बरं झालं ‘दादा’ तुम्हीच बोललात!

    दिनांक  17-Dec-2018   विलासराव देशमुख, अशोक चव्हाणांपासून ते पृथ्वीराजबाबांपर्यंत काँग्रेसचे मुख्यमंत्री आले अन् गेले, पण राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे काही ‘हाता’ने फिरवता आले नाहीत.


महाराष्ट्राचे ‘दादा’ अर्थात बारामतीकर अजितदादा पवार. आपल्या खास बारामतीच्या गावरान दादाशैलीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना दादांनी एक महत्त्वाची सूचना केली. दादा कार्यकर्त्यांना म्हणाले, “माझा भावी मुख्यमंत्री, शरद पवारांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करू नका. तुमचं विचारणं काहींच्या डोळ्यात खुपतं. कोणाच्या भावना दुखावल्या जातात.” बारामतीच्या एका कार्यक्रमात बोलताना एका स्थानिक नेत्याने दादांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा केला आणि त्यानंतर मंचावर आलेल्या दादांनी असा उल्लेख टाळण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. एकाअर्थी बरचं झालं की, दादा तुम्हीच हे सांगून मोकळे झालात. म्हणजे, उगाच कार्यकर्त्यांना तरी कशासाठी आणि किती दिवस खोट्या आशेवर झुलवतं ठेवायचं म्हणा. आता दादांना काही कोणी पहिल्यांदाच असं ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून संबोधलं नसावंच. कार्यकर्त्यांचं त्यांच्या दादांवरील जिवापाड प्रेम ते. आपला नेता या राज्याचा मुख्यमंत्री व्हावा आणि पक्षाचा सर्वोच्च नेता पंतप्रधानपदी विराजमान व्हावा, अशी त्या बिचाऱ्या घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या कार्यकर्त्यांची भाबडी आशा. पण, दादांनी मात्र आताच “असे बोलू नका, इतरांच्या पोटात दुखेल,” म्हणून सूचक इशारा दिला. तो इशारा साहजिकच सध्या विजयाच्या नशेत असलेल्या काँग्रेस पक्षाला. काँग्रेस... राष्ट्रवादीचा स्वाभाविक मित्रपक्ष. पण, आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीचे संबंध विळ्या-भोपळ्यासारखे असल्याचे सगळ्यांनीच पाहिले. विलासराव देशमुख, अशोक चव्हाणांपासून ते पृथ्वीराजबाबांपर्यंत काँग्रेसचे मुख्यमंत्री आले अन् गेले, पण राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे काही ‘हाता’ने फिरवता आले नाहीत. मुख्यमंत्रिपदानंतरच्या उपमुख्यमंत्रिपदावरच कायम राष्ट्रवादीची बोळवण झाली. त्यात दादांनी दुष्काळप्रसंगी धरणात जलधारा प्रवाहित करण्याच्या सांगितलेल्या उपायात त्यांचे उपमुख्यमंत्रिपदही पश्चात्तापाच्या प्रवाहात कुठच्या कुठे वाहून गेले. होती नव्हती सगळी अब्रू धुळीत मिळाली. सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार तर आहेच. पण, दादांचा आत्मविश्वास बघा किती दांडगा. “भावी मुख्यमंत्री म्हणू नका, पण बहुमताच्या मागे लागा,” असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. असं म्हणतात की, मनात जे असतं ते ओठावर येतं. पण, बिनधास्त बोलणाऱ्या दादांनी यंदा मात्र सावध पवित्रा घेत, मनातलं ओठावर न आणताच ‘वेट अॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतलेली दिसते.

 

बिहारचा तेजहीन प्रताप

 

काँग्रेसच्या तीन राज्यांतील विजयी उन्मादाची नशा फक्त त्यांच्या नेत्या-कार्यकर्त्यांपुरतीच मर्यादित नाही, तर आपली कातडी काँग्रेसच्या पंखाखाली वाचवणाऱ्या पक्षांचेही मोदीविरोधी स्वर या नेत्यांच्या २०१९ च्या विजयाची भाबडी आशा दर्शविणारे आहेत. चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणारे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव. अधूनमधून आपले बडे भैय्या तेजस्वीप्रमाणे तोही कधी कधी आपली कुवत, आपले स्थान सोडून बरळतच असतो. सतत हांजी हांजी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरणारा तेजप्रताप कधी गाईच्या गोठ्यात दूध काढताना दिसतो, तर कधी भर गावात थंड पाण्याने स्नान करतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. म्हणजे, अगदी बिहारी जनतेला आपलासा वाटेल, असा हा लालूपुत्र. त्यामुळे या तेजप्रतापला आपण जणू दैवी अवतारच असल्याचा साक्षात्कार झाला असावा आणि भाजपवर सुदर्शनचक्राने प्रहार करून विरोधकांचा वध करण्याची त्याने भाषा केली. तेजप्रताप म्हणतो, “मी भगवान कृष्णाचे आशीर्वाद घेऊनच बिहारमध्ये परतलो आहे. २०१९ च्या निवडणुकीत बिहार कुरुक्षेत्र बनेल. मतांचे सुदर्शनचक्र चालवून आम्ही विरोधकांचा वध करू.” वाह रे तेजप्रताप! गेले दोन-तीन महिने स्वत:च्या वैवाहिक आयुष्यातील पेच मिटवण्यासाठी, पत्नी ऐश्वर्या राय हिच्यासोबत रीतसर काडीमोड घेण्यासाठी धावाधाव करताना बिहारची जनता, त्यांचे प्रश्न, त्यांचे दु:ख दिसले नाही का? त्यामुळे केवळ आपण यादवकुळात जन्मल्यामुळे भगवान श्रीकृष्णाचे सगळे गुण, कर्तृत्व आपल्या अंगी आपसूक संचारत नसते, हे या तेजप्रतापने नीट समजून घ्यावे. मतांचे सुदर्शनचक्र बिहारमध्येही चालेल, पण ते चक्र राजदचे नव्हे तर मोदी सरकारच्या नेतृत्वातील राओलाचे असेल, हे निश्चित. कारण, लालूपुत्रांना केवळ सहानुभूतीच्या आधारे बिहारची जनता कितपत मतदान करेल, याची आजघडीला शाश्वती नाही. त्यात नितीशकुमार बिहारमध्ये आपले पाय आजही घट्ट रोवून आहेत. भाजपमुळे हातची सत्ता निसटलेल्या लालूपुत्रांचे असे चवताळून भाजपच्या विनाशाचे स्वप्नरंजन करणे, म्हणा अगदी साहजिकच. लालूंची ही पुढची पिढी बिहारमध्ये लोकप्रिय असली तरी ती नेतृत्वकुशल नाही. त्याउलट नितीशकुमारांची एक अनुभवी, मुरब्बी, विकासोन्मुख राजकारणी ही उज्ज्वल प्रतिमा राजदचा हिरवा कंदील विझवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा प्रत्यय २०१९ च्या निवडणुकीत येईलच.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/