वनस्पतींचा साम्राज्यवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018   
Total Views |मागच्या दोन लेखांमध्ये आपण काँग्रेस गवत’ आणि ‘जलपर्णी’ या कधीकाळी परदेशातून भारतात आलेल्या आणि इथे बेसुमार फोफावून स्थानिक परिसंस्था उद्ध्वस्त करणाऱ्या वनस्पतींची माहिती घेतली. या लेखात वनस्पतींच्या ‘साम्राज्यवादी’ (Invasive) होण्याच्या गुणधर्माबद्दल सर्वसाधारण माहिती घेऊ.


आपल्या सुजलाम् सुफलाम् सस्यश्यामल असलेल्या भारताला परकीय आक्रमणं मात्र पाचवीला पुजलेली. ही आक्रमणं फक्त राजकीयच होती असं नाही. ती धार्मिक होती, सांस्कृतिक होती, भाषिक होती, तशीच पर्यावरणीयही होती. संकरित बियाणी आणि परदेशी झाडं ही भारतावर झालेली पर्यावरणीय आक्रमणं होत. ‘परकीय वनस्पतींची आक्रमणं’ हा शब्दप्रयोग इथे केवळ भाषासौंदर्यासाठी केला आहे. त्याचा ‘राष्ट्रवादा’शी काहीही संबंध नाही. पृथ्वीच्या एखाद्या विशिष्ट भागात आढळणारी वनस्पती त्या भागापासून लांबवर किंवा दुसऱ्या खंडात नेऊन लावली (उदा. अमेरिकेतील एखादं झाड आफ्रिका खंडात आणून लावलं किंवा श्रीलंकेतील एखादं झाड युरोपात नेऊन लावलं...) तर त्याचे तीन परिणाम होऊ शकतात. पहिली शक्यता म्हणजे वातावरण प्रतिकूल असेल, तर ती तिथे जगणारच नाही. दुसरी शक्यता म्हणजे, ती तिथे जगेल आणि त्या परिसराचा एक भाग होऊन राहील. तिसरी शक्यता म्हणजे, ती अतिप्रमाणात वाढेल आणि तिथल्या स्थानिक वनस्पतींना मारून टाकेल. ही तिसरी शक्यता बऱ्याच वनस्पतींच्या बाबतीत खरी ठरलेली आहे. याला लौकिकार्थाने वनस्पतींचा ‘साम्राज्यवाद’ (Invasive) म्हणता येईल. एखाद्या प्रदेशातल्या स्थानिक वनस्पती प्रजातींना ‘Indegeneous Species’ किंवा ‘Native Species’ म्हणतात, तर परदेशातून नकळत आलेल्या किंवा आणलेल्या वनस्पती प्रजातींना ‘Allien Species’ किंवा ‘Exotic Species’ म्हणतात. स्थानिक आणि अस्थानिक वनस्पतींमधील सीमारेषा निसर्गाने ठरवलेली आहे. भारतात ११ जैवभौगोलिक प्रदेश आहेत, ज्यांचं स्वतःचं असं जैववैविध्य आहे. म्हणजे ‘फणस’ हे झाड कोकणात ‘स्थानिक’ (Native) असेल आणि विदर्भात ‘अस्थानिक’(Exotic) असेल. देवदाराचं झाड हिमालयात ‘स्थानिक’ असेल, तर मध्य आणि दक्षिण भारताच्या कोणत्याही भागात ते ‘अस्थानिक’ असेल. चार्ल्स डार्विनच्या ‘नैसर्गिक निवड सिद्धांता’नुसार (Theory of Natural Selection) त्या त्या वनस्पतींचे ते ते प्रदेश ठरलेले आहेत.

 

परप्रांतीय वनस्पती साम्राज्यवादी का होतात, त्याची अनेक कारणं आहेत. काही वनस्पतींची प्रजननक्षमताच अतिप्रचंड असते. अत्यंत कमी कालावधीत लाखो बिया निसर्गात सोडून ती आपली प्रजा वाढवते.(उदा. काँग्रेस गवत, जलपर्णी, इ.) एखाद्या प्रदेशातील जमीन आणि तिथलं हवामान एखाद्या वनस्पतीला अनुकूल ठरतं आणि ती तिथे जोमाने वाढते. उदा. ‘गोटग्रास’ (Aegilops Triuncialis) नामक एक गवत विसाव्या शतकात युरोपातून कॅलिफोर्नियात आणलं गेलं. तिथली वैराण जमीन तिला अनुकूल झाल्याने ते तिथे बेसुमार फोफावलं. परिसरातल्या प्रत्येक सजीवाचा जगण्यासाठी संघर्ष चालू असतो. डार्विनच्या ‘Survival of the Fittest’ या तत्त्वाप्रमाणे एखाद्या परिसरात आलेली परकीय वनस्पती तिच्या अंगभूत गुणधर्मामुळे जमिनीतील वा पाण्यातील सगळी पोषणमूल्य शोषून घेते आणि इतर स्थानिक वनस्पती भुकेल्या राहून मरतात. (म्हणजे रिलायन्स जिओसारखी एखादी कंपनी अत्यंत स्वस्त किंमतीत आपलं उत्पादन आणून अख्खी बाजारपेठ काबीज करून टाकते आणि स्पर्धकांना झोपवून टाकते, तसंच!). दुसऱ्या भागातून आलेल्या काही वनस्पतींमध्ये असलेली रसायनं इतर वनस्पतींना हानिकारक ठरू शकतात, ज्यामुळे ती एकच वनस्पती त्या परिसरात बलाढ्य ठरते. उदा. काँग्रेस गवतात असलेली पार्थेनिन, अँब्रोसिन अशी रसायनं परिसंस्थेतल्या इतर वनस्पतींच्या वाढीवर विपरीत परिणाम करतात, ज्यामुळे काँग्रेस गवत एकटंच फोफावतं. वनस्पती साम्राज्यवादी होण्याची ही काही कारणं असली तरी, सर्वांत मुख्य कारण म्हणजे त्या वनस्पतीच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर तिला कोणी नैसर्गिक भक्षक नसतो. भक्ष्य-भक्षक संबंध हा निसर्गाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्या त्या परिसरात त्या त्या वनस्पती-कीटक-प्राणी-सूक्ष्मजीवांची अन्नसाखळी तयार झालेली असते, जी कुठल्याही एकाच प्रजातीच्या सजीवाची अमर्याद वाढ होण्यापासून रोखते. परकीय अधिवासात जेव्हा एखादी वनस्पती प्रवेश करते तेव्हा त्यांना नियंत्रणात ठेवणारा कोणी नैसर्गिक भक्षक तिथे नसतो. त्यामुळेच ती वाट्टेल तशी वाढते.

