माणूस म्हणून जगताना...

    दिनांक  17-Dec-2018   


 
 
 
अमाला यांनी आपले प्राणिप्रेम हे केवळ आपल्या घरापुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांनी ‘ब्लू क्रॉस’ची स्थापना करून हे प्रेम जगजाहीर केले. आपले प्राणिप्रेम जपता यावे, त्यासाठी वेळ देता यावा, यासाठीच त्यांनी अभिनय क्षेत्रातून रजा घेतली.
 

आपल्या हक्कांसाठी लढणे, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे, चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणे. अशा विविध गोष्टी अनेकजण करत असतात. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला आणि त्या अन्यायाचा प्रतिकार करताना ती व्यक्ती मरण पावली. तरी त्या व्यक्तीशी संबंधित इतर लोक तिच्यासाठी न्यायाची दाद मागतात. परंतु, प्राण्यांच्या बाबतीत असे घडते का? क्वचितच असे घडत असेल. माणसाला जन्मजात काही मूलभूत हक्क असतात. त्या हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी काही माणसे आयुष्यभर झटतात. परंतु, मुक्या प्राण्यांना त्यांना होणाऱ्या वेदना बोलून व्यक्तही करता येत नाही. तिथे प्राणी आपल्या हक्कांसाठी काय भांडणार? मुळात प्राण्यांना हक्क असतात का? असा प्रश्न विचारून काहीजण युक्तीवाद करू पाहतात. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे असे आपण म्हणतो. मग प्राण्यांशी वागताना माणसाने भूतदया का दाखवू नये? मुळात इथे एक माणूस दुसऱ्या माणसावर दया दाखवत नाही, तर प्राण्यांविषयी माणूस भूतदया कुठून दाखवणार? या गोष्टी अमाला अक्किनेनी यांनी वेळीच हेरल्या. हैदराबादमध्ये ‘ब्लू क्रॉस’ या प्राणिप्रेमी स्वयंसेवी संस्थेची अमाला यांनी स्थापना केली. प्राण्यांचे अधिकार अबाधित राहावेत यासाठी ही संस्था कार्य करते.

 
१२ सप्टेंबर, १९68 रोजी कोलकात्यामध्ये अमाला यांचा जन्म झाला. अमाला यांची आई आयरिश वंशाची असून त्यांचे वडील बंगाली आहेत. अशा या अनोख्या दाम्पत्याच्या घरी हे कन्यारत्न जन्मले. अमाला अक्किनेनी यांना बालपणापासून प्राण्यांची आवड होती. परंतु, अमाला यांनी आपले प्राणिप्रेम हे केवळ आपल्या घरापुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांनी ‘ब्लू क्रॉस’ची स्थापना करून हे प्रेम जगजाहीर केले. आपले प्राणिप्रेम जपता यावे, त्यासाठी वेळ देता यावा, यासाठीच त्यांनी अभिनय क्षेत्रातून रजा घेतली. अमाला अक्किनेनी या खरेतर पेशाने एक अभिनेत्री आहेत. आपल्या उत्तम अभिनयाने त्यांनी तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत नाव कमावले. आपल्या अभिनय कारकिर्दीच्या काळात त्यांनी आपल्या मनमोहक सौंदर्याने रसिक प्रेक्षकांवर तर जादू केलीच पण, दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांच्यावर अमाला यांची अशी काही भुरळ पडली की, १९९२ मध्ये ते दोघे विवाहबंधनात अडकले. अमाला या अभिनेता नागार्जुन यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. नागार्जुन आणि अमाला यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव अखिल आहे. अमाला यांचे व्यक्तिमत्त्वच निराळे आहे. त्यांनी आजवर आपला मुलगा अखिलप्रमाणेच सावत्र मुलगा नागा चैतन्यवरही तितकेच प्रेम केले. आता घरात दोन सुना आल्या असल्याने अमाला यांना आपल्या प्राणिप्रेमासाठी मोकळा वेळ मिळाला आहे. प्राण्यांसाठी करत असलेल्या त्यांच्या या कार्यात पती नागार्जुन यांची त्यांना साथ लाभली आहे. नागार्जुन हे ‘ब्लू क्रॉस’ या संस्थेचे सहसंस्थापक आहेत. विशेष म्हणजे नागार्जुन आणि अमाला या अक्किनेनी दाम्पत्याच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली. तसेच त्यांचे ‘ब्लू क्रॉस’ हे अपत्यदेखील २५ वर्षांचे झाले आहे. अमाला यांनी वयाची पन्नाशी गाठली तरीही त्यांचे चिरतारुण्य अजून कायम आहे.
 

प्राण्यांची देखभाल कशी करावी? याबाबत ‘ब्लू क्रॉस’ या संस्थेमार्फत अनेक शिबिरांचे आयोजन केले जाते. पाळीव प्राणी पाळायचे म्हणजे जबाबदारी आलीच. साधे कुत्र्याचे एखादे पिल्लूदेखील घरात पाळायचे झाले तरी, त्याला रोज स्वच्छ आंघोळ घालण्यापासून त्याची नखे कापण्यापर्यंत अनेक गोष्टी अनेकांना जबाबदारीची कामे वाटतात. अशाच कामांची जबाबदारी वाटू नये म्हणून ‘ब्लू क्रॉस’ ही संस्था प्राणिप्रेमींना प्राण्याची देखभाल कशी करायची ते शिकवते. थोडक्यात, माणसाने प्राण्यांशी कसे वागावे, याचे शास्त्रशुद्ध शिक्षण या संस्थेत दिले जाते. अनेक पशुवैद्य या संस्थेशी जोडले गेले आहेत. आजपर्यंत चार लाख, १७ हजार प्राण्यांची मदत या संस्थेने केली आहे. रस्त्यावरील भटक्या प्राण्यांनादेखील ही संस्था मदत करत आहे. लोकांनी भूतदया शिकावी हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. प्राण्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल लोकांमध्ये ही संस्था जनजागृती निर्माण करत आहे. प्राण्यांना झालेली दुखापत ते बोलून दाखवू शकत नाहीत. माणसाने आजवर निसर्गाला, पर्यावरणाला आणि स्वत:च्याच माणूस या प्रजातीलाही अनेक प्रकारे त्रास दिला आहे. निदान प्राण्यांची तरी या दुष्टचक्रातून सुटका व्हावी, त्यांना माणसांमुळे विनाकारण दु:ख भोगावे लागू नये. हा हेतू ‘ब्लू क्रॉस’ आणि अमाला यांच्या डोळ्यांसमोर आहे. भूतदया जपणाऱ्या अमाला अक्किनेनी यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून सलाम!

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/