स्वादिष्ट खीर व जेवणाचा आस्वाद घेतला. मालेगावकरांच्यावतीने सर्वांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्यानंतर सायकलवारी निघाली धुळ्याच्या दिशेने. तेथेही धोत्रे काकांच्या मित्रांनी आमचा सत्कार व चहा-बिस्किटे देऊन पाहुणचार केला. सुमारे १६० किमींचा प्रवास करून आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. यावेळी रात्री एक तास मनसोक्त नाचून सायकलस्वारांनी आपला क्षीण घालविला आणि थकलेले शरीर घेऊन ते झोपले, ते दुसऱ्या दिवसाच्या ताज्या सळसळत्या उत्साहासाठी.” दुसऱ्या दिवशीचा अनुभव कथन करताना डॉ. पाटील म्हणाले की, “पहिल्या दिवसासारखाच उत्साह सकाळी ५ वाजल्यापासून सगळ्यांमध्ये जाणवत होता. सकाळी ६ वाजता दिगंबर मोरे यांनी सर्व सायकलवीरांचे स्ट्रेचिंग, योग असे व्यायामप्रकार करून घेतले व आम्ही निघालो. ४० किमी अंतरावरील एरंडोल येथे हेमंत अपसुंदे यांनी केलेल्या उत्तम व्यवस्थेसह आम्ही सात्त्विक असा पराठा, दही, चहा यांची न्याहारी केली. जळगाव येथे जैन इरिगेशन तसेच आयुक्त, महापौर यांच्या हस्ते आमचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर आम्ही चवदार जेवणाचा आनंद घेतला. पुढे ‘हॉटेल सायली’ येथे संदीप धांडे यांच्या मित्राचे आदरातिथ्य स्वीकारून एकूण १३० किमींचा प्रवास करून फुलगाव येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. यावेळी मात्र आम्हाला खराब रस्ते, अन प्रचंड वाहतूक खोळंबा यांचा सामना करावा लागला.”

 

तिसऱ्या दिवशीचा अनुभव सांगताना डॉ. पाटील म्हणाले की, ‘’फुलगावची सकाळ आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली. कारण, या दिवशी त्यांना पहाटे ५.३० वाजता सायकलवरून प्रवास करत भेटण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया हे आले होते. त्यांना पाहून आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. त्यांच्या बरोबर दिवसाची सुरुवात झाली. मुक्ताईनगर येथे संदीप धांडे यांच्या मित्राच्या फार्मवर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. जवळच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन सर्वांनी नाथाभाऊंची भेट घेतली. त्यांनी यावेळी आमच्या या वारीचे खूप कौतुक केले. मलकापूर येथे अजय आवारे यांच्या मित्राचा पाहुणचार अन् नांदुरा येथे मित्रवर्य प्रकाश काळे यांच्या मित्रांनी दुपारी जेवणाची केलेली उत्तम व्यवस्था, ही आमच्यासाठी तर शब्दातीत अनुभव ठरली.” या सायकलवारीच्या अंतिम टप्प्याबाबत बोलताना ते म्हणाले की, “या दिवशी खूप हवा होती. तिचा सामना आम्हाला करावा लागला. वारा कापत आम्ही तोही पूर्ण केला. शेगाव येथे पोहोचल्यावर सर्व सायकलवीरांच्या मनातला आनंद गगनात मावत नव्हता. ४१७ किमीचे अंतर सायकलवरून केवळ तीन दिवसांत पार केल्याचे समाधान आजही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते.” गजानन महाराज समाधी दर्शन व प्रसाद घेऊन ते आता परतीच्या प्रवासाला निघाले. यावेळी खामगाव येथे माजी आमदार प्रदीप वडनेरे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी सर्व सायकलवीरांचा मानचिन्ह, प्रमाणपत्र व येवल्याचा भत्ता देऊन सन्मान केला. ही वारी निर्विघ्न पार पडण्याकरिता स्वयंसेवक रत्नाकर सर, स्वप्निल, महेश टेक्निशियन दिनेश आणि आयशर चालक रामभाऊ यांनी मोलाचे सहकार्य केले. फिटनेस आणि ध्येयपूर्ती यांनी ओतप्रोत भरलेली ही सायकलवारी खऱ्या अर्थाने ‘रॉयलवारी’ ठरली आहे, हे निश्चित!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/