इश्क़ की कीमत पूछ लो मुझसे...

    दिनांक  21-Dec-2018   


मौत के पास जा कर भी देखा है

मैंने दिल लगा कर भी देखा है

इश्क़ की कीमत पूछ लो मुझ से

मैंने घर तक लुटा कर भी देखा है

प्रेमाखातर पाकिस्तानपर्यंत पोहोचलेल्या आणि नंतर तिथेच खितपत आपल्या आयुष्याची सहा अमूल्य वर्षं व्यतीत केलेल्या हमीद अन्सारीच्या भावनाही या शायरीप्रमाणेच असाव्यात. मंगळवारी हमीदचे भारतात आगमन झाले आणि केवळ प्रेमासाठी त्याने भोगलेल्या व्यथांनी लाखो प्रेमवीरांचे मन हेलावले नसेल तरच नवल. अगदी मसालेदार बॉलीवूड चित्रपटाला शोभेल अशी हमीदची प्रेमकहाणी. प्रेमासाठी ‘दरिया’ पार करणं एकवेळ परवडलं, पण हमीदने आपल्या प्रेमासाठी चक्क पाकिस्तान प्रवेशाचा जीवावर बेतणारा धोका पत्करला. अधिकृतरित्या प्रवेश मिळत नाही म्हटल्यावर बेकायदेशीररित्या, खोट्या ओळखपत्रांवर तो अफगाणिस्तानातून पाकिस्तानात शिरला आणि अवघ्या काही क्षणांत त्याला त्याच्या या चुकीचा पश्चात्ताप झाला. आपल्या आयुष्याचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल २,२३२ दिवस हा प्रेमवीर पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडून होता. भारतासाठी हेरगिरीच्या आरोपाखाली हमीदला अटक झाली आणि अनन्वित शारीरिक-मानसिक छळाचा एक अंधःकारमय प्रवास सुरू झाला.

फेसबुकच्या प्रेमळ व्हर्च्युअल दुनियेतून हमीद थेट पाकिस्तानी तुरुंगाच्या काळकोठडीत असा कुजत पडला. का...तर फक्त आपल्या प्रेमासाठी... ज्या मुलीवर प्रेम केले, तिचीही जबानी नोंदवल्यानंतरही हमीदवर हेरगिरीचा खोटा ठपका ठेवण्यात आला. इतकेच काय, तर ज्या ऑनलाईन पाकिस्तानी मित्रांनी त्याला अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात प्रवेश करण्याचा मार्ग दाखवला, तेच मित्र त्याच्या पाठीत खंजीर खुपसून मोकळे झाले. अफगाणिस्तानातून पाकभूमीवर पाऊल ठेवताच हमीदला अटक करण्यात आली. त्याने आपली बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी ‘भारतीय’ असल्यामुळे तो साहजिकच पाकिस्तानींच्या विश्वासाला पात्र नव्हताच. हमीदची प्रेमाची गुलाबी नशा एका झटक्यात खाडकन् उतरली. आपण या नरकातून कधी बाहेर पडूच शकत नाही, याच तुरुंगात हालअपेष्टा भोगत आपण मृत्यूला कवटाळणार म्हणून क्षणोक्षणी हमीद स्वत:ला कोसत होता. दूषणे देत राहिला. जगवण्यासाठी अन्नाचे एकवेळ दोन घास, दिवसातून एकदाच शौचालयाची मुभा, ३०-४० दिवसांतून एकदाच आंघोळ, त्यामुळे शरीरावरच पोसणार्‍या अळ्यांचा उपद्रव, स्वत:च्याच शरीराची येणारी कीळस अशा घृणास्पद स्थितीतही हमीदचा कसाबसा श्वास सुरू होता. अखेरीस दोन पाकिस्तानी वकिलांच्या मदतीने हमीदचे प्रकरण पुढे सरकले. हमीद भारतीय हेर नसून आपल्या प्रेमाच्या शोधात पाकिस्तानात आल्याचे न्यायालयात पटवून दिले गेले. पण, बेकायदेशीरपणे आणि खोट्या ओळखपत्रांच्या आधारे पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी त्याला शिक्षा भोगावीच लागली. भारत सरकारनेही हमीदच्या सुटकेसाठी, त्याच्या भेटीसाठी पाकिस्तान सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, पण पाकिस्तान सरकारने सवयीप्रमाणे त्याला केराची टोपली दाखवली. असे हजारो निर्दोष भारतीय आजही पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडून आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेले कुलभूषण जाधव, चुकून सीमापार गेलेला चंदू चव्हाण हा भारतीय जवान अशी अनेक प्रकरणे आपल्यासमोर आहेतच. पण, म्हणतात ना प्यार अंधा होता है, तेच खरं...भारतात परतल्यावर,” फेसबुकवरून प्रेम करू नका, तुमच्या पालकांपासून काहीही लपवू नका आणि कुठल्याही देशात अनधिकृतपणे प्रवेश करू नका,” असा मोलाचा सल्ला हमीद तरुणांना देतो. हमीदची ही हृदयद्रावक कथा खरंच आजच्या ‘इंटरनेटवाला प्यार’ शोधणार्‍या तरुणाईला खडबडून जागे करणारी आहे. प्रेमाच्या धुंदीत, सळसळत्या रक्ताच्या नशेत असे कुठलेही पाऊल उचलण्याची किती मोठी किंमत मोजावी लागू शकते, ते हमीदच्या उदाहरणांवरून दिसून आले. हमीद ज्या मुलीसाठी आपला देश सोडून पाकिस्तानात गेला, त्या मुलीचे लग्नही झाले. तिचा संसार सुखाचा होवो, हीच मनोकामना आता तोही व्यक्त करतो. कारण, याच प्रेमापोटी आयुष्यभरचा एक धडा त्याला मिळाला. भारतात परतल्यावर आता नोकरी शोधून, आपल्या पालकांसाठी जगण्याचा मानस हमीदने व्यक्त केला आणि जाता जाता...त्याला नव्या जोमाने, उत्साहाने जगण्याचे बळ मिळो, हीच सदिच्छा!

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/