जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर...

    दिनांक  18-Dec-2018    
 
 
मनात जिद्द असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अशीच एक छोट्याशा गावातून येऊन राष्ट्रीय विक्रम करण्याची किमया साधणारी जिद्दी धावपटू म्हणजे साक्षी चव्हाण.
 

मनात जिद्द असेल, तर जगात कोणतीही गोष्ट मिळवणं अशक्य नाही. आपल्यातल्या कलागुणांना ओळखून त्यांना आकार देण्याचे, प्रत्यक्षात उतरवण्याचे काम काही मोजकीच मंडळी करत असतात. अशाच एका छोट्याशा गावापासून सुरू झालेल्या तिच्या प्रवासाला, तिच्या नावाला एक ओळख मिळाली आहे. केवळ आणि केवळ आपल्या गुणवत्तेच्या, मेहनतीच्या जोरावर नाव कमावलेल्या या खेळाडूचे नाव म्हणजे साक्षी चव्हाण. औरंगाबाद जिल्ह्यातील शेवगा या गावी साक्षीचा जन्म झाला. शेवगा हे गाव तसं माहीत असणारी लोकही फार कमी असतील. अवघ्या दोन हजार लोकवस्तीच्या गावातून आलेल्या साक्षीच्या डोळ्यात स्वप्न होतं ते मात्र एक मोठं धावपटू बनण्याचं. फक्त साक्षीला साथ हवी होती, ती उत्तम प्रशिक्षकांची. आपल्या मुलीची कारकीर्द उत्तमरीत्या घडवण्याचा विडा उचललेल्या चंपालाल चव्हाण यांनी शेवगा हे गाव सोडून मग औरंगाबादमधील सातारा या गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर साक्षीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. साक्षीने राष्ट्रीय आंतरजिल्हा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात तिने सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला. इतकंच काय, तर तिने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमही स्वत:च्या नावावर नोंदवला.

 

आपल्या मुलीच्या कारकीर्दीसाठी आपलं गाव सोडलेल्या चंपालाल चव्हाण यांना साथ लाभली ती, क्रिकेट प्रशिक्षक संजीव बालय्या यांची. संजीव बालय्या यांनी साक्षीतील गुण हेरले आणि प्रशिक्षणासाठी अॅथलेटिक प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांच्याकडे तिला पाठवण्याचा निर्णय घेतला. साक्षीने अ‍ॅथलेटिक्सचे प्राथमिक धडे मोदी यांच्याकडूनच घेतले. त्यानंतर तिच्या कारकीर्दीचा आलेख वाढतच गेला. साक्षीने राष्ट्रीय आंतरजिल्हा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली. तिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक पटाकावताना राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला. १०० मीटरचे अंतर तिने १२.३८ सेकंदात पार केले. यापूर्वी हा विक्रम केरळच्या मंजिदा नोव्हरीनच्या नावावर होता. हा विक्रम मोडण्यासाठी तब्बल आठ वर्षांचा कालावधी गेला. २ डिसेंबर, २०१० साली मंजिदाने १२.७३ सेकंदांमध्ये हे अंतर गाठून आपल्या नावावार विक्रमाची नोंद केली होती. साक्षी ही सातारा परिसरातील न्यू इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी असून, ती क्रीडा प्रबोधिनी येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी व पूनम नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांपासून सराव करीत आहे. तिने याच वर्षी १२ जानेवारी रोजी रत्नागिरी येथील राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात २०० मीटर धावण्याची स्पर्धा २५.८ सेकंदात पूर्ण करत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच याच स्पर्धेततिने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकदेखील पटकावण्याचा मान मिळवला होता. याच वर्षी तिने ४ बाय १०० मीटर रिलेत ४६.८ सेकंदाची वेळ नोंदवत महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिले होते. तसेच नागपूर येथील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटरमध्ये सुवर्ण व १०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले होते. तिने पुणे येथील सबज्युनिअर स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात साक्षीने दिल्ली येथे गेल इंडियातर्फेइंडियन स्पीड स्टार’अंतर्गत अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटर धावण्याची शर्यत केवळ २६ सेकंदांत पूर्ण करत सुवर्णपदक आणि १०० मीटरमध्ये रौप्यपदक पटकावले होते.

 

नुकताच साक्षीने राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला असून, पहिल्याच वर्षी उत्तम कामगिरी करत तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर तिने आज अनेक स्पर्धांमध्ये राज्याचे नाव मोठे केले आहे. केवळ राज्य स्पर्धेतच नाही, तर तिने राष्ट्रीय स्पर्धेतही आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ठसा उमटवला. साक्षीला केवळ अ‍ॅथलेटिक्समध्येच नाही, तर कबड्डी, खो-खोसारख्या खेळांमध्येही विशेष रूची आहे. आपल्या कारकीर्दीत तिने राज्य व राष्ट्रीय पातळीवर अकरा सुवर्णपदके जिंकली आहेत. शहरी भागांमध्ये अनेक सोयी सुविधा असतानाही अशा धावपटूंची संख्या ग्रामीण भागांच्या तुलनेने कमी असल्याचेच दिसून येते. या खेळाडूंमधील जिद्द आणि त्यांच्यातील गुणांना ओळखण्याची आज खरी गरज आहे. तसेच त्यांच्यातील कौशल्य गुणांना पैलू पाडण्यासाठी, करिअरला योग्य दिशा देण्यासाठी मोदींसारख्या प्रशिक्षकांचीही आज नितांत गरज आहे. त्यामुळे साक्षीच्या कारकीर्दीला आताच नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तिला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवणाऱ्या साक्षीने ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेतही आपला ठसा उमटवावा, अशी इच्छा तिचे आप्तस्वकीय व्यक्त करतात. साक्षी आजही औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलात जेमाने सराव करते. ती ज्या प्रकारे मेहनत करते, अशीच मेहनत ती पुढेही सुरू ठेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताला नावलौकिक मिळवून देईल यात काही शंका नाही.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/