अवा चालली पंढरपुरा...

    दिनांक  16-Dec-2018   

  
 
 
अयोध्येला महाआरती केल्यानंतर आता ते आणि त्यांचे अंमलदार वगैरे पंढरपुरामध्ये चंद्रभागेतिरी विठूरायासमोर महाआरती करणार आहेत. यात काही वावगं नाही. ज्याच्या त्याच्या भक्ती-श्रद्धेचा प्रश्न हो. पण तरीही तुमच्या-माझ्यासारख्या काही नतद्रष्ट लोकांना प्रश्न पडलाच की, आताच तर साहेब (इथे महाराष्ट्रात बरेच साहेब आहेत, प्रत्येक पक्षाचे आपापले साहेब. तसेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे साहेब) तर आपले उद्धवसाहेब अयोध्येला करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या रामलल्लांना भेटून आले. त्यांनी महाआरती करून मग तिथे मागितलं तरी काय? काहींनी देवाला प्रांतवादात ओढत म्हटलं, “अरे, तिथे उत्तरेत रामलल्लाला आरती केली तर मग आपल्या महाराष्ट्राच्या कुलदैवताला विठोबाला नको का साकडं घालायला?” बरं मग, विठोबाराया साहेब काय साकडं घालणार? काय म्हणता, नैसर्गिक कोपामुळे दुष्काळ पडलेल्या महाराष्ट्रात सुखसमृद्धी यावी यासाठी की आरक्षणासाठी धरणे, आंदोलनं यात भरडून जाणाऱ्या समाजाला सुबुद्धी यावी यासाठी की, २०१४ च्या सत्तांतरानंतरविघातक शक्तींनी माजवलेल्या समाजफुटीला आळा बसावा यासाठी उद्धव ठाकरे महाआरती करणार आहेत? नाही हो, यासाठी चंद्रभागेतिरी उद्धव ठाकरे आणि सहकारी महाआरती करणार नाहीत. किंबहुना हे असे काही प्रश्नबिश्न विचारून साहेबांच्या महाआरतीला खोडा घालू नका बरं. हे असले लोकजीवनाचे, समाज आणि देशहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप आहे ना? त्या वेड्या पक्षाला आदर्शवाद बाळगून घेऊ देत समाजहिताचे निर्णय. होऊ देत काही स्वार्थी लबाड लोकांचे नुकसान आणि नुकसान झालेल्या त्या स्वार्थी लोकांनी या भाजपविरोधात मारूदेत ठणाणा बोंबा. कशाला त्या समाजसुधारणेत आणि देशकल्याणात पडायचे? त्यामुळे पंढरपुरात विठूमाऊलीला साहेब वेगळ्या कारणासाठी साकडे घालणार आहेत. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी पंढरपूरच्या विठोबाने सरकारला म्हणजे केंद्र सरकारला सुबुद्धी द्यावी, यासाठी ते चंद्रभागेतिरी महाआरती करणार आहेत म्हणे. आता ही सुबुद्धी फक्त भाजपला का की, सत्तेत सहभागी असूनही सदैव असंतुष्ट आत्मे होऊन या ना त्या मागण्यांचे टाळ कुटणाऱ्या आणि लाळ घोटणाऱ्या पक्षांनाही (पक्षी : शिवसेनेला) विठोबाने द्यावी, अशी काही मागणी ते चंद्रभागेतिरी करणार आहेत की नाही विठोबाच जाणे. आता इतकेच म्हणायचे, साहेब निघाले पंढरीला!
 

खवय्यांची विनंती

 

गेल्या महिन्यात नावाजलेल्या नाश्ता सेंटरमधील वडापावमध्ये पाल आढळली वगैरे वगैरे प्रकरण तर फार गाजले. हो, हे सगळे आठवताना ठाण्याची पाणीपुरी कशी विसरून चालेल. पाणीपुरीला आगळी चव आणण्यासाठी तो पाणीपुरीवाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार धरणे भरण्यासाठी जी युक्ती सांगत होते ते करत होता. (कृपया धरण आणि अजित पवार हा संदर्भ फारच अविस्मरणीय असल्यामुळे ती युक्ती इथे लिहिण्याचे टाळले आहे.) असे काही म्हटले की, खवय्ये आपल्या खवय्येगिरीचे समर्थन करताना सांगतात की, “आम्ही काय थर्डक्लास, रोडछाप हॉटेलात जेवत-खावत नाही. आम्ही लायकीच्या आणि पॉश हॉटेलमध्येच जेवतो.” वर हे खवय्ये असेही आग्रहाने सांगतात की, “अगदी अमुक एका उपाहारगृहात एकदम घरच्यासारखी चव असते.” (आता घरी बनवलेल्या जेवणासारख्या चवीचे पदार्थच जर खायचे आहे तर मग ते दामदुप्पट पैसे मोजून हॉटेलात का खायचे, घरीच बनवलेले पदार्थ का खात नाहीत? या प्रश्नाचे समाधान अजून कुणीही केलेले नाही.) या अमुक एक उपाहारगृहामध्ये जेवणे, यातही स्टेटस असते म्हणे. पण स्टेटस सिंबॉल बनलेली ही उपाहारगृहे ग्राहकांचे हित जपतात का? व्यवसायाबरोबरच मानवी मूल्ये आणि गरजा यांचा विचार करतात का? तर माफ करा, याचे उत्तर नकारात्मकच द्यावे लागेल. अन्न व औषध प्रशासनाने नुकतेच मुंबईतील प्रसिद्ध ४४२ रेस्टॉरंट-हॉटेलची तपासणी केली. त्यावेळी यातील ३२७ रेस्टॉरंट-हॉटेल्स अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. राज्यभरात ही तपासणी करण्यात आली. तेव्हा ३ हजार ४७ रेस्टॉरंट-हॉटेलपैकी तब्बल २ हजार ६४९ रेस्टॉरंट-हॉटेलमधील किचन अस्वच्छ आहेत. तिथे अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. राज्यातील ८६.९३ टक्के रेस्टॉरंट-हॉटेल हे काहीही खाण्यासाठी योग्य नसल्याचे आढळून आले. या तपासणीनंतर एफडीएने ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या हॉटेलमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. जोपर्यंत आवश्यक ते बदल केले जात नाही, तोपर्यंत मुंबईसह राज्यभरातील २ हजार ६४९ रेस्टॉरंट-हॉटेल्सचे शटर डाऊन असणार आहे. हे सगळे पाहून वाटते की, उपाहारगृहामध्ये जाऊन क्षुधाशांती करणाऱ्या पामरांनी काय करावे? कारण सगळ्या तडजोडी करता येतात पण जेवणाखाण्याची तडजोड कशी करावी? त्यामुळे या सगळ्या उपाहारगृहांच्या बाबतीत कडक उपाययोजना व्हावी, हिच खवय्यांची विनंती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/