सांताक्लॉजमागचे मिथक

    दिनांक  17-Dec-2018   क्रिस बॉयल यांनी जवळपास दोन वर्षे यासंदर्भातील सर्वेक्षण व संशोधन केले आणि नंतर आपले अनुमान जगासमोर मांडले.


डिसेंबर महिना म्हटला की, ख्रिश्चन धर्मीयांच्या सर्वात मोठ्या सणाची-ख्रिसमसची आठवण येते. ख्रिसमस वा नाताळ आला की, त्यासोबतच सांताक्लॉजही येतोच येतो. सांताक्लॉजच्या पोतडीत काय काय भेटवस्तू आहेत, हे पाहण्याची आतुरता बच्चेकंपनीला लागलेली असते. या भेटवस्तूंपैकी आपल्याला काय मिळेल, याचीही आशा त्यांच्या मनात असते. जगभरात सांताक्लॉजच्या नावाखाली अनेकानेक प्रकार केले जातात, मुलांना-मोठ्या माणसांना आकर्षित करून घेतले जाते. पण, सांताक्लॉज नावाची व्यक्ती खरेच अस्तित्वात आहे का, किती लोक सांताक्लॉजवर विश्वास ठेवतात, याची माहिती घेणेही गरजेचे ठरते. याचसंदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. ज्यात एक वास्तवदर्शी माहिती समोर आली आणि सांताक्लॉजच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत बालकांचा सांताक्लॉजवरील विश्वास उडून जातो, असे या सर्वेक्षणातून उघड झाले. तथापि, ३४ टक्के प्रौढांचा आजही सांताक्लॉजच्या अस्तित्वावर विश्वास असल्याचेही या सर्वेक्षणातून पुढे आले. कित्येक युवकांच्या-तरुणांच्या मते, सांताक्लॉजचे कोणतेही अस्तित्व नाही, तरीही ते ख्रिसमसवर मात्र विश्वास ठेवताना आढळले.

 

युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटनच्या एक्सटर विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक क्रिस बॉयल यांनी सांताक्लॉजशी संबंधित काही प्रश्न विचारले. सांताक्लॉजबद्दल आपण काय विचार करता? असा सवाल त्यांनी केला. बायल यांच्या या प्रश्नावर जगातील १२०० लोकांनी उत्तरे पाठवली. ज्यात कितीतरी प्रौढांनी आपल्या बालपणातील विचारांना सामायिक केले. सर्वेक्षणातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली की, ३४ टक्के लोक अजूनही सांताक्लॉजवर विश्वास ठेवतात. या लोकांनी सांगितले की, ख्रिसमस म्हणजेच सांताक्लॉजवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांच्या बालपणाच्या वर्तणुकीत सुधारणा झाली, तर ४७ टक्के लोकांच्या मते, सांताक्लॉजमुळे त्यांच्या आयुष्यात कसलाही फरक पडला नाही. वरील संशोधनानुसार ८ वर्षांचा मुलगा सांताक्लॉजवर विश्वास ठेवणे बंद करतो. ६५ टक्के लोकांनी ही गोष्ट मान्य केली की, जरी सांताक्लॉजचे अस्तित्व नसले तरी आपण बालपणी सांताक्लॉजच्या मिथकाला सत्य समजत होतो.

 

दुसरीकडे या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एक तृतीयांश लोकांनी आपल्याला झालेले दुःखही व्यक्त केले. ‘फादर ख्रिसमसम्हणजेच सांताक्लॉजचे अस्तित्व नसल्याचे समजल्यावर आपल्याला धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. १५ टक्के लोकांनी तर याबद्दल आपल्या माता-पित्यांनाच दोषी ठरवले आणि त्यांनीच आपल्याला धोका दिल्याचे म्हटले. १० टक्के लोक मात्र सांताक्लॉज अस्तित्वात नसल्याचे ऐकून, वाचून नाराजदेखील झाले. ३१ टक्के माता-पित्यांनी असेही कबूल केले की, जेव्हा आमच्या मुलांनी सांताक्लॉजच्या सत्यतेबद्दल प्रश्न विचारले, तेव्हा आम्ही त्यावर उत्तर देण्याचे टाळले. ४० टक्के पालकांनी मात्र आपल्या मुलांना सांताक्लॉज अस्तित्वात असल्याचे सांगितले तर ७२ टक्के पालकांनी सांताक्लॉजबद्दल माहिती देताना आनंद झाल्याचे म्हटले.

 

क्रिस बॉयल यांनी जवळपास दोन वर्षे यासंदर्भातील सर्वेक्षण व संशोधन केले आणि नंतर आपले अनुमान जगासमोर मांडले. बॉयल म्हणाले की, “गेली दोन वर्ष मजेशीर होते, कारण जगभरातील लोकांनी सांताक्लॉजच्या मिथकाबाबत आपापल्या कथा-कहाण्या-गोष्टी सांगितल्या. काही लोकांना सांताक्लॉज अस्तित्वात नसल्याचे समजल्याने धक्का बसला. शिवाय काल्पनिक असूनही लोकांनी सांताक्लॉजवर विश्वास ठेवायला सुरुवात केल्याचे ऐकून चांगले वाटले.” बायल यांच्या मते मुले सांताक्लॉजवर विश्वास ठेवतात. कारण, त्यांच्या माता-पित्यांची तशी वागणूक असते. पण, काही मुले स्वतःला सत्याशी-वास्तवाशी जुळवून घेण्यालाही प्राधान्य देतात, कारण ते आता बाल्यावस्थेतून अधिक जिज्ञासू व विचार करणाऱ्या तारुण्याकडे-मोठेपणाकडे वाटचाल करत असतात.” बॉयल यांचे हे संशोधन केवळ सांताक्लॉजच्या अस्तित्वाशी संबंधित आहे आणि त्यातून त्यांनी निरनिराळी आकडेवारीही सादर केली. तरीही जगातील बहुसंख्य ख्रिश्चनधर्मीय नाताळच्या दिवसांत सांताक्लॉजच्या गोष्टी सांगून मुलांसोबत-कुटुंबीयांसोबत सण साजरा करतातच.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/