देव, देश अन् धर्मासाठी...

    20-Dec-2018
Total Views |

 
 
मानवी जीवनाचे सार सांगणारी भगवद्गीता घराघरांत पोहोचावी. तसे घडले, तर हा देश सध्याच्या तुलनेत अधिक शंभर पटीच्या सामर्थ्यासह विश्वगुरू म्हणून जगासमोर येईल... हा विश्वास परवा, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला, ती केवळ एका धर्मग्रंथाची वाहवाही नव्हती. तो संदेश होता तमाम मानवीसमूहाला. स्वत:च्या जगण्याचा उद्देश, नव्याने तपासून बघण्याचा. स्वत:च्या अस्तित्वाचा शोध नव्याने घेण्याचा. मानवाचा अद्भुत जन्म लाभल्यानंतर, एकदा जगायचे कसे आणि कशासाठी हे निश्चित झाले की मग विचारांची, आचाराची दालनं आपसूकच खुली होत जातात. विचारांचा दृष्टिकोन अधिक विकसित होत जातो. राग-लोभांची कुंपणं अस्तित्वहीन ठरतात. विस्तीर्ण उद्देशांपुढे छोटी-मोठी संकटं कवडीमोल ठरतात. त्यांच्याशी दोन हात करण्याची शक्ती वृद्धीगत होत जाते. त्यांच्या तुलनेत विश्वकल्याणाची कामना श्रेष्ठ ठरते...
 
मुळात, भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्यच हे आहे. इथे पाश्चात्त्यांसारखा संकुचित, आत्मकेंद्रित विचार नाही. इथे विचार सर्वांचा आहे. सर्वांसाठी आहे. चिंता सर्वांची आहे. कामना सर्वांसाठी आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखायची कल्पना आहे. विश्वाच्या मनीचे आर्त समजून घेण्याचा मानस आहे. जगाच्या कल्याणाची कामना करणारी वृत्ती आहे. सगळ्यांचे चांगले चिंतिणारा विचार आहे. बर्या-वाईटांचा, धर्म-अधर्माचा भेदाभेद करू शकण्याचे सामर्थ्य माणसामाणसांत निर्माण होण्याची, चांगल्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची अन् वाईटाविरुद्ध पेटून उठण्याची शक्ती त्याच्यात निर्माण करण्याची, तसे संस्कार त्यात रुजविण्याची गरज सदासर्वकाळ असते. भगवंतांनी भर रणांगणात अजुर्नाला युद्धाला सामोरे जाण्यासाठी दिलेले धैर्य, त्यासाठी केलेला बोध हा त्रिकालाबाधित आहे. काळानुरूप त्याचे स्वरूप तेवढे बदलत गेले असेल, पण चांगल्या माणसांच्या वाट्याला येणारा अरण्यवासाचा अनुभव, त्याच्यासमोर उभी ठाकणारी संकटांची मालिका आजही तशीच कायम आहे.
 
वाईटाविरुद्ध लढा उभारण्यासाठी बळ एकवटण्याची आवश्यकता अद्याप संपलेली नाही. भविष्यातही ती गरज कधीतरी संपेल, असा कयास बांधणेही अशक्य आहे. मानवी समाजाचे अस्तित्व टिकून असेपर्यंत चांगल्या आणि वाईटातला हा संघर्ष सुरूच राहणार आहे. अधर्माशी धर्माची लढाईदेखील जगाच्या पाठीवर सर्वदूर, सर्वकालाची अपरिहार्यता ठरणार आहे. धर्माच्या बाजूने पाच अन् अधर्माच्या बाजूने शंभर लोक उभे राहिले असताना, कारणे कुठलीही असोत, पण कर्ण अन् भीष्माचार्यही अधर्माच्या बाजूने उभे असल्याचे, सत्य पुरते ठाऊक असतानाही धृतराष्ट्राने ‘आंधळ्याच्या’ भूमिकेत वागण्याचे चित्र नवखे नाहीच तसे. अशा वेळी लागणारा सृजनांच्या सर्जनशीलतेचा कस, त्यांची घेतली जाणारी सत्त्वपरीक्षा हेदेखील न टाळता येणारे सत्य आहे.
 
