सन्मान, की अपमान?

02 Dec 2018 09:24:28

 

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कॉंग्रेसनेते विलास मुत्तेमवार यांनी आपल्या पक्षाध्यक्षांना खूश करण्यासाठी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निंदा करणे स्वाभाविक आहे. अन्यथा, त्यांनी मोदी यांच्या जन्मदात्यांचा उद्धार करण्याचा आततायीपणा केला नसता. कुठल्यातरी एका सभेत त्यांनी, मोदींना पूर्वी कोण ओळखत होते? असा सवाल करून, राहुल गांधींना कसे व कोणत्या कारणासाठी जग ओळखते, त्याची जंत्रीच सादर केली. आजही मोदी पंतप्रधान झालेले असले, तरी त्यांच्या पित्याला कुणी ओळखत नाही, असा मुत्तेमवार यांचा दावा खराच आहे. फार कशाला, मोदींच्या अगदी जवळच्या नातलगांनाही कुणी फारसे ओळखत नाही. त्यांची नावे काय व मोदींशी नाते कोणते, त्याचाही खुलासा शंभर भारतीयांना करता येणार नाही. कारण, मोदींनी कधी आपल्या सार्वजनिक जीवनात कुटुंबीयांना लुडबुडू दिलेले नाही. फार दूरची गोष्ट सोडून द्या. देशात सत्तांतर घडवून मोदी भारताचे पंतप्रधान झाले, त्याचे श्रेय अवघ्या जगाने त्यांनाच दिले आहे. पण, त्यात सहभागी व्हायलाही मोदींनी घरच्यांना साधे आमंत्रण दिले नाही. त्यांचा शपथविधी त्यांच्या आप्तस्वकीयांनी जगाप्रमाणेच दूरदर्शनच्या प्रसारणातूनच बघितला होता. अशा व्यक्तीच्या पित्याला जगाने ओळखण्याचे काहीही कारण उरत नाही. तशी त्याची इच्छाही नाही. एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून मोदींनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि आपल्या कुटुंबाला त्यापासून अलिप्त ठेवलेले आहे. पण, ही गोष्ट भारतीय राजकारणात दुर्मिळ आहे. साध्या नगरसेवकापासून थेट पंतप्रधानपदापर्यंत एका व्यक्तीला सत्तापद मिळाले, की ती आयुष्यभर कुटुंबाची जागीर म्हणून जगण्याची या देशात पद्धतच आहे. पण, तो मोदींचा दोष आहे की त्रुटी आहे? दोष असला तर नेहरूंनी घालून दिलेला आदर्श मोदी पाळत नाहीत, हा म्हणावा लागेल.
 

सार्वजनिक जीवनात आल्यावर एकाने कर्तृत्व गाजवावे आणि त्याच्या कुटुंब-आप्तस्वकीयांनी समाजाची संपत्ती आपली घरगुती मालमत्ता असल्याच्या मस्तीत जगावे, हा आदर्श भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनीच घालून दिलेला नाही काय? त्या आदर्शाचे पालन नंतर त्यांच्या पक्षातल्या लहानमोठ्या नेत्यांनी व अन्य पक्षातूनही झालेले आहे. नरेंद्र मोदी त्याला अपवाद असतील, तर गोष्ट खटकणारीच आहे ना? कारण आजकाल आपला पिता, आई वा पूर्वज कोण, यानुसार राजकीय पात्रता ठरत असते आणि मोदी त्यात बसणारे नाहीत. महाभारतातला कर्ण कुणा खास पूर्वजाचा वारस नव्हता म्हणून हेटाळला जात होता. तशीच मोदींची परिस्थिती आहे. नाहीतर नेहरू-गांधी खानदानाची कहाणी बघा. केवळ त्या घराण्यातल्या म्हणून विजयालक्ष्मी पंडित राज्यपालही होऊ शकल्या आणि चार पिढ्या पक्षाचे अध्यक्षपद, जन्मसिद्ध असल्यासारखे पुढल्या वारसांना मिळत राहिलेले आहे. तसे नसते तर रॉबर्ट वढेरा हे नाव कुणाला कशाला लक्षात राहिले असते? पण, आज त्याही नावाचा बोलबाला आहे. विलास मुत्तेमवार एकवेळ आपल्या जन्मदात्याचे नाव विसरू शकतात, पण वढेरा हे कोण, त्यांना पक्के माहिती असावे लागते! नाहीतर त्यांना कॉंग्रेसमध्ये स्थान असू शकत नाही. घराण्याची ही किमया असते. मात्र, मुत्तेमवार यांना फिरोज गांधी हे नाव आठवणार नाही. त्यांनाच कशाला, सोनियांनाही ते नाव किंवा त्याच्याशी असलेले नाते आठवत नाही. मध्यंतरी नॅशनल हेराल्ड दैनिकाच्या पैसा-मालमत्तेच्या हेराफेरीचा खटला समोर आला, तेव्हा सोनियांनी चवताळून एक विधान केलेले होते- आपण कुणाला घाबरत नाही. कारण आपण इंदिराजींची सून असल्याचे अभिमानाने सोनियाच म्हणाल्या होत्या. ते सत्यही आहे. पण, सासू आठवणार्या सोनियांना सासरा मात्र आठवत नाही, की त्याचे स्मरणही करावे असे वाटत नाही.