 

परकीय वनस्पतींचं आक्रमण हे भारताच्या अनेक पर्यावरणीय समस्यांपैकी एक आहे. ब्रिटिशांच्या काळात किंवा त्यानंतर वाढलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापारातून अनेक परदेशी वनस्पतींची बीजं अपघाताने वा जाणूनबुजून भारतात आली, इथे रुजली आणि फोफावली. या वनस्पतींचं नियंत्रण करणं मोठी डोकेदुखी होऊन बसलं. काँग्रेस गवत आणि जलपर्णी ही त्याची ठळक उदाहरणं. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (IUCN) या आंतरराष्ट्रीय संस्थेने तयार केलेल्या ‘Global Invasive Species Database’ मध्ये भारतात साम्राज्यवादी ठरलेल्या वनस्पती प्रजातींची प्रजातींची नोंद केली गेली आहे. ‘घाणेरी’ (lantana camara) ही अशीच एक भारतात उपद्रवी ठरलेली वनस्पती. ‘Verbenaceae’ कुळातली ही वनस्पती मूळची अमेरिका खंडातील. लाल-पिवळ्या सुंदर फुलांमुळे ही वनस्पती शोभेसाठी भारतासह विविध देशांमध्ये लावली गेली. आज जिथे जिथे ती पसरली आहे तिथे तिथे तिने स्थानिक परिसंस्थेला हानी पोहोचवली आहे. पश्चिम घाटासारख्या जैवविविधतेने संपन्न प्रदेशातही तिचा उपद्रव झाला आहे. पानांमध्ये विषारी द्रव्य असल्याने या वनस्पतीला गुरांसारखे कोणी भक्षक नाहीत. त्यामुळे ती भराभर वाढत जाते. कुठल्याही वातावरणात तग धरण्याची तिची क्षमता आहे. हिच्या पानांमध्ये असलेल्या विषारी द्रव्यांमुळे इतर वनस्पती वाढत नाहीत. हिची प्रजननक्षमताही अफाट आहे. एक झाड वर्षाला सुमारे १२ हजार बिया निसर्गात सोडतं. ‘पेन्टासिलिक ट्रायटरपेनॉइड्स’ नावाचं विषारी रसायन घाणेरीत असतं जे प्राण्यांच्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम करतं.

 

पिवळा धोत्रा (Argemone mexicana) हीसुद्धा अमेरिका खंडातील स्थानिक असलेली वनस्पती कधीकाळी भारतात आली आणि आज शेतांमध्ये ती वाढलेली दिसते. हिच्या बिया अत्यंत विषारी असतात आणि त्या मोहोरीसारख्याच काळ्या असल्याने मोहोरीमध्ये पिवळ्या धोत्र्याच्या बियांची भेसळ होते. वनस्पतींसारख्याच काही प्राण्यांच्या प्रजातीही त्यांचा मूळ अधिवास सोडून दुसरीकडे गेल्याने तिथे invasive ठरू शकतात. साम्राज्यवादी परकीय वनस्पतींना नियंत्रणात ठेवण्याचे वा त्यांचा नायनाट करण्याचे अनेकविध उपाय शोधले जात आहेत. पण ते अपुरे पडत आहेत. आता, आपण यातून नक्की काय बोध घ्यायचा? आज पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली जी काही मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड चालली आहे. त्यात निलगिरी, सुबाभूळ, गिरीपुष्प, सुरू, गुलमोहोर अशी पटापट वाढणारी परदेशी झाडं सर्रास लावली जातात. अनेक श्रीमंत लोक केवळ खिशाला परवडतं म्हणून महागड्या किंमतीची, शोभेची फुलं असणारी परदेशी फुलझाडं वा लॉन आपल्या बागेत व गच्चीत आणून लावतात. या वनस्पती देशी नसल्याने भविष्यात त्या साम्राज्यावादी होण्याचा धोका नाकारता येत नाही. पण मुळात आपण हा धोका पत्करायचाच कशाला? भारतात साडे सतरा हजार इतक्या फुलणाऱ्या देशी वनस्पती आहेत. गुलमोहोर आणि पळस दोघांचीही फुलं सारखीच लालेलाल, सुंदर दिसतात. मग गुलमोहोर न लावता पळस लावावा. कारण, तो देशी आहे. एकसुरी वृक्षलागवड उलट पर्यावरणाची हानी करणारी ठरेल. त्या त्या भागातल्या परिसंस्थेचा अभ्यास करून त्या त्या वनस्पती तिथे वाढवल्या जायला हव्यात. नाहीतर हा ‘वनस्पतींचा साम्राज्यावाद’ भारतीय पर्यावरणाचा बळी घेऊ शकतो!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@