भगवंतांनी युद्धभूमीवर कौंतेयाला केलेला बोध, या परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्यासाठीचा आहे. तो केवळ, वेळप्रसंगी स्वकीयांविरुद्धदेखील उभे ठाकण्यासाठी बळ देणारा बोध नाही, तर सदासर्वकाळ अधर्माविरुद्ध पाय रोवून उभे राहण्यासाठीचे सूत्र त्यात दडले आहे. अंतिमत: विजय सत्याचाच होतो, तो सृष्टीचा रचिताही शेवटी धर्माच्याच बाजूने उभा राहतो, हा विश्वास त्यात दडला आहे. ‘तदात्मानं सृजाम्यहम्’ हे त्या नियंत्याचेही अंतिमत: ध्येय आहे, हा विश्वास दस्तुरखुद्द भगवंतांनी देण्यात खरंतर माणसात उमेद जागवण्याचे सामर्थ्य आहे. वस्तुत: या विश्वासाच्या बळावरच माणूस कित्येकदा विपरीत परिस्थितीतही भक्कमपणे उभे राहण्याचे कसब पणाला लावतो. प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याचे बळ बहुधा त्यातूनच त्याला प्राप्त होत असते. पाप-पुण्याच्या कल्पनेपलीकडेही, सत्याच्या असत्यावरील विजयाच्या ठाम विश्वासाचे महत्त्व दडले आहे. तो विश्वासच माणसाला जगण्याची, लढण्याची प्रेरणा देऊन जातो. केवळ कठीण प्रसंगातच नव्हे, तर चांगल्या काळातही कसोशीनं जगण्या-वागण्याची रीत स्पष्ट करून सांगण्याचे वैशिष्ट्य भगवद्गीतेत आहे. ‘‘दैवजात दु:खाने मनुजा पराधीन केले, त्या पतितांचे केवळ रडणे मला ना रुचले,’’ हे सांगताना कर्मयोगी भगवान श्रीकृष्ण सदैव परिस्थितीशी झगडण्याचा, संघर्षाचा संदेश देतात. संकटांचा बाऊ करून रडत बसणे, खुद्द परमेश्वरालाही रुचत नाही, हा संदेशही त्यातून प्रतिध्वनित होतो, तो वेगळाच! सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत जेव्हा, श्रीमद भगवद्गीता घराघरांतून वाचली जावी असा आग्रह धरतात, तेव्हा त्यांनाही कर्मयोगाची तीच परिपाठी पुढे प्रवाहित होणे अपेक्षित असते.
 
कर्तव्याप्रती जागरूक असलेला, त्यासाठी लढणारा संघर्षशील समाज त्यातून निर्माण व्हावा, ही भावना त्यामागे दडलेली असते. चांगल्या-वाईटातला भेद समजणे, सृजनात्मक कार्यासाठी मानवी समूहाने एकत्र येणे, सत्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहणे, असत्याविरुद्ध लढा देणे, तसे करताना नातीगोती कशाचाही विचार मनात येऊ न देणे, मानवी जन्माची एकूणच सार्थकता कशात दडली आहे, हे समजून घेत स्वत:च्या जीवनाची दिशा निश्चित करणे... यापलीकडे गीतेत तरी कुठे काही वेगळे सांगितले आहे? फक्त ते प्रत्यक्षात आचारणात येणे महत्त्वाचे आहे. बस्स! असे करणार्यांच्या पाठीशी सारी सृष्टीही पूर्ण ताकदीने उभी राहते. खुद्द ईश्वरीशक्तीही त्याच बाजूने कौल देते, एवढाच त्याचा अर्थ. दु:ख वाट्याला येणे ही अपरिहार्यता आहे. चांगली कामे करूनही वनवास पदरी पडणे, हा याच कालचक्राचा एक भाग आहे, एवढे समजून घेतले की, मग वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याचाही मार्ग सुकर होत जातो. यातूनच माणसं, समाज, देश आणि पर्यायाने संपूर्ण जग घडत जाणार आहे. एकेक माणूस या ताकदीचा, त्या उमेदीचा, असा विशाल दृष्टिकोन असलेला तयार झाला, तर मग एका सुदृढ समाजाची, बलवान देशाची निर्मिती अशक्य नाही. शेवटी, देव, देश अन् धर्मासाठी लढण्यातच मनुष्ययत्नांची सार्थकता असेल, तर त्यासाठी सिद्ध व्हायला तयार असलेला समाजही घडवावाच लागेल ना? असा परिपूर्ण समाज, असा बलसागर देश तयार होण्यासाठी विविध स्तरांवरून जे प्रयत्न व्हायला हवेत, श्रीमद भगवद्गीतेचा सार प्रत्येक मनुष्याने आत्मसात करणे आणि जगण्याचा एक मार्ग म्हणून तो स्वीकारणे, हादेखील त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. गीता घराघरांत पोहोचावी, या सरसंघचालकांच्या विधानाचा अन्वयार्थ त्या प्रयत्नांत दडला आहे...