 

फिरोज गांधी हे इंदिराजींचे पती होते आणि सोनियांच्या पतीचे पिताही होते. पण, त्यांचे नाव कॉंग्रेस पक्षात कुणी घेत नाही. मुत्तेमवारही ते नाव घेणार नाहीत. तरीही त्या खटल्याच्या वेळी ते नाव सोनियांना आठवायला हरकत नव्हती. कारण ज्या दैनिकाच्या मालमत्तेचा तो खटला आहे, त्या कंपनीचे पहिले कार्यकारी संचालक फिरोज गांधीच होते. पण, सोनियांना आपला सासरा वा त्याचे नावही आठवत नाही. कारण सासरा असला म्हणून त्याने त्याच्या सासर्यालाही सोडलेले नव्हते! कुठल्यातरी भ्रष्टाचार मामल्यात फिरोज गांधी यांनी आपले सासरे व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नाकी दम आणलेला होता. कुटुंबाची महत्ता सांगून सार्वजनिक पैशाचे अपहरण करण्याला आपल्या कुटुंबातही विरोध करणारा त्यांना कसा मानवणार ना? म्हणून सोनियांना सासरा आठवत नाही, की त्याचे नावही घ्यायची इच्छा नाही. मग मुत्तेमवारना तरी राजीव गांधींचे पिता कशाला आठवणार ना? राहुल गांधींचे पिता राजीव गांधी, अशी आठवण मुत्तेमवार ठणकावून सांगतात आणि राहुलच्या आजीचेही नाव सांगतात; पण राहुलच्या पित्याच्या पित्याचे नाव मुत्तेमवारांनाही आठवत नाही! कशी गंमत आहे ना? एखादे कुटुंब प्रसिद्ध वा ख्यातकीर्त असले म्हणून त्यातील सगळ्याच कुटुंबीयांची नावे जगाला माहिती असतात, तरी संबंधितांना सगळीच नावे आठवत नाहीत, की आठवूनही उच्चारता येत नसतात. अन्यथा, मुत्तेमवारांनी जी वंशावळ त्या भाषणात वाचून दाखवली, त्यात फिरोज गांधी या नावाचा उल्लेख टाळला नसता. न जाणो ते नाव घेतले आणि सूनबाईंचा रोष झाला, तर पडायच्या निवडणुकीचेही तिकीट नाकारले जायचे ना? त्यापेक्षा मुत्तेमवारांनी जीभ चावली आणि मनातल्या मनात फिरोज गांधी हे नाव यादीतून डीलिट करून टाकले. मात्र, असे करताना त्यांनी खरेच राहुल गांधींचा गुणगौरव केला आहे, की या पक्षाध्यक्षाची निंदानालस्ती केली आहे?

 

वरकरणी बघितले, तर मुत्तेमवार यांनी राहुलचे कौतुक करताना मोदींची टवाळी केली, असेच वाटेल. पण, बारकाईने त्यांचे विधान लक्षात घेतले, तर त्यांनी नरेंद्र मोदींच्या कौतुकासाठी राहुल गांधींची नको तितकी बदनामी करून टाकलेली आहे. राहुलची ओळख त्यांनी काय करून दिली? तर त्यांचे पिता व पूर्वज ख्यातनाम होते, म्हणूनच आज राहुल गांधींना काही किंमत आहे. लोक राहुलना ओळखतात, कारण त्यांच्यापाशी काही कर्तृत्व नसून पूर्वजांची पुण्याई, एवढेच राहुलचे भांडवल आहे. नाहीतर नरेंद्र मोदींकडे बघा, हा माणूस शून्यातून स्वकर्तृत्वाने इतक्या उच्च पदावर पोहोचला आहे. असाच मुत्तेमवार यांच्या विधानाचा खरा अर्थ नाही काय? थोडक्यात, पूर्वजांची अशी पुण्याई पाठीशी नसती वा राजीवचे पुत्र व इंदिराजींचे नातू नसते, तर राहुलना कुणी हुंगायलाही तयार नसते! असाच त्या वक्तव्याचा अर्थ होत नाही काय? मग त्याला मोदींची निंदा म्हणायचे, की राहुलचे गुणगान म्हणायचे? ज्याला हवा तसा प्रत्येकाने अर्थ काढावा. पण तटस्थपणे बघितले, तर तो मोदींचा गौरव आहे! ज्याच्या पित्याला कुणी ओळखत नाही असा सामान्य घरातला मुलगा, आपल्या मेहनत व कर्तृत्वाने पंतप्रधानपदापर्यंत पोहोचला, हा त्यातला आशय आहे. तो नक्कीच अपमानास्पद नाही. पण, राहुल गांधींचे कौतुक मात्र प्रत्यक्षात त्यांची नालायकी सांगणारे आहे. पूर्वजांच्या पुण्याईने हा पोरगा इथपर्यंत पोहोचू शकला. मात्र, वारशात मिळालेल्या मोठ्या अधिकार व पक्षाचे त्या दिवट्याने पुरते वाटोळे करून टाकले, असाच त्याचा दुसरा आशय नाही काय? नेहरूंपासून राजीवपर्यंत कर्तबगार पूर्वज नसते, तर राहुल गांधींना कुणी ओळखले नसते, इतके महत्त्व मिळाले नसते, असेच मुत्तेमवार सहजगत्या म्हणून गेलेत आणि समोर बसलेल्या कुणा कॉंग्रेसी गणंगांनी त्या शब्दांना आक्षेपही घेतलेला नाही. उलट, पक्षाध्यक्षाच्या त्या हेटाळणीला टाळ्या वाजवून दाद मात्र दिली, आता बोला!

Powered By Sangraha 9.0